मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा

प्राप्त व्हावया ब्रह्मज्ञान । अति गुह्य आहे अनुष्ठान । सोऽहम्‍ हंसाचे साधन । सावधान जो साधी ॥१॥
प्राणाचेनि गमनागमने । सोऽहम्‍ हंसाचेनि स्मरणे । सावधाने जो साधू जाणे । तेणे पावणे हे स्थान ॥२॥
त्यासीच पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजी चढे । तेथोनिही मार्ग काढी पुढे । अति निवाडे अचूक ॥३॥
सोऽहम्‍ हंसा ब्रह्म । ऐसे करावे गायन । कूटस्थी ठेवावे मन । ब्रह्मपद तो पावे ॥४॥
कूटस्थी ठेविता मन । प्राण करी उर्ध्वगमन । तेथोनी पुढे महाशून्य । मार्ग आपैसे मिळतसे ॥५॥
समूळ नासता देहभान । निर्विकल्प होई मन । हेचि समाधि साधन । सोऽहम्‍ ध्यानी साधावे ॥६॥
होता चिदाकाश दर्शन । स्थिर करावे तेथे मन । हे परब्रह्माचे साधन । सावधान साधावे ॥७॥
जाहलिया आनंद पद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त । चिदाकाशी चित्त । अति सावचित्त ठेवावे ॥८॥
चिदाकाश चित्त चिंतन । हेही सांडोनि भेद ध्यान । स्वये चिदात्मा होऊन । परमानंदी राहातसे ॥९॥
प्रथम शून्य रक्त वर्ण । त्याचे नांव अधः शून्य । उर्ध्व शून्य श्वेत वर्ण । मध्य शून्य श्यामवर्ण ॥१०॥
महाशून्य नीलवर्ण । त्यात स्वरुपचि केवळ । चारी वाचा कुंठीत झाली । सोऽहम्‍ ज्योत प्रकाशली ॥११॥
रक्त वर्ण त्रिकूट जाण । श्रीहाट श्वेत वर्ण । गोल्हाट श्याम वर्ण । औटपीठ नील वर्ण ॥१२॥
वरी भ्रमर गुंफा आहे । दशमद्वारी दत्त राहे । भेदिता नवद्वाराते । दत्त दर्शन होतसे ॥१३॥
निर्विचार निर्विकल्प निश्चिंत । होवोनी राहावे सावचित्त । चित्त होता कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होतसे ॥१४॥