रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (15:40 IST)

हरिद्रा अर्थात हळदीची कथा

haridra katha
मोग-याची फुले घेऊन वेदाने धौम्य ऋषिंकडे पाहिले. तेव्हा धौम्य ऋषि म्हणाले की वेदा निष्पाप गुरुभक्तीची ही पुष्पे मी तुझ्याकडून स्वीकारीत आहे ती एकाच कारणासाठी.
आत्ताच्या आत्ता चालत जाऊन तू ही पुष्पे माझ्या वतीने किरातरुद्राच्या चरणांवर अर्पण करावीस.
 
किरातरुद्राकडे जाऊन पोहोचण्याचा मार्ग तुला ही मोग-याची फुलेच दाखवतील.त्याप्रमाणे वेद पुढील कार्यासाठी निघाला. पुढे चालता चालता अंधार पडू लागला. त्याने हाताच्या 
 
ओंजळीतून त्या मोग-याच्या फुलांचा सुगंध भरभरून नाकाने आंत घेतला आणि डोळे बंद करून किरातरुद्र असे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. त्या गुरुकृपेच्या सुगंधाने 
 
आपले काम चोखपणे केले आणि वेदाच्या मनात आपोआप विचार उमटू लागले की रात्रीला का म्हणून भ्यायचे?
 
ही रजनीच तर थकल्याभागल्या जीवांना निद्रादेवीच्या आधीन करते. भले कर्मस्वातंत्र्याचा वापर करुन मानव या रात्रसमयाचा दुरुपयोग करीत असेल पण म्हणून काही ही 
रजनी अर्थात रात्रि वाईट ठरत नाही.
 
ही रजनी देखील आदिमातेचेच एक स्वरुप आहे. मग वेद प्रार्थना करतो की हे आदिमातेचा अंश असणा-या रात्रीदेवी, हे रजनीदेवी, हे निशादेवी मला सहाय्यभूत हो.
 
त्या बाळबोध स्वभावाच्या व प्रांजळ मनाच्या गुरुभक्त वेदा कडून ही प्रार्थना ऐकताच आदिमातेचा अंश असणारी ती रजनीदेवी तात्काळ तेथे प्रकटते आणि त्याला म्हणते की 
हे वेदा मी तुला सर्व प्रकारे साहाय्य करीन. मी तुला किरातरुद्राकडे घेऊन जाईन. त्याच्याकडे जाण्याचा मार्ग मला माहित आहे परंतु त्याची कृपा प्राप्त करुन घेण्याचा मार्ग 
मला माहित नाही.
 
पण तुला मात्र तो मार्ग गुरुकृपेने माहीत होईल ह्याची मला खात्री आहे.
 
चल वत्सा. असं म्हणून रजनीदेवीने वेदाच्या उजव्या हाताची अनामिका (करंगळी जवळचे बोट) पकडली व ते दोघेही जण जाऊ लागले. चालता चालता आता त्यांच्या 
पावलांनी जमीन सोडली आणि त्यांचा प्रवास अंतरिक्षात सुरु झाला.
 
एका क्षणाला रजनीदेवी म्हणाली, हे वेद आपण आता अंतरिक्षातील सुमेरु पर्वताजवळ आलो आहोत व ह्याच्या शिखरावरच किरातरुद्राचे नित्यस्थान आहे.
 
रजनीदेवीचे हे शब्द ऐकल्यानंतर वेदाने गुरु धौम्य ऋषिंचे स्मरण करुन त्या सुमेरु पर्वतास नमस्कार करण्यासाठी हाताची ओंजळ मिटताच भगवान किरातरुद्र तेथे साक्षात 
प्रकट होतात.
 
आनंदित होऊनही गुर्वाज्ञेच पालन न विसरता वेद ती मोग-याची फुले धौम्य ऋषिंच्या वतीने किरातरुद्राच्या चरणांवर वाहतो आणि त्याच क्षणी किरातरुद्र प्रसन्न होतात आणि 
वेदाला सर्व विद्यांनी संपन्न करतात.
 
त्यासरशी वेद म्हणतो की हे भगवन्, मी ही फुले धौम्य ऋषिंच्या वतीने वाहीली आहेत आणि मला येथपर्यंत या रजनीमातेने आणलं आहे. पण वरदान मात्र मला मिळालं 
आहे.
 
तेव्हा हे राघवेंद्र, कृपा करून गुरु धौम्य ऋषिंना काहीतरी संदेश द्यावा आणि या रजनीमातेचे गा-हाणे तरी ऐकावे.
 
त्याचा तो निर्व्याज स्वभाव पाहून भगवान किरातरुद्र अतिशयच प्रसन्न झाले आणि त्यांनी रजनीदेवीस बोलण्यास अनुमती दिली.
 
रजनीदेवी बोलू लागली की हे भयनाशक रुद्रा, तुझ्या श्रद्धावानांना तरी माझी फक्त चांगलीच बाजू मिळू दे. श्रद्धावानांसाठी माझाही उपयोग होईल अशी काहीतरी व्यवस्था कर.
तुझ्याच कार्यासाठी आदिमातेच्या आज्ञेने मी सदैव काळीच आहे पण श्रद्धावानांसाठी मला तुझा सुवर्णस्पर्श होऊ दे.
 
किरातरुद्र म्हणतात की हे रजनी तू माझ्या मातेचाच अंश आहेस त्यामुळे तू अपवित्र असूच शकत नाहीस. परंतु तुझी व्यथा मी जाणतो. तू आता ताबडतोब पृथ्वीवरील स्कंद 
 
पर्वतावर जाऊन पृथ्वीच्या गर्भात प्रवेश कर व नेहमी उषेच्या आगमनाबरोबर स्वत:ला आवरतेस सावरतेस, तसे न करता आज तू त्या वसुंधरेच्या मातीमध्ये मिसळून जा. 
 
तुला श्रद्धावानांच्या विश्वात एक अलौकिक स्थान प्राप्त होईल.
 
तत्काळ रजनीमातेने किरातरुद्रास प्रणाम करुन व कृतज्ञतेने वेदाच्या मस्तकाचे चुंबन घेऊन ती परत फिरली व स्कंद पर्वतावरील मातीत शिरली. मातीत जी शिरली ती 
 
उषेबरोबर जमिनीतून बाहेर आली ती हरिद्रा नामक वनस्पती बनूनच. पहिला कोंब बाहेर येताच तिला आशिर्वाद देण्यासाठी साक्षात किरातरुद्र, शिवगंगागौरी व धौम्य ऋषि 
 
तेथे उपस्थित होते.
 
किरातरुद्र म्हणाले की हे रजनी आजपासून तुला श्रद्धावान हरिद्रा या नावाने ओळखतील व तुझ्या कांडांचे चूर्ण हे मला व माझ्या दोन्ही भावांना अतिशय प्रिय असेल व माझे 
भक्त हे हरिद्राचूर्ण अर्थात हळद कपाळावर मिरवतील व त्यामुळे त्यांचे शुभ स्पंदने ग्रहण करण्याचे सामर्थ्य वाढेल.
 
शिवगंगागौरी म्हणाली हे हरिद्रे, तुझ्या कांडांची माळ हा माझा सर्वात प्रिय अलंकार असेल. जो श्रद्धावान या हरिद्राकांडांची माळ करुन व त्यात फुले ओवून आपल्या गृहात, 
धामात व कार्यक्षेत्रात लावेल तेथील अशुभ स्पंदने नष्ट करण्याचे कार्य ही हरिद्रामाळा करेल.
 
हे सर्व ऐकून तृप्त झालेली रजनी अर्थात हरिद्रादेवी म्हणाली, हे मातापित्यांनो, ह्या इवल्याशा वेदाने मला तुमचा आशिर्वाद प्राप्त करुन दिला मग तुम्ही माझ्यासाठी सर्व 
श्रद्धावानांना अजून काहीतरी द्यावे आणि या वेदालाही.
 
किरातरुद्र म्हणाले की हे प्रेमळ हरिद्रे, या वेदाचे अध्ययन आता पूर्ण झाले आहे. हा जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारेल तेव्हा स्वत: धौम्य ऋषि तुझ्या कांडांचे चूर्ण ह्याच्या 
सर्वांगास व धौम्यपत्नी सुपर्णा ही वेदाच्या नियोजित वधूच्या सर्वांगास लेपन करतील व नंतरच मंगलविधीस आरंभ होईल व त्या दिवसापासून प्रत्येक श्रद्धावानाच्या घरी 
मंगलप्रसंगी हरिद्रालेपन केले जाईल व त्यामुळे ते मंगलकार्य निर्विघ्नपणे संपन्न होईल.
 
तेव्हा वर, वधू, बटूच्या अंगाला हळद लावताना ही कथा जरुर आठवा आणि हरिद्राकांडांच्या माळा लावताना किरातरुद्राचे व शिवगंगागौरीचे स्मरण अवश्य करा.