सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (09:17 IST)

चेतन कुमार : हिंदुत्वाचा पाया खोटेपणा आहे, असं म्हणणारा हा अभिनेता कोण आहे?

chetan kumar
Twitter
कन्नड अभिनेता चेतन कुमार उर्फ चेतन कुमार अहिंसा यांना हिंदुत्व विरोधी ट्वीट केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
 
‘हिंदुत्वाचा पाया खोटेपणा आहे’ अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं.
 
गेल्या तीन वर्षात धार्मिक भावना दुखावल्याचा हा त्यांच्यावर दाखल झालेला तिसरा खटला आहे.
 
अभिनेता चेतन कुमारला बुधवारी (22 मार्च) अटक करण्यात आली.
 
त्याने सोमवारी ट्वीट केलं होतं, “हिंदुत्व खोटेपणावर आधारित आहे. सावरकरांनी दावा केला की जेव्हा राम रावणाचा वध करून आला तेव्हा भारत हिंदू राष्ट्र झालं. हे खोटं आहे.”
 
त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “1992: बाबरी मशीद हे रामाचं जन्मस्थान आहे. हे चूक आहे. 2023: उरी गौडा आणि नन्जे गौडा यांनी टिपू सुल्तानची हत्या केली. हे खोटं आहे. सत्याने हिंदुत्वाचा पराभव केला जाऊ शकतो. समानता हेच सत्य आहे.”
 
पोलिसांनी चेतन कुमार यांच्यावर कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
एखाद्या व्यक्तीने एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आणि काही द्वेषपूर्ण वक्तव्य केल्यास 295A या कलमाअंतर्गत तो गुन्हा मानला जातो.
 
उत्तर बंगळुरू येथील बजरंग दलाचे समन्वयक शिवकुमार यांच्या तक्रारीवरून चेतन कुमार यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत शिवकुमार म्हणालेत की चेतन कुमार ‘सराईत गुन्हेगार’ आहे.
 
चेतन कुमार यांना अटक केल्याबद्दल चित्रपट निर्माता अग्नी श्रीधर यांनी टीका केली आहे. ते म्हणतात, “न्यायालयीन कोठडीत पाठवण्यासारखं असं त्यांनी काय केलं आहे? उरी गौडा आणि नन्जे गौडाबद्दल स्वामीजींनी जी टिप्पणी केली आहे त्यापेक्षा ही वेगळी नाही.”
 
उरी गौडा आणि नन्जे गौडा यांनी टिपू सुल्तानची हत्या केली होती या भाजपाच्या दाव्यावर कर्नाटकच्या वोक्कालिगा या प्रमुख समुदायाचे प्रमुख पुजारी श्री निर्मलानंद स्वामी यांनी टीका केली आहे.
 
चेतन कुमार यांनी अशी काही भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.
 
दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले होते. चेतन यांनी या व्हीडिओत ब्राह्मणवादाविषयी वक्तव्य केलं होतं.
 
या व्हीडिओनंतर चेतन यांच्याविरोधात ब्राह्मण डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष आणि आणखी एका संस्थेनं तक्रार दाखल केली.
 
चेतन कुमार यांनी ब्राह्मणवादावर काय म्हटलं होतं?
 
चेतन यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हीडिओत म्हटलं होतं की, "हजारो वर्षांपासून ब्राह्मणवादानं बसवेश्वर आणि बुद्धाच्या विचारांना संपवण्याचं काम केलं आहे. 2500 वर्षांपूर्वी बुद्धानं ब्राह्मणवादविरोधात लढाई लढली. बुद्ध विष्णूचा अवतार नाहीये आणि असं म्हणणं खोटं बोलणं आहे. मूर्खपणा आहे.
 
यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं, "ब्राह्मणवाद स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या भावनेचा स्वीकार करत नाही. आपण ब्राह्मणवादाला मूळापासून उखडायला हवं. सगळेच जण एका समान पद्धतीनं जन्म घेतात, त्यामुळे केवळ ब्राह्मण सर्वोच्च आहेत आणि इतर सगळे अस्पृश्य आहेत, असं म्हणणं निव्वळ मूर्खपणा आहे. हा एक खूप मोठा विश्वासघात आहे."
 
कन्नड अभिनेते उपेंद्र यांनी कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाविषयी बोलताना चेतन यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.
 
या कार्यक्रमात फक्त पुरोहितांना बोलावण्यात आलं होतं, असं चेतन यांचं म्हणणं होतं. यामुळे मग त्यांनी उपेंद्र यांच्यावर टीका केली.
 
दुसरीकडे उपेंद्र यांचं म्हणणं आहे की, आपण नुसतंच जातींविषयी बोलत राहिलो तर जात तशीच टिकून राहील. चेतन यांच्या मते, ब्राह्मणवाद हे असमानतेमागचं मूळ कारण आहे.
 
या वक्तव्यानंतर ब्राह्मण डेव्हलपमेंट बोर्डानं त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
 
चेतन कुमार कोण आहेत?
 
चेतन कुमार यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत.
 
'आ दिनागलु' चित्रपटाचे दिग्दर्शक के.एम. चैतन्य यांनी बीबीसीला सांगितलं, की चेतन येल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतल्यानंतर भारतात आले तेव्हा चित्रपटासाठी ते नवीन चेहरा होते.
 
2007मध्ये आलेला 'आ दिनागलू' चित्रपट एक कल्ट चित्रपट समजला जातो.
 
याशिवाय चेतन यांनी इतर चित्रपटांत काम केलं आहे, पण ते विशेष असं प्रदर्शन करू शकले नाहीत. पण, 2013मध्ये आलेला त्यांचा 'मायना' हा चित्रपट चांगला चालला होता, त्यांचचं खूप कौतुक झालं होतं.
 
महेश बाबू दिग्दर्शक असलेला चेतन यांचा 'अथीरथा' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. याच्यामागे चेतन यांचे राजकीय विचार कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.
 
एकीकडे एक कार्यकर्ते म्हणून चेतन यांची ओळख तयार होत आहे, तर दुसरीकडे चित्रपटांतील त्यांचा सहभाग कमीकमी होत आहे.
 
दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मंजुनाथ रेड्डी ऊर्फ मंसोरे सांगतात, "चेतन हे एक समर्पित अभिनेते असले तरी यशस्वी नाहीयेत. ते अजूनही 'आ दिनागलु' या चित्रपटासाठीच ओळखले जातात. सध्या ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहेत. ज्या अभिनेत्यासाठी सामाजिक प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात, अशा अभिनेत्याच्या रुपात ते समोर येत आहेत."
 
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर कन्नड चित्रपटसृष्टीशी निगडीत एक व्यक्ती म्हणाली, “ते अमेरिकेत लहानाचे मोठे झाले मात्र साहित्यातील त्यांचं ज्ञान पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. 12 व्या शतकातील सुधारणावादी विश्वेश्वरैय्या यांच्या विचाराशी त्यांची निष्ठा आहे. त्यांच्या अनुयायांना लिंगायत म्हटलं आहे.”
 
चित्रपटाती अभिनायाशिवाय विविध सामाजिक मुद्द्यांवर ते काम करत असतात. उदा. एंडोसल्फान पीडित, बेघर आदिवासींसाठी घरं बांधणं, आणि अन्य सामाजिक कार्याशी ते निगडीत आहेत.
 
लिंगायत धर्माला मान्यता मिळावी म्हणून ते अभियान चालवतात.
 
चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेक लोकांचं असं मत आहे की चेतन सामाजिक सुधारणांशी निगडीत त्यांच्या कामात नेहमी तार्किक भूमिका घेतात मात्र राजकीय पक्षांबद्दल त्यांच्या टिप्पणीचा विषय निघतो तेव्हा त्या बरेचदा असंबद्ध असतात. ते सर्व राजकीय पक्षांवर टीका करतात.
Published By -Smita Joshi