मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

श्रीदत्त उपनिषद - अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः ॥ आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा ॥ स्वये नारायण जाणा । सोऽहम्‍ ध्यान करितसे ॥१॥
ऐका ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान । पाहावे आपणासी आपण । सोऽहम्‍ ध्यान करोनिया ॥२॥
आपणासी पाहो जाता । अंगी बाणे सर्वज्ञता । आपले मूळ स्थान शोधिता । शुद्ध स्वरुप मिळतसे ॥३॥
आपला आपणासी लाभ । हे ज्ञान परम दुर्लभ । जे आदि अंती स्वयंभ । स्वरुपची स्वये ॥४॥
मी कोण ऐसा हेत । धरुनी पाहाता देहातीत । अवलोकिता नेमस्त । स्वरुपची होये ॥५॥
निर्विकल्पासी कल्पावे । कल्पना मोडे स्वभावे । मग नसोनि असावे । कल्पकोटी आपणची ॥६॥
निर्विकल्पासी कल्पिता । नुरे कल्पनेची वार्ता । स्वयंभूसी भेटू जाता । स्वये ब्रह्म होईजे ॥७॥
ऐसे ब्रह्म शाश्वत । जेथे कल्पनेसी अंत । येथे द्वैत आणि अद्वैत । काहीच जाणा नुरतसे ॥८॥
द्वैत पाहाता ब्रह्म नसे । ब्रह्मा पाहाता द्वैत नासे । द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी आपुल्या ॥९॥
जाणे ब्रह्म जाणे माया । ते एक जाणावी तुर्या । सर्व जाणे म्हणोनिया । सर्व साक्षिणी तिज म्हणती ॥१०॥
ज्ञान म्हणजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । सोऽहम्‍ ध्याने अद्वैत । आपोआप मिळतसे ॥११॥
सदा स्वरुपानुसंधान । करी द्वैताचे निरसन । ब्रह्मज्ञान आत्मज्ञान । आपैसे जाण होतसे ॥१२॥
परब्रह्म अद्वैत । कल्पना दावी द्वैत । कल्पना जेव्हा मरत । ब्रह्म सर्वत्र दिसतसे ॥१३॥
स्वरुपानुसंधान बळे । सगळी माया नाढळे । तयाचा पार नकळे । हरिहर ब्रह्मादिकांसी ॥१४॥
तुर्या जव परिपक्क होत । मन आपणासी विसरत ॥ उन्मनी अवस्था प्राप्त । तेव्हा साधका होत असे ॥१५॥
उन्मनी अवस्था होता प्राप्त । साधक निर्गुण होत । परब्रह्म अवस्था तया प्रत । प्राप्त जाणा होतसे ॥१६॥
परब्रह्म अवस्था पचविता । सहजावस्था ये हाता । करोनी अकर्ता भोगोनी अभोक्ता । महासिद्ध ऐसा होतसे ॥१७॥
स्वरुपानुसंधान करिता । ऐसी अवस्था ये हाता ॥ म्हणौनी अहर्निश चित्ता । स्वरुप ध्यानी ठेवावे ॥१८॥