रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (13:28 IST)

गुरुचरित्र – अध्याय नववा

॥ श्री गणेशाय नमः ॥
 
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन ।
विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥
 
श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा ।
विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा ।
तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥
 
भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव ।
विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥
 
नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती ।
लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥
 
ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण ।
लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥
 
वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स्नानासी ।
गंगा वहात असे दशदिशी । मध्ये असती आपण ॥७॥
 
तया गंगातटाकांत । रजक असे वस्त्रे धूत ।
नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥८॥
 
नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया ।
नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मे ॥९॥
 
वर्तता ऐसे एके दिवशी । आला रजक नमस्कारासी ।
श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥१०॥
 
श्रीपाद म्हणती रजकासी । का नित्य कष्टतोसी ।
तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी । सुखे राज्य करी आता ॥११॥
 
ऐकता गुरूचे वचन । गाठी बांधी पल्लवी शकुन ।
विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ॥१२॥
 
रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता ।
दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥
 
ऐसे बहुत दिवसांवरी । रजक तो सेवा करी ।
आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमे येणे विधी ॥१४॥
 
असता एके दिवशी देखा । वसंतऋतु वैशाखा ।
क्रीडा करीत नदीतटाका । आला राजा म्लेछ एक ॥१५॥
 
स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण ।
क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ॥१६॥
 
सर्व दळ येत दोनी थडी । अमित असती हस्ती घोडी ।
मिरविताती रत्‍नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥
 
ऐसा गंगेच्या प्रवाहात । राजा आला खेळत ।
अनेक वाद्यनाद गर्जत । कृष्णावेणि थडियेसी ॥१८॥
 
रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित ।
असे गंगेत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥१९॥
 
विस्मय करी बहु मानसी । जन्मोनिया संसारासी ।
जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥
 
धन्य राजयाचे जिणे । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥
 
कैसे याचे आर्जव फळले । कवण्या देवा आराधिले ।
कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥
 
ऐसे मनी चिंतित । करीतसे दंडवत ।
श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ॥२३॥
 
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । जाणोनि अंतरी त्याची स्थिति ।
बोलावूनिया पुसती । काय चिंतिसी मनांत ॥२४॥
 
रजक म्हणे स्वामीसी । देखिले दृष्टी रायासी ।
संतोष झाला मानसी । केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥
 
पूर्वी आराधोनि देवासी । पावला आता या पदासी ।
म्हणोनि चिंतितो मानसि । कृपासिंधु दातारा ॥२६॥
 
ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी ।
चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥
 
श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी ।
वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ॥२८॥
 
निववी इंद्रिये सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ ।
बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरी परियेसी ॥२९॥
 
तुष्टवावया इंद्रियांसी । तुवा जावे म्लेछवंशासी ।
आवडी जाहली तुझे मानसी । राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥
 
ऐकोनि स्वांमीचे वचन । विनवी रजक कर जोडून ।
कृपासागरू तू गुरुराज पूर्ण । उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥
 
अंतरतील तुझे चरण । द्यावे माते पुनर्दर्शन ।
तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥
 
श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरी जन्म घेसी ।
भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आम्हा ॥३३॥
 
भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होल तुझे मानसी ।
न करी चिंता भरवसी । आम्हा येणे घडेल ॥३४॥
 
आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊ परियेसी ।
वेष धरोनि संन्यासी । नाम नृसिंहसरस्वती ॥३५॥
 
ऐसे तया संबोधूनि । निरोप देती जाय म्हणोनि ।
रजक लागला तये चरणी । नमस्कारीत तये वेळी ॥३६॥
 
देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती ।
इह भोगिसी की पुढती । राज्यभोग सांग मज ॥३७॥
 
रजक विनवीत श्रीपादासी । झालो आपण वृद्धवयेसी ।
भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड राज्यभोग ॥३८॥
 
ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥
 
निरोप देता तया वेळी । त्यजिला प्राण तत्काळी ।
जन्माता झाला म्लेछकुळी । वैदुरानगरी विख्यात ॥४०॥
 
ऐसी रजकाची कथा । पुढे सांगून विस्तारता ।
सिद्ध म्हणे नामधारका आता । चरित्र पुढती अवधारी ॥४१॥
 
ऐसे झालीया अवसरी । श्रीपादराय कुरवपुरी ।
असता महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ॥४२॥
 
महिमा सकळ सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥४३॥
 
महत्त्व वर्णावया श्रीगुरूचे । शक्ति कैची या वाचे ।
नवल हे अमृतदृष्टीचे । स्थानमहिमा ऐसा ॥४४॥
 
श्रीगुरु राहती जे स्थानी । अपार महिमा त्या भुवनी ।
विचित्र जयाची करणी । दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥
 
स्थानमहिमाप्रकार । सांगेन ऐक एकाग्र ।
प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥
 
ऐसे कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरी ।
कारण असे पुढे अवतारी । म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥
 
आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥४८॥
 
लौकिकी दिसती अदृश्य जाण । कुरवपुरी असती आपण ।
श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तिचा अवतार ॥४९॥
 
अदृश्य होवोनि तया स्थानी । श्रीपाद राहिले निर्गुणी ।
दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥५०॥
 
जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ ।
कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥
 
सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसी ।
सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥५२॥
 
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥
 
॥ ओवीसंख्या ॥५२॥
 
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

गुरुचरित्रअध्यायदहावा