मोदींच्या शपथ सोहळ्याला शरीफ येणार?
देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण पाठवले आहे. शरीफांसह दक्षिण आशिया क्षेत्रीय सहकार्य संघटन अर्थात 'सार्क'मधील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनाही या सोहळय़ासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. भाजपाकडून या सोहळय़ासाठी सुमारे ३ हजार पाहुण्यांना बोलावण्यात येणार आहे. या पाहुण्यांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश आहे. भाजपा प्रवक्त्या निर्मला सीतारमण यांनी याबाबत सांगितले की, सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळय़ासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या इच्छेनुसार परराष्ट्र मंत्रालयाने हे निमंत्रण पाठविल्याची सूत्रांची माहिती आहे. सार्क देशांमध्ये भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव या आठ देशांचा समावेश आहे. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी या राष्ट्रांच्या प्रमुखांना शपथ सोहळय़ासाठी आमंत्रण पाठविल्याचे परराष्ट्र प्रवक्त्यांनी सांगितले. शपथविधी सोहळय़ासाठी ३ हजार पाहुणे येणार असल्याने हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनातील सभागृहाऐवजी भवनासमोरील हिरवळीवर होणार आहे. यापूर्वी भाजपाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर यांचा शपथविधीचा सोहळाही राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला होता.