दिमाखदार सोहळ्याने गेम्सना सुरुवात
71
देशांचे सात हजार खेळाडू, अनेक देशांचे मान्यवर तसेच 60 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत आज राजधानी दिल्लीत शानदार समारंभाने 19 व्या कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात करण्यात आली. ब्रिटीश राजपरिवारातील प्रिंस चार्ल्स यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याहस्ते या गेम्सचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्यास सुरुवात होण्यापूर्वी शानदार आतिषबाजी करण्यात आल्याने दिल्लीचे आकाश रंगबेरंगी दिसत होते. सोहळ्यास सुरुवात होण्यापूर्वी अनेक प्रेक्षक सुरक्षा फेर्यातून जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देश-विदेशातील अनेक महत्वाचे नेते आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. शंखनाद व एका चिमुकल्याच्या तबला वादनाने या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.