सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By वेबदुनिया|

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

ramdas swami
समर्थ रादासस्वामी यांनी दासबोध-मनोबोध- आत्माराम, अभंग या स्वरूपात ग्रंथाद्वारे भक्तिबोधाचे प्रसारकार्य केले. त्यापैकी मनोबोधात त्यांनी 205 श्लोक लिहिले असून ते ‘मनाचे श्लोक’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशा बिरूदावलीचे दहा श्लोक असून साधना कशी करावी, या विषयीचा उपदेश समर्थानी केला आहे. (लोक 67 ते 76) ‘प्रभात’चे अर्थ त्यातून प्रकटले आहेत. 

श्रीरामाची उपासना - समर्थ संप्रदायाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र हे असल्याने ‘राम’ नामानेच स्मररणोपासना केली जाते. हा रा कसा आहे? तर, तो ‘घनशाम हा राम लावण्यरूपी’ आहे. तो भक्तांची संकटे दूर करतो. म्हणून (1) गुरुभेट घडून येणे, हीच प्रभात होय. वयापेक्षा निर्धार महत्त्वाचा आहे. हा राम कोदंडधारी आहे. तो पराक्रमी आहे. त्यापुढे मानवाची काय कथा? पण मानव कोण? तर नाम मानवलेला तो मानव! (2) नाममंत्रप्राप्ती हीच प्रभात होय. त्यात आसनसिद्ध नामस्मरण अपेक्षित आहे. त्याला भक्तीभावे भजावे. भक्तीमध्ये नित्यपठन, विवेकी आचार, अहंकाराचा त्याग अपेक्षित आहे. तसे आचरण घडून येणे ही प्रभात होय. (3) हे नाम किती घ्याचे? तर ‘सदा रामनामे वदा पूर्णकामे’ याप्राणे नित्यनेमाने घ्यायचे आहे. त्यसाठी ‘मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा’ म्हणजेच आळस, निद्रा, अवांतर वा वायफळ गप्पा करू नयेत, हे बंधन पाळणे म्हणजेच प्रभात हो. (4) समर्थानी पुढे नामविषयी, नामस्मरणाविषयी, नामाच्या फलश्रुतीविषयी एक महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. ते सांगतात, ‘जयाचेनि नामे महादोष जाती। जयाचेनि नामे गती पाविजेती। जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।’(श्लोक 71) इथे ज्या नामाने महादोष म्हणजे अज्ञान जाईल, ज्या नामाने गती म्हणजे साधनेत प्रगती होईल, ज्या नामाने पुण्यठेवा म्हणजे जप-स्मरण-नेम-ध्यान या मार्गाने ईश्वरदर्शन होईल, ही खरी प्रभात होय. परमार्थाची ती जाग आणि जागृती होय. (5) पुढे गुरू व ग्रंथातून उपदेश करूनही कळत नसेल, तर मुखाने विनासायास नामाचे स्मरणसातत्य ठेवावे. (6) देहदंड नको, मनदंड करा - ‘यात्रा, उपवास, व्रत-वैकल्ये यामुळे देहदंड होतो आणि दु:खही पदरी पडते. मग त्यापेक्षा मनदंड करावा. म्हणजे निश्चायाने नामस्मरण करावे. कारण त्यासंदर्भात बोलायचे तर, प्रत्यक्ष सदाशिव (शंकर) तो सुद्धा रामनाम घेतो. मनदंड ही प्रभातच नव्हे का?’ (7) तन, मन, धनाने ‘दीनाचा दयाळू मनी आठवावा’ असे म्हणताना तन म्हणजे शारीरिक कृती, मन म्हणजे दिशा आणि धन म्हणजे बुद्धीचा निश्चय होय. मनाने आरंभ झाला का? कारण तीच प्रभात होय. (8) अन्यथा बुद्धी आणि शरीर हे निश्चय व कृती कशी काय करणार? परमार्थाचे सार कोणते? तर नामाने रामदर्शन होय. मग त्यासाठी उपासनेचा शोध आणि वेध घ्यायला नको कां? त्याविषयीचा संशय-संभ्रम नाहीसा व्हायला हवा. संशयविरहित साधना ही देखील प्रभात होय. (9) ज्ञानोदय होणे हीच खरी प्रभात होय. (10) तसे पाहिले तर मागील अनेक जन्म ही काळोखी रात्र असून श्रेष्ठ असा नरजन्म होणे हीच प्रभात आहे. कारण तरच परमार्थाला प्रारंभ होऊ शकतो. तीच ईश्वरदर्शनापूर्वीची पहाट (प्रभात) होय. त्यासाठी ‘म्हणे दास विश्वास नामी धरावा’ असा उपदेश समर्थानी या दहा लोकबंधात केला आहे.

नाम, गुरू, साधना यावर विश्वास ठेवून पारमार्थिक वाटचाल करता यावी, असा त्यांचा त्यामागील भक्तिविचार आहे. पहाट-सकाळ-माधान्य -सायंकाळ-रात्र ही स्थितीचक्रे परमार्थात असतातच! म्हणून अगदी लहानपणापासूनच प्रपंचाबरोबर परमार्थही करावा. कारण सायंकाळ आणि रात्र अशा वृद्धपणी परमार्थ होणार कसा? म्हणून प्रभाते रामचिंतन करावे, असे समर्थाचे सांगणे आहे.

प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे