ज्ञानेश्र्वर, तुकाराम ही वारकरी संप्रदायाची संजीवन नामे आहेत. 'उपजताची ज्ञानी' असलेल्या ज्ञानेश्र्वरानीं लोककल्याणार्थ ज्ञानाकडून भक्तीकडे प्रवास केला, तर रात्रंदिन युद्धाचा प्रसंग झेलून स्वसंघर्षातून तुकाराम महाराज भक्तीतीकडून ज्ञानाकडे झेपावले. पावन आचरण, वैराग्याची निश्चळता, निस्सीम ईश्र्वरनिष्ठा, निरभिमानता, दंभरहित वृत्ती, साधुता, आत्मसंयम इत्यादी अनेक सद्गुणांनी यांचे चरित्र अलंकृत झाले आहे. ते सद्गुण यांच्या अभंगवाणीतून उतरावे यात नवल काही नाही. 'नामाचा तुका' म्हणून यांची वारकरी संप्रदायात ख्याती आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी हे देहू सोडून बाहेर पडले नाहीत. एकनाथ व समर्थ रामदास यांप्रमाणे यांनी तीर्थाटन केले नाही. आपल्या बुद्धिवैभवाने व निस्सीम श्रीरामनिष्ठेने समर्थांनी अवघा महाराष्ट्र हलवला. एकनाथांनी काशीचे अत्युच्च पीठ जिंकले. यांनी यातले काहीही केले नाही, तरीही ज्ञानेश्र्वरांच्या जोडीला यांचे नाव आपण घेतो. ज्ञानेश्र्वरांच्या पंक्तीला हे जाऊन बसतात. हा चमत्कार कशामुळे झाला?
यांचा अभंग ओठावर नाही, असा मराठी मनुष्य सापडावयाचा नाही. भोळभाबड्या वारकरंपासून ज्ञानी संशोधकांपर्यंत सर्वांनाच यांनी भुलविले आहे, हे विशेष. यांच्या चरित्रात व अभंगवाणीत काही लोकोत्तर असल्याशिवाय हे घडणे शक्यच नाही.
'भेटीलागी जीवा, लागलीसे आस' म्हणून आर्त साद घालणारा हा 'ओम तत्सदिती सूत्राचे सार।' असे आत्मा अनुभवाने सांगतो.
एकीकडे 'मी भक्त तू देव' असे म्हणणारा हा दुसरीकडे मात्र घरी 'वेदांत वाहे पाणी।' असे बोलतो. म्हणूनच यांच्या अभंगांना प्रासंगिक संदर्भ देण्याचा प्रयत्न अभ्यासक करू पाहतात. तथापि एकविध भावाभ्यासातच याच्या चरित्राचे खरे वर्म आहे. मोरोपंतांनी म्हटले आहे, स्वात्मानुभव पहातां तुका केवळ सखाची जनकाचा। वैराग्यें डोलविला माथा येणे मुनींन्द्र सनकाचा ॥' हिंदू संस्कृतीत वैराग्य व आत्मानुभवाचा आदर्श म्हणून शुक व जनक यांची नावे घेतली जातात. मुनींमध्ये श्रेष्ठ म्हणून अर्थातच वशिष्ठ व सनक वंदनीय आहेत. जनक सनकांच्या योग्यतेचे वैराग्य व आत्मानुभवाचा समन्वय मोरोपंतांनी यांच्यात सांगितला आहे. या दोन्ही गुणांच्या जोडीला प्रासादिक वाणी, रोमांचकारी शब्दकळा, अतुलनीय सहनशीलता, पराकोटीचा प्रामाणिकपणा, मानसन्मान, निर्भीडपणा, सच्चारित्र्य, सत्ता, अशा लोकोत्तर गुणांचा संगम यांच्या ठायी आहे.
प्रपंचातील सुखाचे क्षण, त्यावर येणार्या आपत्ती, दुःखाचे तीव्र चटके, दैवाकडून पराभूत झाल्यावर पुन्हा उभारण्यासाठी केलेली धडपड, जिवाची तडफड, प्रपंच कलह, समाजातील स्वार्थी लोकांकडून होणारे आघात, यांच्या आयुष्यात घडलेले हे प्रसंग प्रत्येक मानवाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी येतातच. त्यामुळे लोकांना हे जवळचे वाटत असावेत. परंतु आपत्तीचा व दुःखांचा घाव झेलून सोसून यांनी अवघे आयुष्य आत्मोन्नतीकडे वळविले.
नको देऊ देवा द्रव्य।,पराविया नारी माऊलीसमान। कोणाही जीवाचा न घडो मत्सर। पराविया नारी आणि परधना। नको देऊ मनावरी येऊ। भुतांचा मत्सर आणि संत निंदा । हे नको गोविंदा घडो देऊ॥' हा यांचा उपदेश व प्रार्थना आहे. इंद्रियांचे दास यालाच बळी पडतात. तुकोबा हे सर्व जिंकून गेले. सर्वांना हे जमतेच असे नाही व आत्मोन्नतीच्या मार्गाकडे झेपावून सर्वांना तुकाराम होता येते असेही नाही. यातच त्यांचे वेगळेपण आहे. आपल्यातलाच तुकाराम आभाळाएवढा झालेला पाहून सामान्य माणूस स्तिमित होतो. गहिवरतो. मनोमनी यांना दंडवत घालतो.
आजवर यांचा विविधांगाने अभ्यास झाला आहे. पुढेही होत राहणारच आहे. यांच्या अभंग संख्येबाबत संशोधक व अभ्यासकात एकमत नाही. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या कैलासवासी लाड संपादित गाथा आज अभ्यासकांत प्रमाण आहे.
त्यात एकूण 4 हजार 607 अभंग आहेत. डॉक्टर प्र. न. जोशी यांनी संपादित केलेल वर उल्लेख केलेल गाथेनुसार अभंग्यसंख्या प्रमाण मानते. पांडुरंग जावजी प्रकाशित व वासुदेव लक्ष्मण शास्त्री पणशीकर संपादित गाथ्यात 4590 अभंग आहेत. मात्र यातील अभंगांची विषयांवर क्रमाने केलेली मांडणी लक्षणीय आहे. तुकाराम तात्या संपादित गाथेत 8 हजार 441 अभंग आहेत. संपादक म्हणून तुकाराम त्यत्याची कामगिरी गौरवास्पद ठरते. तुकाविप्रचे म्हणून त्यातील मंत्र गीतेचे 718 अभंग कमी केले तरीही, अभंगसंख्या साडेसात हजारांच्यापुढे जाते. देहू, तळेगाव, पंढरपूर व कडूस प्रतीतही एकवाक्यता नाही. वैकुंठवासी जोग व ह.भ.प. शंकर महाराज खंदारकर संपादित गाथवरूनही अभंग संख्येची दिशा ठरत नाही. कै. लाड संपादित गाथ्यातील खालील संपादकीय मजकूर महत्त्वाचा आहे. याने आपले अभंग लिहून ठेवले होते यात काही शंका नाही. पण जनवाद चुकविण्यासाठी अभंगांच्या ज्या वह्यांचे कागद देवाने उदकी तारीले, असे खुद्द यानेच लिहून ठेवले आहे. त्यावर त्यांचे पुढे काय झाले हे सांगणे कठीण आहे. खुद्द याच्या घराण्यात देहूस पूजेत ठेवलेली अशी याच्या हातची म्हणून जी वही दाखवितात तीत फक्त 248 अभंगच आहेत. सारांश याच्या हातचे समग्र लिखाण गेल्या शंभर वर्षांत तपास करून सुद्धा मिळाले नाही व नजीकच्या भविष्काळात ते सापडेल असा संभव दिसत नाही. यांच्या हयातीत याच्या टाळकरी अनुयायांनी व तसेच इतर अनेक लोकांनी यांच्या अभंगांच्या प्रती तयार केल्या होत्या, ...यांच्या निर्णयानंतर थोड्याच वर्षांनी कचेश्र्वराला खेटकग्रामी, म्हणजे खेड गावा अशी माहिती मिळाली की, 'अंबाजीचे घर । तेथे जावे॥ सर्वही संग्रह तुकोबांच्या वह्या। जावे लावलाहे तुम्ही तेथे॥' हा संग्रह अद्यापी कोणाचया हाती लागला नाही.
विठ्ठल जोशी