शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (09:04 IST)

|| सद्गुरुं क्षमाष्टक ||

कशाला दिला जन्म तेही कळेना |
करावे परी काय तेही सुचेना ||
जावो न जीवन परी माझे वाया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||१||
 
दुरी तुजहूनी राहिलो सांग मी का |
फुका जीवनी जाहल्या कैक चुका ||
आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||२||
 
सदा अंतरी या असे नाम तुझे |
कळू दे मला सत्य कर्तव्य माझे ||
तुझ्या थोर कृपे पळो दूर माया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||३||
 
सदा सज्जनांशी जुळो नाती गोती |
कधी दुर्जनांच्या नको गाठी भेटी ||
आता यापुढे तूच धर माथी छाया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||४||
 
मिळे त्यात माझे समाधान व्हावे |
परी त्यातुनी दान धर्मास जावे ||
प्रपंचात परमार्थी शिकवी रमाया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||५||
 
जरी नाशिवंत असे देह माझा |
परी त्याच देही सदा वास तुझा ||
मला बुद्धी दे गुण तुझेच गाया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||६||
 
पिता आणि माता सखा बंधू माझा |
मला पूर्ण आधार एक तुझा ||
सदा संकटी धाव तू सावराया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||७||
 
त्रैमुर्तीच्या राहो मी चिंतनात |
रमो मन निरंतर मधु संगितातात ||
तुलाचि स्मरून नित्य पडणार पाया |
क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||