बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 24 मे 2014 (12:45 IST)

शरीफ तळ्यात की मळ्यात

भारतामध्ये स्वातंत्रच्या तब्बल 67 वर्षानंतर झालेल्या परिवर्तनामुळे संपूर्ण जगभर भारतीय लोकशाहीबाबत आदरयुक्त भावना व्यक्त होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मात्र तळ्यात-मळ्यात चालू आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभास येण्याची शरीफ यांची मनापासून इच्छा आहे. मात्र त्यांना पाकिस्तानातील लष्कर खोडा घालीत आहे. पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन झालेले असले तरी लष्करशहांच्या ताबत ङ्कोठी सत्ता एकवटलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील लष्कर नेहमीच भारतविरोधी भूमिका मांडत असते आणि दहशतवाद्यांना भारताविरुध्द प्रोत्साहन देत असते. पाकव्यप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण केंद्रे असल्याबाबत कोणालाही शंका वाटण्याचे कारण नाही. पाकिस्तानमधील आयएसआयच्या सहकार्याने भारतीय संसदेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतावर युध्द पुकारण्याचा दबाव देशवासियांमधून होता. मात्र युध्दाची आगळीक आम्ही कधीही करणार नाही, मात्र पाकिस्तानने युध्द केल्यास चोख उत्तर देऊ, या भारताच्या धोरणानुसार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ तीव्र शब्दात पाकिस्तानला इशारे देऊन दबाव वाढवला होता. अलीकडच काळात भारत- अमेरिकेमध्ये अणुऊर्जा करार झाल्यानंतर भारताचे महासत्तेशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत.

निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांविरुध्द अत्यंत आक्रमक भाषा वापरत मते मिळविली आहेत. मात्र असाच प्रकार नवाझ शरीफ यांनीही निवडणूक काळात केलेला आहे. त्यामुळे निवडणूक काळातील भाषणबाजीमुळे आलेली कटुता दूर सारण्यासाठी मोदी यांनी सार्क देशातील सर्व पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांना शपथविधी समारंभाचे आमंत्रण दिले आहे. शरीफ वगळता इतर सर्वच राष्ट्रप्रमुख्यांनी होकारही कळविला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने  शरीफ यांना शपथविधीसाठी भारतात जाण्यास हरकत नसल्याची   शिफारस दिली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीतील विरोधी पक्षनेते खुर्शीद अलम शाह यांनीही दोन्ही देशातील जनतेच्या हिताचा विचार करून शरीफ  यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारावे, अशी विनंती केली आहे. भारताने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांना निमंत्रण पाठविल्यामुळे तालिबानी संघटनेने भारतीय दूतावासावर हेरात येथे शुक्रवारी सकाळी हल्ला केला होता. मात्र अफगाणिस्तानच्या पोलिसांनी हल्ला करणार्‍या सर्व चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळविले आहे. भारताचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा भारताच्या परराष्ट्र खात्याने केला आहे. भारताने अफगाणिस्तानामधील रस्ते आणि वीज प्रकल्पांसाठी दोन अब्जांहून अधिक रक्कम गुंतवलेली आहे. सार्क देशांना दहशतवादाचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेसह नाटो देशांचे सैन्य परत जाणार असल्यामुळे तालिबानींचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता  आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग गेली अनेक दशके दहशतवादामुळे अशांतता भोगत आहे. म्हणूनच शरीफ यच्यासह सर्व सार्क नेत्यांची मोदी यांच्या शपथविधी समारंभास उपस्थिती सकारात्मक संदेश देणारी ठरेल.