सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (16:20 IST)

पारुल खाखर कोण आहेत, ‘शववाहिनी गंगा‘वरून त्यांना ट्रोल का होतंय?

शौतिक बिस्वास
मे महिन्यातली एक सकाळ. गुजरातमधल्या एका लहानशा शहरात राहणाऱ्या एका कवयित्रीने आपली घरातली कामं संपवून वर्तमानपत्रं चाळायला घेतलं.
 
त्यावेळी भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट शिगेला होती. गंगा नदीच्या किनारी वाहून आलेल्या आणि कोव्हिड-19ने मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या मृतदेहांचे फोटो वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर होते. स्मशानांमध्ये मृतदेहांच्या रांगा लागल्या होत्या आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा तडफडून मृत्यू होत होता.
 
हे सगळं पाहून-वाचून व्यथित झालेल्या पारुल खाखर यांनी मनातल्या भावना एका कवितेतून मोकळ्या केल्या. शववाहिनी गंगा हे 14 ओळींचं शोकगीत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं. तिथे त्यांचे 15 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
 
व्हायरसने घातलेलं थैमान, मृत्यूचं तांडव त्यामुळे सगळीकडे पसरलेलं दुःख या सगळ्याविषयीच्या भावना पारुल यांनी या गुजराती कवितेतून व्यक्त केल्या. तरंगणारे मृतदेह, धडाडणाऱ्या चिता, सततच्या अंत्यसंस्कारांनी वितळलेली स्मशानाची चिमणी या सगळ्याचा उल्लेख यात होता.
 
नाव न घेता त्यांनी यात लिहिलं होतं, "शहर जळताना ते मात्र मग्न आहेत."
 
दुसऱ्या एका ओळीत त्या वाचकांना सांगतात : "बाहेर या आणि जोराने ओरडून बोला, नग्न राजा दुर्बळ आणि निकामी आहे."
 
ही कविता पोस्ट केल्याच्या काही तासांतच झपाट्याने गोष्टी घडत गेल्या.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या नाकर्तेपणावर टीका करणारी ही कविता व्हायरल झाली. काही तासांतच या कवितेचा इंग्लिशसह अर्ध्या डझनापेक्षा अधिक इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.
 
आपल्या नेत्यावरची टीका सहन न झालेल्या मोदी समर्थकांनी खाखर यांना ट्रोल करायला, शिवीगाळ करायला सुरुवात केली. व्हॉट्सअॅपवर हजारो मोठमोठे संदेश फिरू लागले. कोणी त्यांना 'चेटकीण' म्हटलं तर कोणी 'अँटीनॅशनल' (देश विरोधी) म्हटलं. काहींनी स्त्री असण्यावरून दूषणं दिली. इतर कवी आणि लेखकांनीही या कवितेवर टीका केली.
 
पण तितकाच मोठा पाठिंबाही त्यांना मिळाला. "ही कविता म्हणजे एक उपरोधात्मक काव्य आहे. त्यांनी मोदींचं नाव घेतलेलं नाही, पण त्यांची व्यथा आणि राग त्यातून व्यक्त होतो," न्यूयॉर्कमधले लेखक सलील त्रिपाठी सांगतात. त्यांनी या कवितेचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. "रुपकं आणि यमक वापरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे."
 
टीकेचा भडिमार होऊनही पारुल खाखर यांनी मात्र मौन बाळगलंय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी ईमेल पाठवला. त्याला उत्तर देताना त्यांनी लिहीलं, "आता मी कोणाशीही बोलू शकत नाही. तुमच्या सदिच्छांबद्दल आभार."
 
यानंतर त्यांनी त्यांचं फेसबुक पेज लॉक केलं असलं तरी ती कविता आहे. ही कविता काढून न घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गुजराती कवी मेहुल देवकाला यांनी त्यांना फोन केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, "जर मी म्हटलेलं काहीच चूक नसेल, तर मी ती का काढून टाकू?"
 
गुजरातमधल्या अहमदाबादपासून 200 किलोमीटर्सवर असणाऱ्या अमरेलीमध्ये राहणाऱ्या 51 वर्षांच्या पारुल यांच्यासाठी हे सगळंच नवीन आहे. "त्या राजकीय लेखक नाहीत. निसर्ग, प्रेम आणि देवाबद्दल लिहीणाऱ्या कवी म्हणून त्या लोकप्रिय आहेत. ही कविता त्यांच्या नेहमीच्या लेखनापेक्षा अगदी वेगळी आहे," त्रिपाठी सांगतात.
 
खाखर यांचे पती बँक कर्मचारी आहेत. आपण आधी गृहिणी आणि नंतर कवी असल्याचं पारुल त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगतात. गेल्या दशकभरात त्यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी गुजरातीत लोकगीतं आणि गझलचीही रचना केली आहे.
 
"त्या प्रसिद्धीपासून दूर आणि शांत असतात, अगदी साध्या आहेत," पारुल यांना चांगलं ओळखणाऱ्या दूरदर्शनच्या माजी केंद्र प्रमुख रूपा मेहता सांगतात.
 
शववाहिनी गंगा ही त्यांची पहिलीच राजकीय कविता आहे. "त्यांची लेखनशैली सोपी असली तरी त्या नेहमीच प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडतात," कवयित्री आणि लेखिका मनिषी जानी म्हणतात.
 
पारुल यांना त्रास दिला जातोय का आणि लेखकांचा गट त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकतो, हे विचारण्यासाठी मनिषी जानी यांनी पारुल यांना फोन केला होता. पारुल खाखर यांनी त्यांना शांतपणे सांगितलं, "माझ्यावर कोणताही दबाव नाही वा त्रास दिला जात नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा."
 
खाखर यांना त्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी हवी तितकी दाद मिळाली नसल्याचं अनेक जण सांगतात. त्यांच्या घरासमोरचं लालभडक फुलांचं झाड कापण्यात आलं, तेव्हाही त्यांनी त्याविषयी कविता केली होती. तर दुसऱ्या एका कवितेतून त्या वानप्रस्थाश्रमाबद्दल बोलतात.
 
"गेल्या मार्चमध्ये त्यांनी लोकांच्या खालावणाऱ्या मनस्थितीबद्ल लिहीत लोकांना जागं होण्याचं आवाहन केलं होतं, आणि ती कविताही प्रभावी होती," असं मेहता सांगतात.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रकारे ही साथ हाताळली त्यावरुन स्थानिक कवी आणि लेखकांनी टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही.
 
"खाखर एक चांगल्या कवी असल्या तरी त्यांची नवीन कविता हे काव्य नाही," असं गुजरात साहित्य अकादमीचे प्रमुख विष्णू पांड्या यांनी म्हटलंय.
 
"त्यात अपमानास्पद मजकूर आहे. काहीच अर्थ लागत नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी या कवितेचा वापर केला," माझ्याशी बोलताना पांड्या म्हणाले. "आम्ही त्यांच्या विरुद्ध नाही. त्यांना हवं ते त्या लिहू शकतात. त्यांच्या लेखनाचा डाव्या कट्टरतावादी आणि देशविरोधी लोकांनी वापर करण्याच्या आम्ही विरोधात आहोत."
 
अकादमीने कवितेच्या विरोधात घेतलेल्या या पवित्र्याचा निषेध करणारं निवेदन गुजरातमधल्या 160पेक्षा जास्त महत्त्वाच्या लोकांनी एकत्र येत प्रसिद्ध केलंय.
 
गेल्या आठवड्यात एका स्थानिक प्रकाशनाने खाखर यांची आणखी एक कविता प्रसिद्ध केली. त्रिपाठी सांगतात, "यामध्ये त्या टीकाकारांवर टीका करतात, पण सोबतच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांबद्दलही सावधपणे भाष्य करतात."
 
या कवितेतली एक ओळ म्हणते, "वेदना असह्य होतील, पण तुम्ही बोलू नका, अगदी हृदय आकांत करू लागलं, तरीही तुम्ही बोलू नका."