विदर्भातील पाच जिल्ह्यांत कोरोना वाढला, परीस्थिती चिंताजनक
विदर्भातील पाच जिल्ह्यांत मागील दहा दिवसांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राज्याची उपराजधानी नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळचा समावेश आहे. १५ दिवसांपुर्वी या जिल्ह्यामध्ये दैनंदिन सरासरी कोरोनाचे ३५ ते ४० नवे रूग्ण आढळून येत होते. नागपुरात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा आकडा ६०० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे तर अमरावतीत ही संख्या ५०० च्या घरात आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात २०० च्या घरात तर यवतमाळमध्ये दैनंदिन कोरोना रूग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे.
नागपूर शहरात कोरोना संक्रमणाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल ५९६ नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर पाच मृत्यू झाले आहेत. त्यापैकी फक्त नागपूर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा ४९९ एवढा होता. त्यामुळे नागपूर महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागपूरकरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देतानाच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या बेफिकरी बदद्ल चिंता व्यक्त केली.