सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By भीका शर्मा|

टेपा संमेलनातून 'टोप्या' उडविणारे डॉ. शर्मा

हिंदी साहित्य जगतात हास्यकवी संमेलनाचे महत्त्व फार आहे. याच संमेलनाचे थोडे वेगळे स्वरूप म्हणजे टेपा संमेलन. डॉ. शिव शर्मा हे गेल्या 38 वर्षांपासून उज्जैनमध्ये हे टेपा संमेलन आयोजित करतात. त्यांच्याशी भीका शर्मा यांनी साधलेला संवाद...

आपल्या विद्यार्थी जीवनाविषयी काही सांगा.
माझे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील ब्यावरा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण नरसिंहगड येथील हायस्कूलमध्ये झाले. मी फार संघर्षमय वातावरणात बालपण घालवले. मी आठवीत असताना शाकिर अली आणि होमी दाजी यांच्या संपर्कात आलो आणि मार्क्सवादी झालो. खरं तर तेव्हापासून माझी अभ्यासातील रूची वाढली. दहावीनंतर सरळ मी उज्जैनला निघून आलो. मला बालपणापासूनच उज्जैन हे शहर आवडते. एकीकडे कम्युनिस्ट पार्टी व दुसर्‍या बाजूला असलेली येथील प्राचीनता मला आकर्षित करत होत्या. उज्जैन येथील माधव महाविद्यालयात विद्यार्थीदशेतून प्राचार्यच्या रूपात पूर्ण 50 वर्षे काढली. सुरवातीपासून हे महाविद्यालय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र राहिले आहे. महान हिंदी साहित्यिकांचे वास्तव्य असल्याने त्यांचा चांगला प्रभाव माझ्यावर पडला आहे. काही वर्ष प‍त्रकारितेता घालविल्यानंतर हास्य संमेलनाच्या आयोजनास प्रारंभ केला. 38 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.

'टेपा संमेलन' असते तरी काय ?
दिल्लीमध्ये गोपाल प्रसाद मिश्र 'महामूर्ख संमेलन' आयोजित करत होते. परंतु, आपल्या देशात निरक्षरांची संख्या जास्त असल्याने त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. माझ्या मते जगभरात मुर्खांचे बहूमत आहे. 'टेपा' हा एक माळवी शब्द आहे. त्याचा अर्थ भोळीभाबडी व्यक्ती असा होतो. भारतातील जवळपास सर्व हास्यकवी, विनोदी लेखक, संपादक माझ्या संमेलनात सहभागी झालेले आहेत. 200 नागरिकांनी प्रारंभ झालेल्या संमेलनात आज वीस हजार नागरिक सहभागी होतात. यात आम्ही उच्चपदी विराजमान असलेल्या व्यक्तींची व्यंगात्मक पोलखोल करत असतो. टेपा संमेलनातून नागरिकांना निखळ हसविणे हाच मुळ उद्देश आहे.

आपण व्यंगकार कसे बनलात ?
एक यशस्वी प्राध्यापक बनण्याचे माझे स्वप्न होते. परंतु, विचार केला की, मी 'मुर्ख शिरोमणी' का नाही व्हावं. माळवा परिसरात 'वाचन संस्कृती' लोप पावली आहे. तिला आम्ही नवसंजीवनी दिली. माझे विनोद, कविता प्रसिध्द होऊ लागल्या तशी मला व्यंगकार म्हणून उपाधी मिळाली. माझे वडीलही खूप विनोदी स्वभावाचे होते. ते राजा- महाराजांना विनोद ऐकवायचे. कदाचित त्यांचाच वारसा मी चालवत आहे, असे म्हटले तरी चालेल.

आपण युवा हास्यलेखक- कवींना काय संदेश देऊ इच्छिता?
मी स्वत:ला कधी श्रेष्ठ मानत नाही. परंतु, हल्लीच्या युवा हास्यलेखक- कवींच्या बाबतीत मी निराश आहे. निरर्थक कुणीही हसत नाही. क्लर्क, प्रेयसी व बायको यांच्यावर विनोद करण्यापेक्षा समाजात असलेल्या विकृतींतून विनोद शोधायला हवा. उपरोधातही आक्रमक शैली आहे.

वेबदुनियासाठी कुठला संदेश देणार ?
वेबदुनियाच्या भरभराटीसाठी मी खूप शुभेच्छा देतो. वेबदुनियाचा नऊ भाषांमध्ये पसारा वाढला आहे. मी एकदा लंडन गेलो असता तेथील नागरिक मला म्हणाले की, वेबदुनियाद्वारा भारतातील बातम्या, साहित्य व संस्कृतीशी आमचे नाते जुळले आहे.