1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

श्रीदत्त उपनिषद - अध्याय चवथा

एकान्ती उगेच बैसावे । तेथे समजोनी पाहावे । अखंड घ्यावे सोडावे । प्रभंजनासी ॥१॥
धरिता ‘ सो ’ सांडिता ‘ हम्‍ ’ । अखंड चाले सोऽहम्‍ सोऽहम्‍ । हे निर्गुणाचे ध्यान । सहजची पाहा होत असे ॥२॥
पाहो जाता सावध । सोऽहम्‍ सोऽहम्‍ ऐसा नाद । उच्चारेविण सहज शब्द । ध्वनी पाहा होतसे ॥३॥
ऐसे धरिता सोऽहम्‍ पण । तै चित्ती प्रकटे चैतन्यघन । तेव्हा मनही होई उन्मन । बुद्धी रमे परब्रह्मी ॥४॥
समूळ मावळल्या देहभान । कैची बुद्धी कैचे मन । बुडे चित्ताचे चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥५॥
नासापुटातुनी पवन । करी अधोर्ध्व गमन । त्यामाजी हंसा सोऽहम्‍ उत्पन्न । अजपा मंत्र असे की ॥६॥
प्राणाचे गमनागमन । तेथे स्थिर करावे मन । हे अजपा अनुसंधान । योग शास्त्री बोलीले ॥७॥
ऐसा अभ्यास करिता । आधारादी षड्चक्र देवता । प्रसन्न होऊनी त्वरिता । दर्शन साधका देताती ॥८॥
करणीवीण जप अजपा म्हणोन । याचे करिता अनुसंधान । प्राप्त होई निर्वाण । साधक मुक्त होत असे ॥९॥
ॐ नमोजी अनादि हंसा । हंसरुपा जगदीशा । तू सदगुरु परमहंसा । परम परेशा परिपूर्णा ॥१०॥
तू सर्व भूती समान । हंस स्वरुपी जनार्दन । तुझे वंदिता निजचरण । जन्म मरण पळाले ॥११॥
चुकवावया जन्ममरण । करावे सोऽहम्‍ हंसाचे स्मरण । हे साधन विलक्षण । सावधान साधावे ॥१२॥
प्राणाचे गमनागमन । तेचि सोऽहम्‍ हंसा ध्यान । चुके जन्म मरण । सावधाने साधी जो ॥१३॥
ॐ सोऽहम्‍ मुक्तीदाता । सोऽहम्‍ ब्रह्म भागवत भारता । सोऽहम्‍ ब्रह्मज्ञान दाता । सोऽहम्‍ हाचि परमार्थ ॥१४॥