Last Modified: नवी दिल्ली, , मंगळवार, 22 जुलै 2008 (18:21 IST)
सभागृहात गोंधळ सुरूच
खासदारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत भाजप खासदारांनी सभागृहात नोटांची बंडले आणून दाखविल्यानंतर 6 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलेली लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. कामकाजास सुरुवात होताच विरोधकांनी नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळास सुरूवात झाली. सदस्य ऐकत नसल्याचे पाहून सभापतिंना सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा स्थगित करावे लागण्याची वेळ आली आहे.
भारतीय लोकशाहीत विश्वासमत ठरावाच्या वेळी इतक्या मोठया प्रमाणावर नाटयपूर्ण घटना कदाचित पहिल्यांदाच घडल्या असतील. सभागृहात सत्ताधारी व विरोधकांनीही दुस-या दिवसाच्या सत्रात एकमेकांना बाजू मांडण्याची संधी मिळू दिलेली नाही. सततच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आज दिवसभरात 4 वेळा थांबवावे लागले आहे.
खासदारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपानंतर सभागृहात गोंधळ मर्यादेपलीकडे गेला असून त्यामुळे सभापतिंना चर्चाही रदद करावी लागली आहे. सायंकाळी 6 पर्यंत थांबलेल्या कामकाजास पुन्हा सुरूवात होताच. लाच प्रकरणावरून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी राजीनामा दयावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यास सत्ताधा-यांनी विरोध केला परिणामी गोंधळ वाढून कामकाज सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. कामकाज पुन्हा चालल्यास पंतप्रधान 7.30 वाजता आपली बाजू मांडणार असून 7.50 वाजता विश्वासमत ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.