गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By वेबदुनिया|

बुद्धांचा अष्टांगिक मार्ग

भगवान बुद्धाच्या मते कोणत्याही बाबीत अति करणे टाळावे. भोगात आणि त्यागात दोन्ही अति नको असे बुद्ध म्हणतात. कामसुखात मश्गूल रहाणे चुकीचे तसेच शरीराला अत्याधिक त्रास देऊन तपस्या करणे हेही चुकीचेच. तथागताने ही दोन्ही टोके सोडून देत मध्यम मार्ग आचरण्याचा सल्ला दिला आहे. त्यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. याच मार्गाने शांती, ज्ञान आणि निर्वाण प्राप्त करता येते. हा मार्ग असा आहे. 

१. सम्यक दृष्टी- दुःखाचे ज्ञान, दुःखोदयाचे ज्ञान आणि दुःखनिरोधाचे ज्ञान याकडे हा मार्ग घेऊन डातो. दुःखाकडे सम्यक नजरेने पाहण्याची ही दृष्टी आहे.

२. सम्यक संकल्प- निष्काम तथा अनासक्ती संकल्प, अहिंसा संबंधी संकल्प किंवा अद्रोहाविषयीच्या संकल्पाला सम्यक संकल्प म्हणतात.

३. सम्यक वचन- खोटे बोलणे सोडणे, चुगली न करणे, कठोर न बोलणे, वायफळ गप्पा सोडणे म्हणजे सम्यक वचन पाळणे.

४. सम्यक कर्मांत- प्राणी हिंसेपासून दूर रहाणे. चोरी न करणे. दिल्याशिवाय न घेणे, कामोपभोगापासून विरक्त होणे हे सम्यक कर्मांत येते.

५. सम्यक आजीव- जीवन जगताना मिथ्या असलेल्या गोष्टी सोडून देत जीवनभर टिकणार्‍या चांगल्या गोष्टी तेवढ्या करणे म्हणजे सम्यक आजीव.

६. सम्यक व्यायाम- पाप उत्पन्न न होऊ देण्याचा निश्चय करणे. कष्ट करणे, कामधंदा करणे. मनावर नियंत्रण मिळविणे. सत्यकर्म करणे हे सम्यक व्यायामात येते.

७. सम्यक स्मृती- वार्धक्य, मृत्यू या दैहिक अनुभवाविषयी सम्यक दृष्टी बाळगणे. राग, लोभादी अवगुणांना सोडून देणे. थोडक्यात स्मृतीत दडून बसलेल्या विकारांना बाहेर काढणे.

८. सम्यक समाधी- सम्यक समाधीचा रस्ता चार पायर्‍यातून जातो. पहिल्या पायरीला ध्यान करताना उगाचच येणारे विचार आणि वितर्क यांचा लोप होतो. दुसर्‍या पायरीवर प्रती, सुख व एकाग्रहता या तीन वृत्ती रहातात. तिसर्‍यामध्ये प्रीतीही निघून जाते. फक्त सुख व एकाग्रता रहाते. चौथ्या ध्यानात सुखही जाते फक्त उपेक्षा व एकाग्रता रहाते.

दु:ख, दु:खकारण, दु:ख निरोधा व दु:ख निरोधाचा मार्ग ही बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी हा अष्टांगिक मार्ग उपयोगी पडतो.