बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By अभिनय कुलकर्णी|
Last Modified: औरंगाबाद, १ सप्टेंबर (हिं.स.) - , मंगळवार, 1 सप्टेंबर 2009 (15:21 IST)

शांतीगिरी महाराजांमुळे राजकीय पक्ष अशांत!

लोकसभा निवडणुकीत बहुचर्चित ठरलेले वेरूळ येथील संत जनार्दन आश्रमाचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज येत्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. महाराजांचा भक्तवर्ग संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात आणि शेजारच्या नाशिक जिल्ह्यात असला तरी वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या तीन मतदारसंघात महाराजांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने महाराजांशी सर्व राजकीय पक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराजांची भेट घेतल्याने शांतिगिरी महाराजांची भूमिका कुतुहलाचा विषय बनला आहे.

वेरूळ येथील संत जनार्दन आश्रमाचा मोठा भक्तवर्ग औरंगाबाद, नाशिक व आजुबाजुच्या परिसरात विखुरलेला आहे. जय बाबाजी भक्त परिवार या नावाने हा भक्तसमुदाय ओळखला जातो. या भक्तांचे संघटन मजबूत आहे. आश्रमाची शेकडो एकर शेती आहे. वर्षभराचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार रोज एकदोन गावातील भक्त येवून शेतात पडेल ते काम करून या जमिनीची मशागत करतात. यात बेशिस्त, गोंधळ कधीच होत नाही हे बोलके उदाहरण महाराजांच्या भक्तांची संघटीत शक्ती दर्शविण्यासाठी पुरेसे आहे. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज हे स्वतः मौन धारण करतात.म्हणूनच त्यांना मौनगिरी महाराज असेही संबोधले जाते. महाराजांचा भक्तवर्ग राजकारणातही मोठ्या संख्येने सर्व राजकीय पक्षात विखुरला आहे. खुद्द खा. चंद्रकांत खैरे हे महाराजांचे भक्त आहेत. मात्र स्वतः महाराज गेल्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिल्याने त्यांच्यातील संबंध दुरावले होते.

लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांनी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली असली तरी गंगापूर आणि वैजापूर मतदार संघात महाराजांनी लक्षणीय आघाडी प्राप्त केली होती. वैजापूर मतदारसंघात शातिगिरी महाराजांना ६६ हजार ४९० मते तर खा. चंद्रकांत खैरे यांना ३४ हजार ७५८ मते मिळाली होती. गंगापूर मतदारसंघात शांतिगिरी महाराजांना ४० हजार ७७९ मते तर खा. खैरे यांना ३५ हजार ५८ मते मिळाली होती. गंगापूर मतदारसंघात पाच हजाराची तर वैजापूर मतदारसंघात ३१ हजारांची भरघोस आघाडी घेतल्याने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराजांच्या भूमिकेला महत्व आले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांची आघाडी कमी करण्याइतका प्रभाव महाराजांनी दाखविला. तसेच एकूणच राजकीय वर्तुळात महत्वाचे स्थान निर्माण करण्याइतपत आपली क्षमताही त्यांनी सिद्ध केली.

सध्या गंगापूर व वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे अनुक्रमे अण्णासाहेब माने आणि आर. एम. वाणी हे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक शांतिगिरी महाराजांनी मुंबई येथे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या बातम्या झळकल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हेही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे महाराज शिवसेनेत प्रवेश करणार आणि वैजापूर मतदारसंघात महाराजांना शिवसेना उमेदवारी देऊन आमदार करणार अशा अटकळी बांधल्या जावू लागल्या. वैजापूरचे शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांनी लोकसभा निवडणुकीत खा. खैरे यांच्या ऐवजी आतून महाराजांनाच मदत केली असा संशय व्यक्त केला जात होता. महाराजांचेच काम करायचे ना मग येत्या विधानसभेत स्वतः तिकीट घेण्याऐवजी महाराजांचेच काम करा असा डाव टाकून शिवसेनेतील वरिष्ठ नेते महाराजांनाच वैजापूरचे तिकीट देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाऊ लागले होते.

मात्र नुकतेच आर. आर. पाटील वेरूळ येथे आले असता त्यांनी शांतिगिरी महाराजांची गुप्त भेट घेतल्याच्या बातम्या झळकल्या. आदिकही त्यांच्यासोबत होते. आदिकांचे मुलाच्या आमदारकीसाठी प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. महाराजांनी आर. आर. पाटील यांची भेट घेतल्याने महाराजांच्या मनात नेमके काय आहे ? याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. महाराजांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यास आग्रह करणारे आणि त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी खा. रामकृष्ण बाबा पाटील व माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर हे महाराजांना काय सल्ला देतात किंवा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महाराज आपले वजन किती व कसे खर्च करतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

वैजापूर आणि गंगापूर मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाची झालेली पुनर्रचना, उमेदवारांचे अंतिम चित्र कसे असेल यावर जरी निवडणुकीचे गणित अवलंबून आहे तथापि सध्या तरी महाराजांची भूमिका हाही त्यातील एक कळीचा मुद्दा असल्याने ते काय भूमिका घेतात यावरच पुढचे सर्व चित्र स्पष्ट होईल.