मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By

गुजराती स्पेशल छुंदा

Gujarati Special Chuda
साहित्य : खोबरी जातीच्या कैर्‍या, हळद, मीठ, लाल तिखट, साखर किंवा गूळ, जिरे.
 
कृती : कैर्‍यांची साल पूर्णपणे काढून त्या स्टेनलेस् स्टीलच्या किंवा पितळेच्या जाड किसणीने किसाव्यात. किसाला मीठ व हळद लावून एक ते दोन तास ठेवावे. त्याला पाणी सुटते. नंतर तो कीस हातात झेलून जेवढे निघेल तेवढेच पाणी काढावे. त्यानंतर एक वाटी किसाला दोन वाट्या साखर अथवा गूळ या प्रमाणात घेऊन ती साखर किंवा गूळ त्या किसात घालावा. आपल्याला कमी किंवा जास्त गोड हवे असेल, त्याप्रमाणे कमी किंवा जास्त साखर अथवा गूळ घालावा. 
 
नंतर एका उत्तम कल्हईच्या किंवा स्टेनलेस् स्टीलच्या पातेल्यात तो कीस घालून, पातेल्याचे तोंड फडक्याने घट्ट बांधून, ते पातेले चांगल्या उन्हात आठ दिवस ठेवावे. रोज सकाळी एकदा ते मिश्रण हालवावे. आठ दिवस झाल्यावर एक वाटी किसाला दोन चमचे लाल तिखट व जरा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा या प्रमाणात घालावे. पुन्हा दोन दिवस ते पातेले फडके बांधून ठेवावे. नंतर बरणीत तो चुंदा भरावा. हे लोणचे वर्षभर टिकते. या छुंद्यात हळद न घातल्यास हा छुंदा उपवासालाही चालते.