शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

शोध गणेशरूपाचा

प्रत्येक हिंदू म्हणविणाऱ्याच्या अंत:करणांत गणपतीबद्दल पूज्यत्वभाव पूर्णपणे असतो. हे दैवत विघ्नांचे हनन करण्यास सर्वथैव समर्थ असल्यामुळे नित्यपूजेच्या पंचायतनांत त्याचा समावेश झाला आहे. सर्व शुभाशुभ संस्कारांत गणेशपूजा ही प्रारंभी व्हावयाची. या देवतेची व्याप्ती नेपाळांतील लौडी गणेशापासून रामेश्वर येथील गणेशमूर्तीपर्यंत आढळते. याचे कारण शैव व वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक या देवतेस भजत असून आपआपल्या मताप्रमाणे कोणी त्यास शिवस्वरूप तर कोणी विष्णूस्वरूप समजतात. भारतात प्रत्येक गावात विघ्नहर्त्या गणपतीचे देवालय असून कित्येक त्याला कुलदेव मानतात. तमिळनाडूत त्याला तुंबिकाई अलवर म्हणजे बुद्धिवान गजानन असे म्हणतात. तंजावर येथे गणपतीचे प्रसिद्ध देवालय आहे. त्रिचनापल्ली येथील उच्छि पिल्लेयर हे गणपतीचे देवालय अत्यंत भव्य व सुंदर आहे. अनेक संस्कृत व प्राकृत ग्रंथारंभीं गणेशस्तवन केलेले आढळते. मराठींत गणेशप्रताप, गणेशलीलामृत, गणेशभागवत, गणेशपुराण, गणेशविजय वगैरे जुने ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांची श्लोकसंख्या दीड लक्षाहून अधिक होईल. 
गाणपत्य पंथ
या देवतेच्या भक्तीचा जो निराळाच पंथ आहे तो गाणपत्य पंथ या नांवाने संबोधला जातो. यासंबंधाची माहिती अशी आहे की, वेदांतील रुद्र हा मरुत् वगैरे अनेक गणांचा अधिपति असे मानण्यात येत असे. या गणांत रुद्राचेच गुण वास करीत असल्याचे मानून त्यांना देखील रुद्र असे म्हणत. या रुद्रांचा किंवा गणांचा एक नायक असे, त्याला गणपती हे नांव देण्यात आले होते. अथर्वशीर्ष उपनिषदांत अनेक देव व भूतांस रुद्र असे म्हटले आहे. यांपैकी विनायक हे एकाचे नांव आहे. विनायक हा सर्व ठिकाणी असून मनुष्यमात्रांच्या कृत्यावर त्याची नजर असते असे महाभारतांत (अनुशासनपर्व) सांगितले आहे. विनायक, गणेश्वर किंवा गणपती अनेक असल्याचा उल्लेख असून विनायकांची प्रार्थना केली असता ते संकटाचे निवारण करून कार्यसिद्धी करून देतात. यामुळे त्यांना सिद्धिविनायक हे नांव प्राप्त झाले. मानवगृह्यसूत्रांत चार विनायक असल्याचे सांगितले असून त्यांचा संचार अंगात झाला असता स्त्रीपुरुषांच्या हातून विलक्षण कार्ये घडतात असा उल्लेख आहे. त्यांचा कोप झाला असता मुले मृत्युमुखी पडतात व इतर प्रकारची हानी होते.  

रुद्र व ब्रह्मदेव यांनी विनायकास गणांचा नायक नेमले. अंबिका ही विनायकाची माता असून तिलाही पूजा अर्पण करावी असे याज्ञवल्क्याचे मत आहे. यावरून दिसून येईल की विनायक हा रुद्राप्रमाणेच भयानक परंतु प्रसन्न करून घेतल्यास हित करणारा आहे असे मानण्यात येत असे. गृह्यसूत्रें लिहिली गेली त्या वेळीं चार विनायक असल्याचे समजत असत. स्मृतिकाली एकच विनायक आहे असे ठरविण्यात येऊन त्याची माता अंबिका आहे असे मत बनले. विनायकाची कृत्ये, त्याला देण्‍यांत येणार्‍या मत्स्यमांसादिक बलींचा प्रकार, हे सर्व पाहिले असता त्याला भूतपिशाच्चादिकांचा नायक किंवा पुढारी समजत असत हे सिद्ध होते.  

पौराणिक काली गणपति-विनायक हा हिंदूंचा अत्यंत पूज्य देव झाला. तो विघ्नहर्ता आहे याच दृष्टीने सर्व त्याच्याकडे पाहू लागल्यामुळे कार्यारंभी त्याचे चिंतन करणे हा सर्व शुभाशुभ कृत्यांतील एक अत्यावश्यक विधी होऊन बसला. ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या शतकापर्यंत गणपति-विनायकाची महती वाढली नव्हती व त्यानंतर त्याची पूजा अर्चा करण्याचा प्रघात पडला असे डॉ. भांडारकरांचे मत आहे. जोधपूरच्या वायव्येस 22 मैलांवर घटियाला येथे विक्रम संवत् 918 (इ.स. 862) त बांधलेला एक स्तूप असून त्याच्या शिखरावर चोहोंबाजूस चार विनायक खोदलेले आहेत. त्यावरील लेखांत विनायकांची प्रार्थना केलेली आढळते. कित्येक पुरातन लेण्यात देखील गणपतीची मूर्ति खोदलेली आहे. यावरून असे म्हणता येईल की सुमारे एक हजार वर्षापूर्वीपासून गणपती विनायकाची उपासना करण्याची रूढी या देशात चालू झाली असावी.

प्राचीन व अर्वाचीन इतिहा

गणप‍तीचा गजानन केव्हा व कसा झाला याचा उलगडा होत नाही. पुराणांत त्याबद्दल कारण दिले आहे, त्यावरून त्याच्या धडावर गजतुंड बसविले असावे हे संयुक्तिक दिसत नाही. रुद्र व त्याची पत्नी ही गजचर्म पांघरीत असत. ज्या अरण्यात रुद्राचा व त्याच्या विनायक वगैरे गणांचा वास असे ते स्थान हत्तीसाठी प्रसिद्ध मानून वन्यपशूंत विशेष बुद्धिमान् जो हत्ती त्याचे शिर विनायकास जोडण्याची क्लृप्ति पुराणकाली निघाली असावी. शिवाच्या अन्य गणांस देखील इतर प्राण्यांची (माकड, मांजर, सिंह) शिरे असल्याचे पुराणांवरून दिसून येते. या सर्व गणांत गणपतीला अत्यंत बुद्धिमान् व विद्वान असे मानतात. वेदात बृहस्पतीस अत्यंत ज्ञाता व बुद्धिशाली गणले असून त्यास गणपति असे संबोधिले आहे.

गणनां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्।।
(मं. 2-23 सू.)
अर्थ :- ''समुदायांचा प्रभू म्हणून तू गणपती तू ज्ञानी जगात अत्यंत ज्ञानी, ज्यांची कीर्ति अतिशय उत्कृष्ट त्यांच्यामध्येही तू श्रेष्ठ, तू राजाधिराज, तुला आम्ही आदराने बोलावितो. हे सूक्तदेवते ब्रह्मणस्पते, आमची हांक ऐकून आपल्या सर्व शक्तींसह या आसनावर विराजमान हो.'' याच सूक्ताने गणपतीचीही स्तुति केलेली आपण सध्या पाहतो, अर्थात् वेदकाली केवळ रूद्रांचा किंवा भूतपिशाच्चादिकांचा जो नायक म्हणून प्रसिद्ध होता, तोच पुराणे रचली गेली तेव्हा विघ्नहर्ता सिद्धिविनायक व विद्याधर बृहस्पति झाला हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. अथर्वदेवातील मुख्‍य मंत्र ॐ गं गणपतये नम: हा देखील हल्लींच्या गणपतिसंबंधाचा नाही असे विद्वानांचे मत आहे. परंतु पाणिनीच्या पूर्वी तैत्तिरीयारण्यकाच्या सुमारास रचिलेल्या नारायणोपनिषदात गणपतीचा स्पष्टपणे उल्लेख आहे. यावरून गणेशभक्ति ख्रिस्ती शकाच्या आरंभी प्रचारात होती असे ठरते.

गाणपत्य पंथात सहा भेद असल्याचे आनंदगिरीने शांकरदिग्विजयात सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत:- महागणपतिपंथ- या पंथाचे लोक गणपति हाच जगत्कर्ता असून त्यानेच ब्रह्मदेवादि देव व एकंदर विश्व उत्पन्न केले असे मानतात.
2. हरिद्रा गणपतिपंथ - या पंथाचे लोक वर निर्दिष्ट केलेल्या सूक्तातील ब्रह्मणस्पति हाच गणपति असे मानून तो सर्वात श्रेष्ठ आहे असे समजतात. गणपतीची मूर्ति, त्याचे यज्ञोपवीत, वस्त्रे वगैरे पिवळ्या रंगाची असावी. त्याची सोंड व एकदंर याच्या तप्तमुद्रा अंगावर धारण कराव्या. तोच सर्वश्रेष्ठ आहे असे मानावे वगैरे या पंथाचे मत आहे. हा पंथ मध्वाचार्यांच्या वैष्णवपंथानंतर अस्तित्वात आला असावा किंवा मध्वाचार्यांनी तप्तमुद्राधारणासंबंधाने केलेल्या अनुज्ञांचा त्याच्यावर परिणाम झाला असला पाहिजे.
3. उच्छिष्ट गणपतिपंथ - या पंथाचे लोक वाममार्गी शक्तांप्रमाणे निंद्य रीतीने त्याची भक्ति करितात.
4. नवनीतगणपतिपंथ. 5. स्वर्णगणपतिपंथ. 6. संतान गणपतिपंथ.
ह्या पंथाचे लोक आपण श्रुतीप्रमाणे गणपतिपूजा करितो असे सांगतात. गणपति हाच आदिकारण असून प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी तो देवधिदेव असल्यामुळे त्याची पूजा करण्यात येते असे ते प्रतिपादन करितात. या पंथाचे लोक महाराष्ट्रातही होते व सध्या आहेत. चिंचवड गांवी सुमारे अडीचशे वर्षापूर्वी श्रीमोरयादेव, धरणीधर, गोसावीनंदन, निरंजन, चिंतामणि देव इत्यादि भक्त परम गाणपत्य होऊन गेले. थोरले माधवराव पेशवे हे देखील गणपतीचे उपासक होते. थेऊर येथील गणपतीची सेवा मनोभावाने करीत. पुण्याजवळ चिंचवड, कोकणातील पुळे व उत्तर कानडा जिल्ह्यांत इडगुंजी येथील गणपतीची देवालये जागृत असल्याबद्दल प्रसिद्धी आहे. प्रसिद्ध अष्टविनायकांची जी आठ पवित्र स्थाने ती देखील महाराष्ट्रातच आहेत. यावरून या प्रांतापुरते पाहू गेल्यास एका काली येथे गाणपत्य पंथाने लोकांच्या धर्मविचारांवर बराच पगडा बसविला होता असे दिसते. ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता असे म्हणण्यास हरकत आही की, वेदकालापूर्वी सुरासुरांत (देव दैत्य) ज्या जंगी लढाया झाल्या त्यांत गणपति हा तत्कालीन सेनानायक असावा. कोणत्याही प्रकारची विघ्ने आली तरी आपल्या बुद्धिसामर्थ्याने त्यांचा परिहार करून व शत्रूंना पावलोपावली विघ्ने उपस्थित करून याने स्वपक्षाची सरशी होईल असे केले असावे, म्हणूनच याला विघ्‍नराज व विघ्नहर्ता ही दोन्ही नामाभिधाने प्राप्त झाली. कालेकरून गणपतीचे ऐतिहासिक अस्तित्व व त्याचे पराक्रम यांचे वर्णन लोकोत्तर प्रकारचे होऊन त्याला धार्मिक स्वरूप व महत्व प्राप्त झाले. 
सध्या या दैवताची पूजा  
विघ्नविनाशक मंगलमूर्ती : सध्या या दैवताची पूजा विघ्नविनाशक मंगलमूर्ती म्हणून केली जाते. तो सोळा विद्या व चौसष्ट कला यांही मंडित असल्याचे मानून त्याच्या कृपाप्रसादाने सुबुद्धी व सुविधा यांचा लाभ होतो असे आम्ही आर्य समजतो. कार्य लहान असो किंवा मोठे असो ते निश्चितपणे तडीस जाईल व त्यापासून इच्छित हेतू साध्य होईल हे सांगणे अशक्य असते. अटकळीबाहेर अदृष्ट अशा गोष्टी आयत्या वेळी कशा नडतील हे सांगणे बहुतेक शक्य नसल्यामुळे प्रत्येक कार्यांच्या आरंभी विघ्नहर्त्यां परमेश्वराची प्रार्थना करून त्याच्या कृपाछत्राखाली कार्य करीत रहाणे हा मनुष्यमात्राचा धर्मं आहे. पुन:पुन: विघ्ने उपस्थित होऊन आपला प्रगतीचा मार्ग ती खुंटवू लागली तरी न डगमगता ईश्वरभक्तीची अभेद्य ढाल घेऊन पुढे कूच करीत जाणे म्हणजे पुरुषार्थाची गुरुकिल्ली प्राप्त करून घेणे होय. हल्लीच्या काळी गणपतीसारखे गजतुंडधारी स्वरूप सच्चिदानंद स्वरूपाच्या कल्पनेशी जुळविणे अशक्य झाल्यामुळे ज्यांचे विचार प्रगल्भ झाले आहेत असे लोक चतुर्थीसारखा उत्सव हिंदुस्थानात साजरा होत असलेला पाहून किंचित् नाक मुरडतात. अशा विचारी व ज्ञानी लोकांनी या सणास शुद्ध व उदात्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करवा. प्राचीनकाली आपल्या देशांत हल्लीच्या पद्धतीप्रमाणे 'क्लब' किंवा समाज नव्हते. अशा वेळी एकमेकात दळणवळण वाढून ओळखी होण्यास सव प्रेमसंवर्धनास हे उत्सव कारणीभूत होत. तसेच आजही घडवून आणणे शक्य आहे.