रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:53 IST)

Swami Narayan Mandir नैरोबीतील स्वामी नारायण मंदिर

swami narayan mandir naerobi
गेल्या अनेक वर्षापासून व्यापार धंद्यानिमित्त बरेच हिंदू धर्मी नैरोबीत स्थायिक झाले आहेत. त्यांनी काही कोटी रूपये खर्च करून प्रशस्त, मोकळ जागेवर नैरोबीत हे स्वामी नारायण मंदिर उभारले आहे. 
 
त्यासाठी अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले दगड खास जपूरमध्ये घडवून नैरोबीत आणले आणि त्या दगडांनी हे मंदिर बांधले आहे. मंदिरातील कोरीव काम आणि स्वच्छता वाखाणणजोगी आहे. 
 
या मंदिराला जोडूनच दुर्मीळ असे भारतीय संस्कृती दर्शनाचे भव्य दालन उभारले आहे. असे भव्य दालन भारतात इतरत्र कोठेही नाही. या दालनाच्या गोलाकार भिंतीवर अत्यंत सुंदर चित्रे आणि सुयोग्य इंग्रजी भाषेतील माहितीसह प्राचीन वेदकाळापासूनचा भारतीय हिंदू संस्कृतीचा इतिहास रेखाटला आहे. 
 
नैरोबी शहरातील रस्ते सुंदर आणि स्वच्छ आहेत. वाहतूक शिस्तबद्ध आहे. सार्वजनिक आणि खासगी इमारती तसेच घरांच्या बाहेरील रस्तवरही झाडे लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या आवारात मन प्रसन्न करणारी हिरवळ फुललेली दिसते. 
 
आफ्रिकन फिश ईगल हे केनियाच्या 1400 कि.मी. क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले पशुपक्षी अभ्यारण्य या परिसरात आहे. सिंह, चित्ता, तरस, लांडगा आणि हिंस्र आफ्रिकन हत्ती, जिराफ, शहामृग, झेब्रा, पाणघोडा, वानरे अशा वन्य प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी राखीव ठेवलेले हे अभ्यारण्य आहे.
 
दरवर्षी येथे दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक येतात. पहिल्यांदा येथे चिपांझी वानरांचे राखीव वन पाहायला मिळते. यानंतर येथेच जगप्रसिद्ध नैवाशा सरोवर आहे. हे सरोवर फारच प्रेक्षणीय आहे. 
 
स्वामी नारायण मंदिराला हिंदू लोक येतातच पण इतर धर्मीय लोकसुद्धा या मंदिराचे सौंदर्य पाहाण्यासाठी दूरदूरच्या गावाहून येतात. हे पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी देवाचा वास असल्याबद्दल त्यांना खात्री पटते. या   देवामध्येच ते आपला देव पाहतात. हे मंदिर हिंदूंचे असल्यामुळे अनेक हिंदू लोक या देवाला नवस बोलतात आणि त्यांची कार्यसिद्धी झाल्याबद्दल तेथील लोक सांगतात.
 
म.अ. खाडिलकर