शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

Shri Ganesh Pratishtapana Pooja (in Marathi) श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

ganapati sthapana
गणेश पूजा विधी मराठीत
 
वेळ: खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. 
 
विधी: पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण दूर होईल. 
 
मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
 
वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
 
गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
 
दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
 
मूर्ती: गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरात ठेवू नये.
 
प्रदक्षिणा: श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालतात. अनेक नाही.
 
आसन: कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये. 
 
पूजेचे साहित्य: पूजा सूरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
 
मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.
 
पूजन प्रारंभ 
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी. 
 
दीप पूजन:  तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
 
'हे दीप देवा ! मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित रहा.' यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.
 
पवित्रकरण 
विधी : पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत: किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. आपल्या उजव्या हातावर जल पात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वत: वर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडा.
 
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाच्या नाव उच्चारणाने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो. भगवान पुंडरीकाक्ष मला हे पावित्र्य प्रदान कर! (हे तीन वेळा म्हणावे.)
 
आसन पूजा: 
विधी: आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली जाते.
मंत्र: 'हे माता पृथ्वी! आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूलाही धारण केले आहे, अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा. (आसनावर पाणी शिंपडा)
 
स्वस्ती पूजन 
विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो.
 
मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरीक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जला! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवा! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रम्हा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.' 
 
संकल्प
हातात पाणी घेऊन म्हणा:- गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो.
ganesh
गणेश पूजन प्रारंभ
 
श्री गणेशाचे ध्यान
 
विधी: ध्यान म्हणून प्रणाम केला जातो. 
 
ध्यान मंत्र: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे त्या गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातापैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्राबरोबर मोदक आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाम असो.
 
आवाहन व प्रतिष्ठापना 
विधी: हातात अक्षता घेऊन खाल‍ील मं‍त्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. 
मं‍त्र: ॐ गणपती देवा! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो.
 
स्नान:
विधी: गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
 
महत्त्वाचे: गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे आहे, असे मानावे. व त्याला स्नान घालावे. मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे. सुपारीला ताम्हनात ठेवून खालील क्रिया करा. मंत्र-स्नानीय समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा'.
 
पंचामृत स्नान:
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करा.' शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान): 'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.' ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. (स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवा.)
 
वस्त्र किंवा उपवस्त्र: 
विधी: वस्त्र किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे अर्पण केली जातात. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा.
 
उपवस्त्र समर्पण: 'हे प्रभू! विविध प्रकारचे चित्र, सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ द्या'. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा. 
 
विधी: गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते. खालील मंत्र म्हणून गंध, शेंदूर व दुर्वांकूर वहा.
मंत्र: चंदन अर्पण 
 
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करा. 
(वरील मं‍त्र म्हणून चंदनाचा लेप लावा)
शेंदूर अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून शेंदूर अर्पण करा.
(वरील मंत्र म्हणून शेंदूर अर्पण करा)
दुर्वांकूर अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दुर्वांकर अर्पित करा. (दुर्वांकूर अर्पित करा) फुले किंवा हार अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून फुले आणि हार अर्पण करा.
(वरील मंत्र म्हणून फुले आणि हार अर्पण करा) 
 
सुगंधी धूप 
विधी: पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप, जो सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. 'हे प्रभू! हा धूप आपल्या सेवशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करावा. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा.
(वरील मंत्र बोलून धूप पसरवा)
 
ज्योती दर्शन
विधी: या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा.
मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधःकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)
ganapati
नैवेद्य दाखवा
विधी: श्री गणेशाला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे.
 
मंत्र: 'हे देवा! दही, दूध, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करावा.' 'हे देवा! आपण हे नैवद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रति माझ्या मनात असलेल्या भक्तीचे सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे.' ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून नैवद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा. हस्तप्रक्षालनासाठी जल अर्पित करत आहे.
(पाणी खाली सोडा)
 
दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)
विधी: एक श्रीफळ ‍‍किंवा रोख दक्षिणा गणेशाला दान केली जाते. (खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा) ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करतो.
 
आरती
विधी: कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते. 
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती चरणी नमस्कार करा. कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे. (हात जोडून प्रणाम करा आरती घेतल्यानंतर अवश्य हात धुवा)
 
पुष्पांजली 
विधी: हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या. खालील मंत्र बोलून फुले देवाच्या चरणी समर्पित करा.
(खालील वाक्य बोलून पुष्पांजली अर्पित करा)
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो.
 
प्रदक्षिणा
(खालील मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करा)
मंत्र: मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करतेवेळी पावलापावलावर नष्ट होतात.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो. 
 
प्रार्थना व क्षमाप्रार्थना 
प्रार्थना: 'हे गणराया! आपण विघ्नांवर विजय मिळविणारे आहात. देवांचे प्रिय आहात.' हे विनायका! आपण ज्ञानसंपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार. 'हे देवा! आपण नेहमी माझ्या कार्यात येणार्‍या विघ्नांचा सर्वनाश करा.'
 
क्षमा प्रार्थना-
पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.
 
मंत्र: 'हे प्रभू! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.' 'हे प्रभू! मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर. मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न रहाल अशी अपेक्षा करतो.
 
प्रणाम किंवा पूजा समर्पण 
विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. (प्रथम साष्टांग प्रणाम करा, त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडून द्या)
मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महागणपती संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही त्याचा अधिकार आहे.
ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती: