5 मिनिटात करोनाची टेस्ट, केंद्राकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी
आता एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती 5 मिनिटात मिळणार आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड टेस्टच्या माध्यमातून प्राथमिक चाचणीमध्ये एखाद्याला करोनाची लागण झाली आहे की नाही हे पाच मिनिटात कळू शकेल. करोनाची लागण झाली आहे का हे ब्लड टेस्टच्या पाच मिनिटात स्पष्ट होईल. शरीरातील रोगप्रतिकारकांच्या प्रमाणावरुन हे निश्चित केलं जाईल. अशात करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येचा अंदाज आल्यावर त्यांचं तात्काळ विलगीकरण करत उपचार केले जातील.