शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (16:58 IST)

देवाला दाखवलेला नैवेद्य देव खरेच ग्रहण करतो का ?

naivaidyam
‘देवाला स्‍थुलातून दाखवलेला नैवेद्य देवाने सूक्ष्मातून ग्रहण करणे’, यासंदर्भात गुरुजींनी विद्यार्थ्‍याला दिलेले समाधानकारक उत्तर !
 
‘गुरुजी वर्गात धडा शिकवत असतांना एका मुलाने मध्‍येच गुरुजींना प्रश्‍न विचारला, ‘‘आपण देवाला दाखवलेला नैवेद्य देव खरेच ग्रहण करतो का ? जर देव नैवेद्य खरेच ग्रहण करत असेल, तर नैवेद्यातील पदार्थ समाप्‍त झालेले का दिसून येेत नाहीत आणि जर देव नैवेद्य ग्रहण करत नसेल, तर नैवेद्य दाखवण्‍यात काय लाभ आहे ?’’
 
गुरुजींनी यावर त्‍वरित काहीच उत्तर दिले नाही. त्‍यांनी धडा शिकवणे चालूच ठेवले. त्‍या दिवशी धड्याच्‍या शेवटी त्‍यांनी एक श्‍लोक शिकवला. तो पुढीलप्रमाणे आहे,
 
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्‍पूर्णमुदच्‍यते ।
पूर्णस्‍य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्‍यते ॥
– ईशावास्‍योपनिषद़्, शान्‍तिमन्‍त्र
 
अर्थ : ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पूर्णानेच पूर्ण उदयाला येते, पूर्णातून पूर्ण काढून टाकल्‍यावर पूर्णच शिल्लक रहाते.
 
धडा पूर्ण झाल्‍यानंतर गुरुजींनी विद्यार्थ्‍यांना सांगितले, ‘‘सर्वांनी पुस्‍तकात पाहून हा श्‍लोक आता पाठ करा.’’
 
एक घंट्यानंतर गुरुजींनी प्रश्‍न विचारणार्‍या विद्यार्थ्‍याला विचारले, ‘‘तुझा श्‍लोक पाठ झाला कि नाही ?’’ त्‍या विद्यार्थ्‍याने तो संपूर्ण श्‍लोक शुद्ध उच्‍चारासह गुरुजींना ऐकवला, तरीही गुरुजींनी आपले मस्‍तक ‘नाही’ म्‍हणून हलवले. तेव्‍हा विद्यार्थी म्‍हणाला, ‘‘गुरुजी, तुम्‍ही हवे तर पुस्‍तक बघावे. मी म्‍हटलेला श्‍लोक जसाच्‍या तसा आहे.’’ त्‍यावर गुरुजींनी पुस्‍तक पहात म्‍हटले, ‘‘श्‍लोक तर पुस्‍तकामध्‍येच आहे, तर तुझ्‍या डोक्‍यात तो श्‍लोक कसा काय गेला ?’’ त्‍यावर विद्यार्थी काहीही उत्तर देऊ शकला नाही.
 
तेव्‍हा गुरुजींनी म्‍हटले, ‘‘जो श्‍लोक पुस्‍तकात आहे, तो स्‍थूल रूपात आहे. तू जेव्‍हा श्‍लोक पाठ केलास, तेव्‍हा त्‍याने सूक्ष्म रूपाने तुझ्‍या मेंदूत प्रवेश केला. त्‍याच सूक्ष्म रूपात तो तुझ्‍या स्‍मरणात रहातो. जरी तू हा श्‍लोेक पुस्‍तकात पाहून पाठ केला असला, तरीही पुस्‍तकाच्‍या स्‍थूल रूपातील श्‍लोकामध्‍ये काही न्‍यून झाले नाही. अशाच प्रकारे संपूर्ण जगात व्‍याप्‍त असलेला परमात्‍मा आपण दाखवलेला नैवेद्य सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो आणि त्‍यामुळे त्‍याचे स्‍थूल रूपातील पदार्थ थोडेही न्‍यून होत नाहीत; म्‍हणूनच आपण तो नैवेद्य ‘प्रसाद’ समजून ग्रहण करतो.’’ विद्यार्थ्‍याला त्‍याच्‍या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले.’
 
- सोशल मीडिया