बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

कोण म्हणतो, संस्कृत भाषेत नवीन लेखन होत नाही? हे घ्या चोख उत्तर!

सकल-कल्याण-कारकं श्रीदुर्गादेवीनमनम् – एक रसाळ स्तोत्र
 
ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर हे एक सिद्धहस्त संस्कृत कवी आहेत. त्यांच्या रचना या प्रासादिक असतात. त्यांचे लेखन हे विविधांगी आहे. त्यांचे संस्कृत काव्य ग्रंथ देखील प्रकाशित झाले आहेत.  सकल-कल्याण-कारकं श्रीदुर्गादेवीनमनम् हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्या पुस्तकाचा आढावा घेणारा हा लेख ......
 
पुस्तकाच्या प्रारंभी मनोगत व्यक्त करताना डॉ. शास्त्री म्हणतात की, “होय, मी श्रद्धावान आहे. माणसाच्या माणूसपणावर, देवाच्या देवपणावर  श्रीरेणुकामातेच्या वात्सल्यावर, श्रीगुरूंच्या कृपालुत्वावर माझी परम श्रद्धा आहे. ‘‘ सकल-कल्याण-कारकं श्रीदुर्गादेवीनमनम् |’’- चा येथपर्यंतचा प्रवास हा श्रद्धोद्भव आहे; असे मी मानतो. 
 
अनेक मित्रांनी मी समकालीन विषयांवर संस्कृत श्लोकरचना करावी, अशी प्रेरणा दिली. प्रारंभ झाला. विविध विषयांवर संस्कृत श्लोकरचना करीत होतो. पण मनाचे आकाश अगदी बालपणापासूनच श्रीरेणुकामातेच्या आळवणीने भरलेले होते; ही श्रीगुरुकृपा. आणि मग हा काव्यप्रवास सुरू झाला. सलीलपूर्णनेत्र, मनात ओथंबलेले श्रीरेणुकामातेविषयीचे भाव आणि श्लोकरचना असा हा सुंदर प्रवास.
 
या पुस्तकाच्या पूर्णतेसाठी प्रेरणा, सहकार्य, आणि संपादन अशी त्रिवेणी भूमिका पार पाडणाऱ्या सौ. मानसी चं. सोनपेठकर यांचा आणि शॉपिजेन प्रकाशन, कर्णावती, अहमदाबादच्या पदाधिकारी ऋचा करपे यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख कवीने केला आहे. 
 
संस्कृत काव्य लेखनाविषयी आपली प्रांजळ भूमिका स्पष्ट करताना कवी म्हणतात –“या पुढील प्रवास हा आपल्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे. आपण ते सहकार्य कराल, अशी शाश्वती आहे. भविष्यातही संस्कृतशारदेच्या चरणी अनेक रचना समर्पित करण्याचे ध्येय आहे. संस्कृतात अर्वाचीन काळात कमी लेखन होते, असा प्रतिपक्ष जे मांडतात, त्यांना यथाशक्य पण कृतीत उत्तर देण्याचा प्रयत्न जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत करावयाचा आहे. आपल्या स्नेहपल्लव शुभेच्छा सदैव असाव्यात.” 
 
या पुस्तकात सर्वप्रथम सकल-कल्याण-कारकं श्रीदुर्गादेवीनमनम्  हे स्तोत्र आहे. या विषयी भूमिका प्रतिपादित करताना डॉ. शास्त्री मांडतात की, शक्तीस्वरूपिणी अशा श्रीदुर्गादेवीमातेला वारंवार नमस्कार असो. तिने प्रेरणा द्यावी आणि आपण लिहिण्यासाठी तयार व्हावं. त्या नंतर जसे आईने लेकराचा हात हाती घेऊन अक्षरं गिरवावीत तसे वात्सल्यस्वरूपा भक्तकामदुघा अशा जगदंबेने आपल्या कडून हे स्तोत्र करून घ्यावे. श्रीगुरुंनी आज्ञा करावी की, बाळा, तुला स्तोत्र लिहायचंय, साक्षात जगदंबा तुझ्याकडून स्तोत्र लिहून घेईल. अशीच काही अनुभूती या स्तोत्र प्रसंगी अभिव्यक्त करावी वाटते. 
 
सर्वांचे कल्याण व्हावे, या हेतूने प्रस्फुरित अशा या स्तोत्रात १०८ श्लोक आहेत. आणि चार अत्यंत महत्वाच्या प्रार्थना जगदंबेला केलेल्या आहेत. पहिली प्रार्थना केली आहे की, जगदंबेने आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांची शांती करावी. दुसरी प्रार्थना केली आहे की, अभीष्टफलाची प्राप्ती जगदंबेने करून द्यावी. तिसरी प्रार्थना आहे की, दारिद्र्य आणि दु:ख यांचा नाश जगदंबेने करावा. चौथी प्रार्थना आहे की, धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थ त्रयीची सिद्धी जगदंबेने करावी. १०० श्लोकांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे धृवपद २४ श्लोकांमध्ये आले आहे. म्हणजे पहिला श्लोक ते चोविविसावा श्लोक यांत पहिली प्रार्थना ध्रुवपदात आली आहे. श्लोक क्र. २५ ते ४८ यांत दुसरी प्रार्थना आली आहे. श्लोक क्र. ४९ ते ७२ यांत तिसरी प्रार्थना आली आहे. श्लोक क्र. ७३ ते ९६ यांत चौथी प्रार्थना आली आहे. या नंतर श्लोक क्र. १०१ ते १०८ यांत प्रत्येकी दोन श्लोकांत प्रस्तुत चारही प्रार्थनांचा समावेश आहे.
 
जगदंबा श्रीदुर्गामातेने जो कृपाप्रसाद या स्तोत्राच्या स्वरूपात दिधला आहे, तो श्रीगुरुंच्या आज्ञेने आपल्या समक्ष सादर करीत आहे, अशी माझी श्रद्धा आहे. या उपर जे चुकीचे असेल, त्याचे कारण चंद्रहासच्या मानवी देहाची आणि मतीची मर्यादा समजावी आणि जे युक्त असेल, ते भगवती जगदंबा करुणामयी दुर्गा मातेची आणि श्रीगुरूंची कृपा समजावी.
 
खरोखर एकशे आठ श्लोकांचे हे संस्कृत स्तोत्र आणि त्याचा मराठी अनुवाद श्रीदुर्गामातेच्या भक्ती-तरंगात जणू आपले निमज्जन करतो.
 
या नंतरच्या श्रीनीलांबरीस्तोत्रम् या स्तोत्रात नील वस्त्र धारण करणाऱ्या भगवती जगदंबेचे स्तवन करण्यात आले आहे. अष्टक प्रकारातील हे स्तोत्र आहे. कारण या स्तोत्रात आठ श्लोक अनुष्टुप छन्दामधील आहेत. निळ्या रंगाचा संबंध श्रीदेवीचा कसा येतो, हे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न प्रथम श्लोकात केला आहे. द्वितीय श्लोकात श्रीदेवीने रात्रीच्या आकाशाप्रमाणे असणारे नील वस्त्र धारण केले आहे, अशी उपमा श्रीदेवीच्या नीलवस्त्राला दिली आहे. तृतीय श्लोकात लावण्य, कारुण्य या शब्दांनी अनुप्रास साधण्याचा प्रयत्न केला आहे. चतुर्थ श्लोकात श्रीदेवीला जगताच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. पंचम श्लोकात श्रीदेवीला वारंवार नमन करण्यात आले आहे. षष्ठम श्लोकात श्रीदेवी सुर-मुनी-श्रेष्ठजन-वंदित आहे, असा तिचा सार्थ महिमा वदिला आहे. सप्तम श्लोकात तू हे विश्व स्वच्छ आणि निर्भय कर, अशी प्रार्थना श्रीदेवीला करण्यात आली आहे. तर अष्टम श्लोकात कवीने आपल्या नावाचा उल्लेख काव्यात्मक रीतीने केला आहे. श्रीदेवीच्या हाती खड्ग आहे. त्या खड्गाचे नाम चंद्रहास असे आहे. तसेच श्रीदेवीने कवी चंद्रहासाला आपल्या हाती धरले आहे. अर्थात त्याच्या संरक्षणाचे दायित्व स्वत:कडे घेतले आहे, असा श्लेष साधण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
श्रीललिताम्बिकावंदनम् या स्तोत्रात श्रीदेवीच्या आत्यंतिक आनंदी अशा श्रीललिताम्बिका स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. किंबहुना श्रीदेवीच्या कृपेने तसे ते घडून आले आहे. काव्यातील प्रसाद, माधुर्य या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न येथे दिसून येईल. मृदु वर्णांचा समुच्चय या स्तोत्रात आधिक्याने झाल्याचा दिसून येतो. मृदु वर्णांचा समुच्चय या स्तोत्रात आधिक्याने झाल्याचा दिसून येतो.
 
प्रथम श्लोकात मनाला आनंदित करणाऱ्या अशा श्रीदेवीला वंदन करण्यात आले आहे. द्वितीय श्लोकात मधुर भाषण करणाऱ्या अशा श्रीदेवीला वंदन केले आहे. तृतीय श्लोकात इक्षु दंड हे माधुर्याचे प्रतिक जवळ बाळगणाऱ्या श्रीदेवीला नमन केले आहे. चतुर्थ श्लोकात श्रीचक्र आसनावर स्थित अशा श्रीदेवीला वंदन केले आहे. पंचम श्लोकात सदैव प्रसन्न आणि वर देणाऱ्या अशा श्रीत्रिपुरसुंदरी देवीला वंदन केले आहे. तर षष्ठम श्लोकात षोडशी, राजराजेश्वरी, परा अशा विविध नावांनी जिचे संबोधन केले जाते, त्या श्रीललिताम्बिका देवीला वंदन केले आहे.
 
माधुर्यसंयुत असे हे सहा श्लोकांचे श्रीललिताम्बिका देवीचे स्तोत्र श्रीदेवीने कवीकडून करवून घेतले आहे. स्तोत्रातील सर्व श्लोक अनुष्टुप छंदात आहेत.
 
अष्टक प्रकारातील श्रीमहागौरीनमनम् या स्तोत्रात श्रीमहागौरीला नमन करण्यात आले आहे. या स्तोत्रातील आठही श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. गौरीं वन्दे सदाशिवाम् | असे धृवपद या स्तोत्रात आले आहे. प्रथम श्लोकात या विश्वाचे रक्षण करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. द्वितीय श्लोकात अभय दान देणाऱ्या श्रीदेवी महागौरीला नमन करण्यात आले आहे. तृतीय श्लोकात मानवाचे परिपालन करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. चतुर्थ श्लोकात कैलास पर्वताची शोभा असणाऱ्या श्रीमहागौरीला वंदन करण्यात आले आहे. पाचव्या श्लोकात श्रीनटराजाची नायिका असणाऱ्या श्रीमहागौरीला वंदन करण्यात आले आहे. सहाव्या श्लोकात समस्त लोकांचे कल्याण करणाऱ्या श्रीमहागौरीला नमन करण्यात आले आहे. सातव्या श्लोकात समस्त लोकांसाठी पूज्य अशा श्रीमहागौरीला नमन करण्यात आले आहे. तर आठव्या श्लोकात शुभ प्रदान करणाऱ्या अशा श्रीमहागौरीला नमन करण्यात आले आहे. तर नवव्या श्लोकात कवीने “हे गौरी, चंद्रहासाने हे तुझे स्तोत्र रचले आहे. मी स्वत:ला निमित्तमात्र मानतो. आणि तुझेच तुला हे (अर्चन) समर्पित करतो.” अशी प्रांजळ भावना व्यक्त केली आहे.
 
श्रीरेणुकाप्रात:स्मरणम् हे स्तोत्र हे भूपाळी किंवा काकडा किंवा सुप्रभात स्तवन किंवा प्रात:स्मरण या प्रकारातील आहे. या स्तोत्रात एकूण १२ श्लोक आहेत. श्लोक क्र. १ ते श्लोक क्र. ५ भुजंगप्रयात छंदात आहेत. आणि श्लोक क्र. ६ ते १२ अनुष्टुप छंदात आहेत. 
 
खरे तर, जगदंबा श्रीरेणुका माता आपल्या लेकरांच्या हितासाठी, कल्याणासाठी अव्याहत जागीच असते. दिवस असो वा रात्र, तीच विश्वाचे पालन, नियंत्रण आणि संचालन करीत असते. तिची कृपा असते, म्हणून तर आपण निद्राधीन होत असतो. मग तिला निद्रा त्यागण्यास आपण का बरे विनंती करीत असू? तर खऱ्या अर्थाने ती आपल्या मनश्चक्षूसमोर उपस्थित व्हावी, तिचे दिव्य रूप आपल्या मनश्चक्षू समोर यावे, म्हणून तिला आपण प्रार्थना करीत असतो.
 
आणि हो, आपण कोण तिला सुप्रभात म्हणणारे? तीच तर आपली प्रभात छान करीत असते. सकाळी उठल्या उठल्या आपण अग्रक्रमाने तिला सुप्रभात म्हणणे, हाच तर उद्देश तिला सुप्रभात म्हणण्यात असतो. अशी भूमिका कवीने येथे अभिव्यक्त केली आहे.
 
यांनतर श्रीगुरू भगवानशास्त्रीमहाराज सोनपेठकर: अल्प परिचय आणि ऐसियांचा संग देई नारायणा या दोन लेखांचाही समावेश पुस्तकात आहे. यात श्रीगुरु महाराज  आणि डॉ. चंद्रहास शास्त्री यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
 
पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील चित्तवेधक असे आहे. पुस्तकाच्या विषयाला अनुरूप असे श्रीदुर्गामातेचे चित्र मुखपृष्ठावर आहे. मलपृष्ठावर डॉ. शास्त्रींचा संक्षिप्त परिचय आहे. रसिकांनी, संस्कृतअनुरागींनी आणि भाविकांनी आवर्जून वाचावे, असे हे पुस्तक आहे.
 
इति लेखनसीमा !
सकल-कल्याण-कारकं श्रीदुर्गादेवीनमनम् |
शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद 
पृष्ठ – ७१ 
मूल्य – १५० रु.