खेळाडूंशी संबंध बिघडलेले नाहीत - मायकल क्लार्क
विश्वचषक स्पर्धा तोंडावर आली असताना तंदुरुस्तीच्या मुद्दय़ावरून आपले आणि संघातील खेळाडूंमधील संबंध बिघडले आहेत, या वृत्ताचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने इन्कार केला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने मायकल क्लार्क सहा आठवडे क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर प्रथमच क्रिकेट सामन्यात खेळताना क्लार्कने अर्धशतक झळकावले. क्लार्कच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने कसोटी मालिकेत चार शतके झळकावली, शिवाय आपल्या कुशल नेतृत्वाने संघाला विजयही मिळवून दिले. त्यामुळे स्मिथच्या नेतृत्वावर त्याचे सहकारी खूष आहेत. क्लार्कला स्वत:चेच वर्चस्व ठेवायचे आहे. यामुळे खेळाडू आणि क्लार्कमधील संबंध बिघडले आहेत, असे समजते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मायकेल क्लार्कला बांगलादेशविरुद्धच्या २१ फेब्रुवारी रोजी होणार्या सामन्यापर्यंत आपली तंदुरुस्ती सिद्ध करून दाखवावी, असे सांगितले आहे. दरम्यान, सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर मायकल क्लार्कच्या पाटीशी उभा राहिला आहे. तो म्हणाला, स्मिथने कर्णधार म्हणून छाप पाडली असली तरी त्याला अद्याप बरेच काही शिकायचे आहे. गेल्या तीन वर्षांत क्लार्कने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला घवघवीत यश मिळवून दिले आहे.