रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

‘कोरोना’ संकट टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊननंतरच्या काळात सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शासन काम करत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्व:तची काळजी घेत स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
 
राज्यासह अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. सुमारे 75 दिवसानंतर राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून तो काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. याचबरोबर मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे,  वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, स्वत:मधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. कोरोना संकटात आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग, इतर शासकीय कर्मचारी व विविध स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले आहे. आपल्याला ही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असून महाराष्ट्र कोरोनामुक्त करावयाचा आहे. यासाठी प्रत्येकाने स्व:ताची काळजी घेणे आवश्यक आहे. या संकटसमयी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन करताना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले कि, राज्यात कोरोनासह चक्रीवादळाचे मोठे संकट आले असून यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व आरोग्यमंत्री हे नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रभावीपणे काम करत आहेत. प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून नागरिकांनीही गर्दी टाळून शासनाने सूचित केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाचे संकट निश्यितच दूर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.