मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: ऐझवाल , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:00 IST)

कॉंग्रेसची मिझोरममध्ये विजयाकडे वाटचाल

मिझोरममध्ये कॉंग्रेसने सरकारविरोधी जनभावनेच्या लाटेवर स्वार होत सत्तेच्या दिशेने वाटचाल चालवली आहे. पक्षाने ४० सदस्यीय विधानसभेत आतापर्यंत १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

राज्याचे तीनवेळचे मुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेस प्रमुख लाल थनहवला यांनी दक्षिण तुयपुई आणि सर्चिप या दोन्ही मतदारसंघातून विजयी घोडदौड केली आहे. त्यांनी स्पर्धक जे लालचुआना आणि सी लालरामझाउआ यांचा पराभव केला आहे.

मावळत्या विधानसभेत कॉंग्रेसचे ९ आमदार होते. पक्षाच्या बालेकिल्ल्यात घोडदौड करतानाच मिझो नॅशनल फ्रंटच्या कोलासीब प्रांतातही कॉंगसने शिरकाव केला आहे. मिझो नॅशनल फ्रंटला या निवडणूकीत जबरदस्त धक्का बसला आहे.

पक्षाचे अध्यक्ष आणि दोनवेळचे मुख्यमंत्री झोर्माथंगा यांना कॉंग्रेसचे उमेदवार टी टी झोथानसंगा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. प्रतिष्ठेच्या उत्तर चांपाई मतदारसंघातून ते पहिल्यांदाच लढणार्‍या उमेदवाराकडून पराभूत झाले.

झोर्माथंगा हे दक्षिण चाम्फाई मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून येथील निकाल यायचा आहे. कॉंग्रेसच्या विजयाने येथील कॉंग्रेस भवनात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.