रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:53 IST)

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला का साजरे केले जाते?

हिंदु वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. वर्षारंभाचा प्रारंभदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आहे. गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
 
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या जवळपास सूर्य वसंतसंपातावर येतो आणि वसंत ऋतू चालू होतो. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात. 
मात्र पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते.
 
आध्यात्मिक महत्त्व
ब्रह्म पुराणानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू केली. सत्ययुगाची सुरुवातही याच दिवसापासून मानली जाते.
भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्य अवतार घेतला. 
चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. 
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो दिवस गुढीपाडवा हाच होता. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.
 
या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण अयोध्या शहरावर विजयाची पताका फडकवण्यात आली. म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात उत्सव असतो. नवीन किंवा शुभ कार्य केले जाते.
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहेत. या दिवशी शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
 
ऐतिहासिक महत्त्व-
महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्रांच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. ही परंपरा राखून 
अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात

महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतात. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.
 
वैज्ञानिक कारण - 
चैत्र महिना हा इंग्रजी दिनदर्शिकेतील मार्च ते एप्रिल दरम्यान असतो. 21 मार्च रोजी, पृथ्वी सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करते, ज्या वेळी दिवस आणि रात्र समान असतात. 

शास्त्रज्ञ म्हणतात की या दिवसापासून पृथ्वीचे नैसर्गिक नवीन वर्ष सुरू होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दिवस रात्रीपेक्षा मोठा होऊ लागतो. रात्रीच्या अंधारात नववर्षाचे स्वागत होत नाही. सूर्याच्या पहिल्या किरणांचे स्वागत करून नवीन वर्ष साजरे केले जाते. दिवस आणि रात्र जोडून एक दिवस पूर्ण होतो. दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालू राहतो. सूर्यास्त हा दिवस आणि रात्रीचा संगम मानला जातो.