मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By

Navratra Essay in Marathi नवरात्र निबंध

devi
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठया उत्साहात आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यावर पितृ पंधरवड्यानंतर आतुरतेने नवरात्रीच्या उत्सवाची वाट बघतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते.या नवरात्राला शारदीय नवरात्र असे ही म्हणतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळ देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.
 
या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. अखंड नऊ दिवस देवीआईची मनोभावे सेवा पूजा,आरती केली जाते. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो.एका परडीमध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात.त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात. या घटात आंब्याची किंवा नागलीची (विड्याची)पाने ठेवतात.त्यावर नारळ ठेवला जातो. देवीचे टाक ठेवतात.त्याच्यापुढे 5 फळे ठेवतात. या घाटाला झेंडूच्या फुलांची माळ घालतात.     
 
देवीपुढे अखंड दिवा तेवत ठेवला जातो.मनोभावाने देवीआईची उपासना आरती केली जाते. काही लोक नऊ दिवस अनवाणी राहतात.काही निराहार उपास करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते. काही काही घरात पंचमी काही घरात षष्ठीचा फुलोरा करतात.या मध्ये देवीच्या वर कडकण्या बांधतात.  
 
नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी आईला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवतात.हे नाय रंग धर्मशास्त्रज्ञांनी ठरविले असतात.देवीआईला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात.त्या मागील कारण असे की देवी आईने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुराचे वध केले होते.
 
नवरात्राच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळात गरब्याचे आयोजन केले जाते. सोसायटींमध्ये बायका भोंडल्याचे आयोजन करतात. या मध्ये एका पाटावर हत्ती काढून त्याच्या अवती भवती फेर धरला जातो.आणि भोंडल्याची गाणी म्हणतात. बायका आपापल्या घरून खाण्याच्या वस्तू आणतात आणि त्या ओळखायच्या असतात.त्याला खिरापत असे म्हणतात.
 
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीआईच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते.बायका देवीआईची खणा नारळाने ओटी भरतात. काही देवीआईचे भक्त घरोघरी जाऊन जोगवा मागतात. 
 
अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात.यालाच दसरा असे ही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे.असत्यावर सत्याच्या विजयचा प्रतीक आहे दसरा. या दिवशी रामाने रावणाचे वध केले होते. या दिवशी रावण, मेघनाथ, कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करतात. आपट्याची पाने आणतात आणि घरात तांदुळाचा बळी बनवून बळीचा वध करतात. या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन कामे हाती घेतली जातात. यादिवशी पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली जाते. सरस्वतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. आपट्याची पाने मित्र मंडळींना, गुरूंना, मोठ्या माणसांना  देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. तसेच यादिवशी व्यापारी, कामगार आपल्या शस्त्रात्रांची पूजा करतात. अशाप्रकारे हा नवरात्रीचा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.