फडणवीस म्हणतात, अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
फडणवीस म्हणाले की, चहापानाचे निमंत्रण आम्हाला मिळाले. रोकशाही आणि रोखशाहीवर केवळ ज्यांचा विश्वास आहे आणि जे लोकशाही पायदळी तुडवत आहेत, अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. तसेच ते म्हणाले की, शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना. आहे. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस यांनी म्हटले की, राज्यसभेतील निलंबन आणि विधानसभेतील निलंबन यात मोठे अंतर आहे. तेथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. प्रकरण समितीपुढे गेले, पुरावे गोळा केले गेले आणि नंतर निलंबन झाले, तेही एका अधिवेशनासाठी. याला लोकशाही म्हणतात. महाराष्ट्रात यापैकी काहीच झाले नाही, याला तानाशाही म्हणतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. पण गेल्या २ वर्षांपासून राज्यात सरकारचे अस्तित्व आहे तरी कुठे? असा प्रश्न त्यांनी विचारला. मोदी सरकारने दिलेले पैसे शेतकऱ्यांना अजून महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाही आणि रोज सकाळी खोटे बोलत बसायचे की केंद्र सरकार पैसे देत नाही, याचाही पर्दाफाश करणार असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.