1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:48 IST)

नाशिकमध्ये भारतातील दुसरी BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा; २५ कोटींच्या मोबाईल व्हॅनचे होणार लोकार्पण

कोव्हीड सारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या वतीने BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. जवळपास २५ कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.भारतीताई प्रवीण पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कला मंदीर , शिवाजी रोड नाशिक येथे होणाऱ्या या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
याबाबत अधिक वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना.मनसुखभाई मांडवीया यांनी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) ही आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीची देशातील सर्वात मोठी योजना तयार केली आहे. या मिशनच्या वतीने BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. सदरील व्हॅनचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी DHR आणि ICMR चे महासंचालक प्रा.डॉ. बलराम भार्गव, DHR, सहसचिव श्रीमती अनु नगर ICMR-NIV चे शास्त्रज्ञ तसेच नाशिक येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
“जैव-सुरक्षा सज्जता आणि महामारी संशोधनाला बळकटी” देण्यासाठी देशात चार मोबाईल जैव सुरक्षा स्तर -3 (BSL-3) प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरने आहेत ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील कर्मचाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून या BSL-3 प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील. या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील ज्यामुळे समाजाला धोका कमी होईल. ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या उदया दरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल.
 
अलीकडच्या वर्षात आपल्या देशाला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागला. पश्चिम घाट प्रदेशात एव्हीयन इंफ्ल्यूएन्झा, क्यासनूर वनरोग, राजस्थान मध्ये झिका आणि केरळमध्ये निपाह विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाला होता. ही BSL-3 प्रयोगशाळा प्रादुर्भाव/ क्षेत्रतापासणी/अत्याधिक संसर्गजन्य/संभाव्यपणे प्राणघातक विषाणूंचा सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक आहे. जे भाग रेल्वे/रस्ते सेवेने चांगल्या पध्दतीने जोडले गेलेले नाहीत त्याभागात हे उपकरण वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान आणि अहवाल देण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही अत्याधुनिक जैव सुरक्षा प्रयोगशाळा (मोबाईल व्हॅन) उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यात प्रथमच उपलब्ध होत आहे. ना.भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रयत्नाने देशातील दुसरी व्हॅन नाशिकमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे याचा फायदा दुर्गम व आदिवासी भागातील सामान्य लोकांना होणार आहे.