मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. दिलीप चित्रे
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (16:29 IST)

चतुरस्त्र 'दिपु'

PR
PR
दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी बडोद्यात झाला. त्यांचे वडिल हे साहित्यिक अभिरूची जपणारे होते. अभिरूची नावाचे एक नियतकालिकही ते चालवायचे. पुढे १८५१ मध्ये चित्रे कुटुंबिय बडोद्याहून मुंबईत स्थळांतरीत झाले. त्यानंतर साहित्यिक म्हणून ते वेगाने पुढे येऊ लागले. दिपुंचा पहिला कवितासंग्रह १९६० साली प्रकाशित झाला. मराठीत साठीच्या दशकात लघुनियतकालिकांची एक चळवळ सुरू झाली. दिपु या चळवळीचे एक अध्वर्यू होते. अरूण कोलटकर आणि रमेश समर्थ यांच्या जोडीने त्यांनी 'शब्द' हे लघुनियतकालिक सुरू केले.

पुढे १९७५ साली अमेरिकेतील आयोवा शहरातील विद्यापीठाने त्यांना आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. इंडियन पोएट्री लायब्ररीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच भोपाळच्या भारतभवन या कला वास्तूच्या स्थापनेतही चित्रेंचा मोठा वाटा आहे. त्यांनी नवी दिल्लीत जागतिक कवींचे संमेलनही भरवले होते.

त्यांच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द केज हा त्यांचा इंग्रजी कवितांचा संग्रह. 'एन एंथ्रोपॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री' हा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला. भाषांतराच्या बाबतीतही दिपुंनी फार थोर काम केले आहे. संत तुकारामांच्या अभंगाचा 'सेज तुका' या नावाने अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाने तुकोबांना 'ग्लोबल' केले. केवळ तुकारामच नव्हे तर ज्ञानेश्वरांचे अनुभवामृतही त्यांनी इंग्रजीत नेले. त्यांची अनेक पुस्तके हिंदी, गुजराती, जर्मन भाषांत अनुवादित झाली. अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांसाठी त्यांनी मराठी व इंग्रजीतून स्तंभलेखन केले. शब्द या लघुनियतकालिकाच्या संपादनाबरोबर 'न्यू क्वेस्ट'चेही ते संपादक होते.

'दिपुं' चा ओढा चित्रपटांकडेही होता. गोदान हा त्यांनी बनविलेला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या सर्व बाजू त्यांनी सांभाळल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी डझनभर वृत्तपट आणि कित्येक लघुचित्रपट तयार केले. वीस व्हिडीओ डॉक्युमेंटरी फिचर्स त्यांच्या नावावर आहेत. अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा त्यांनी लिहिले आणि अनेकांच्या दिग्दर्शनातही सहभाग घेतला. गोविंद निहलानी दिग्दशित शशी कपूर अभिनित 'विजेता'ची पटकथाही त्यांचीच होती.

अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक पु्स्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. कित्येक संस्थांवर त्यांच्या नेमणूकाही झाल्या आणि अनेक संस्थांवर त्यांना मानद सदस्यत्व, संचालकपद आदी पदे देण्यात आली होती. जगभरातील अनेक देश त्यांनी पालथे घातले होते. त्याचवेळी भारतही उभा-आडवा फिरले होते.