शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मागोवा 2011
Written By वेबदुनिया|

विश्वकरंडकाचे स्वप्न २८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात

ND

२०११ हे वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये सोनेरी पहाट घेऊन आले. १९८३ नंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २०११ या वर्षांची नोंद सुवर्णाक्षरात झाली...

महेंद्रसिंह धोनीने तब्बल २८ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीयांचे विश्वकरंडकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २ एप्रिल २०११ हा दिवस सुवर्णअक्षराने लिहिल्या गेला. कपील देवने १९८३ मध्ये पहिला विश्वकरंडक मिळवून दिल्यानंतर २०११ मध्ये भारतीय क्रिकेटला पडलेले हे सुंदर स्वप्न होय.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ४९ व्या षट्कातील पहिल्या चेंडूवर षट्कार खेचल्याबरोबर देशभर विजयोत्सव साजरा झाला. सलामीवीर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी दरम्यान झालेल्या १०९ धावांच्या भागीदारीने भारतीय विजयरथ विश्वकरंडकाच्या द्वारावर धडाडला. कोहली आणि गंभीर यांनी केलेल्या ८३ धावांच्या भागीदारीने २७५ धावांच्या लक्षाचा पाठलाग संघाने धीरोदात्तपणे केला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कामगिरीचा आलेख उंचावत संपूर्ण स्पर्धेत आव्हान कायम राखले आणि फायनलमध्ये श्रीलंकन वाघांना चारीमुंड्या चीत केले.

युवराजची नजर लावणारी कामगिर
युवराजने विश्वकरंडकात अद्वितीय कामगिरी करताना ३६२ धावा आणि १५ बळी नोंदवून भारताच्या विश्वकरंडक मोहिमेत महत्त्वाचा वाटा उचलला. धोनीच्या नेतृत्वात आणि सचिनपासून प्रेरणा घेत तो विश्वकरंडकात स्वप्नवत खेळला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात युवराजच्या या कामगिरीची सुवर्णाक्षरात नोंद होईल. युवराज सिंह त्याच्यां संपूर्ण कारकीर्दीत इतका चांगला खेळला नसणार. युवराज विश्वकरंडकात स्पर्धेतील सवौत्तम क्रिकेटपटू ठरला यातूनच भारतीय विश्वकरंडक मोहिमेत त्याच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखीत होते.

धोनीची कप्तानी खेळी
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विश्वकरंडक फायनलमध्ये कारकीर्दीतील सवौत्तम खेळी केली. दमदार नाबाद ९१ धावा करत त्याने विजयरथाचे धैर्याने नेतृत्व केले. करंडकात फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही फायनलमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन धडाकेबाज खेळ करत प्रेरक नेतृत्वाचा ठसा उमटवला. 'लिडिंग फ्राम द फ्रंट'चे यापेक्षा चपखल उदाहरण विरळेच. तमाम देशवासीयांच्या आकांक्षेचे वारे पंखात घेऊन त्याने सहकार्‍यांना 'कम ऑन इंडिया'ची साद घातली आणि अभिमानने विश्वकरंडक उंचावल्यावरच श्वास घेतला!

नेतृत्व ठरले निर्णायक
कपीलनंतर भारतीयांचे क्रिकेट विश्वकरंडकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले ते महेंद्रसिंह धोनीने. धोनी करिश्माई नेतृत्वाचा धनी आहे. त्याच्यात नैसर्गिक नेतृत्वक्षमता आहे. डावपेच आणि व्यहरचनेत तो वाकबगार आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून त्वरित निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. सहकार्‍यांमधील क्षमता हेरून त्याचा आपात्कालीन परिस्थितीत उपयोग करण्याचा धोरणीपणा त्याच्यात आहे. सहकार्‍यांच्या क्षमतेवर त्याचा प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच कपीलनंतर विश्वकरंडकावर नाव कोरले ते धोनीने.

निपून व प्रखर नेतृत्वच विश्वकरंडक जिंकून देते हा इतिहास आहे. नाहीतर १९८३ मध्ये भारत वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघास पराभूत करून विश्वकरंडक पटकावू शकला नसता. कपील देवच्या अलौकिक नेतृत्वानेच ते असाध्य लक्ष्य प्राप्त केले होते. दोन वेळच्या विश्वविजेत्या संघास आपण हरवू शकतो हा आत्मविश्वास संघात भरण्यात तो यशस्वी झाला होता. त्याच्या प्रेरक नेतृत्वाने संपूर्ण संघ भारला होता. मोक्याच्या वेळी सवौत्तम देण्याची ईर्ष्या त्याने प्रत्येक खेळाडूत जागवली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही, हे कपीलनेच भारतीयांना शिकवले. या विश्वकरंडकात झिम्बाब्वेविरूद्ध भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत रूतला असताना १७५ धावांची नाबाद खेळी करून त्याने विजय खेचला होता. फायनलमध्ये रिचर्ड्सचा अविश्वसनीय झेल घेऊन विंडीजचा विजयरथ रोकण्याची कामगिरीही त्यानेच केली होती. अद्वितीय नेतृत्वक्षमतेसोबतच प्रेरक कामगिरीने त्याने संघसहकार्‍यांसमोर आदर्श घालून दिला होता.