शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद

औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.
 
`श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार 
आणि 
`श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय.
 
तसेच `माणिकप्रभु' आणि `श्री स्वामी समर्थ महाराज' हे नंतरचे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात.
 
दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.
 
दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते.
 
`श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.
 
दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते.
तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.
 
-सोशल मीडिया