मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (16:12 IST)

अल्पसंख्यांकासाठी एक हजार कोटी

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज वर्ष 2008-09 साठी सादर केलेल्या बजेटमध्ये अल्पसंख्याकांना आधुनिक शिक्षण आणि विकासासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

अल्पसंख्यांकासाठी केलेल्या या घोषणेचे मुस्लिम समुदायाने स्वागत केले असून निमलष्करी दलात नवीन सैन्य भरती करण्याच्या निर्णयालाही त्यांनी चांगले म्हटले आहे.

सरकारने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी 500 कोटीवरून एक हजार कोटीपर्यंत रक्कम वाढविल्यामुळे आपल्याला आनंद झाला आहे. पण या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे, अशी चिंता मौलाना महमूद दर्याबादी यांनी व्यक्त केली आहे.

मदरश्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु, मदरश्याच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. देशात अनेक धार्मिक शाळा असून त्यांना जनतेकडून भरघोस मदत केली जाते. त्या शाळांना सरकारी पैशाची गरज नाही. मदरश्यातील आधुनिक शिक्षणासाठी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे रजा अकादमीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

यंदाच्या बजेटमध्ये अल्पसंख्यांकांना आधुनिक शिक्षण आणि विकासासाठी आर्थिक मदत करणे म्हणजे सच्चर समीतीने आपल्या अहवालात नमूद केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होय असे कॉंग्रेसचे माज‍ी आमदार आरीफ नसीम खान यांनी म्हटले आहे.

अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी केलेली घोषणा केवळ कागदोपत्री न राहता तीची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणा ही घोषणाच राहीली नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया लेखक डॉ. दाऊद काश्मिरी यांनी व्यक्त केली आहे.