शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (08:59 IST)

मुक्त विद्यापीठाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटींची मदत

कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीत मदतीसाठी कायम आघाडीवर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने करोना साथीविरूद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रूपयांची मदत  देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी आज याबाबत आज घोषणा केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला अनुसरून तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही मदत देत असल्याचे कुलगुरू वायूनंदन यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. ई. वायनंदन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा कोटी रुपये देण्याची काल शिफारस केली गेली. बैठकीस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडककर, वित्त अधिकारी श्री. एम.बी.पाटील उपस्थित होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते तात्काळ या प्रस्तावास मान्यता देण्यात येऊन ही मदत तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे ठरले.
 
कोरोना व्हायरस हा एक अभूतपूर्व उद्रेक आहे आणि जग सध्या या संकटाशी झगडत आहे. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आणि आरोग्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक लोक  व संस्था देणगी देत आहेत. अलीकडेच, महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देण्याबाबतचे आवाहन केले होते.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही मुक्त शिक्षणाकरिता उभारलेली सामाजिक चळवळ असून, सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ही जबाबदारी निभावत आली आहे. यापूर्वीही किल्लारीतील भूकंपग्रस्तांना भरीव मदत केलेली होती. तसेच मागील वर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना विद्यापीठाने एक विशेष पथक पाठवून धान्यसामुग्रीचे वाटप केले होते. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेले हे लोकविद्यापीठ सामाजिक जाणिवेतून सतत आपली जबाबदारी पार पाडत आले आहे.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभिनंदन : शिक्षणमंत्री उदय सामंत
 
महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाशी लढण्यासाठी राज्यातील विविध विद्यापीठांकडे असलेला आपत्कालिन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावा, असे आवाहन वजा विनंती मी काही दिवसांपूर्वी विविध विद्यापीठांना केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने १० कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी मी मुक्त विद्यापीठाचे तसेच कुलगुरू प्रा. ई वायूनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मला खात्री आहे, की अन्य विद्यापीठेही आपत्कालिन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देतील आणि करोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी हातभार लावतील.