बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय सहावा

॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय सहावा
समास पहिला
 
विदेहाप्री चालवोनी प्रपंचा । मुमुक्षुजनांलागिं अध्यात्मचर्चा ॥
करोनी बहू लोक जे मेळविती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६ ॥
 
जयजय सद्‌गुरु स्वानंदा । भक्तिकमलमकरंदा ।
मुमुक्षुभृंग घेती स्वादा । नाठवे देहभाव ॥ १ ॥
तुझिये आनंदाची गोडी । चाखिती जे जे वर्हाडी ।
तितुके गेले देशोधडी । अहंता निःशेष सोडोनी ॥ २ ॥
कोणा न देती ओळख । वरिवरी दिसती स्वाभाविक ।
परि परिपूर्ण निजसुख । स्वानंदरस सेविला ॥ ३ ॥
आकंठ अमर्याद भरले । तेणें ते उन्मत्त झाले ।
घरच्या घरीं बावरले । नवल वाटे ॥ ४ ॥
मायेची ममता सांडिली । पितयाची आज्ञा मोडिली ।
आशा मावशी ती वधिली । देखतदेखतां ॥ ५ ॥
कामक्रोध बंधूंवरी । जो कां सदा गुरगुरी ।
कल्पना ईषणा भगिनी सुंदरी । समोर येऊं देईना ॥ ६ ॥
प्रारब्धठेवा लुटविला । घराचा देव्हारा केला ।
मरणा मारोन उरला । आनंदरस चाखित ॥ ७ ॥
शब्दस्पर्शरूपरस- । गंधभूषणे वेशीस ।
बांधोनि राही उदास । सर्वकाळ आनंदी ॥ ८ ॥
जगावेगळा बडबडे । जगीं असोनियां दडे ।
प्रपंच व्यवसाय नावडे । परि करणें सोडीना ॥ ९ ॥
दया क्षमा शांती त्यापासीं । आत्मतत्त्वीं रमे अहर्निशी ।
सांडोनि लोकलज्जेसी । आनंदमदें धुंद झाला ॥ १० ॥
न मानी आपपर । विधिनिषेधादि आचार ।
बुडविलें सकळ घरदार । आनंदोर्मीमाझारीं ॥ ११ ॥
आनंदे उन्मत्त झाला । न मानी कळिकाळाला ।
पुण्यपाप तुडवूं लागला । सकळ उपाधी ॥ १२ ॥
ऐसा तूं आनंदघन । सेवितां तें सेवकपण ।
समूळ जाय विरोन । सेव्यसेवाआनंद ॥ १३ ॥
जया घडेल हा योग । तेणेंचि साधिला लाग ।
इतरें राखिली तगमग । नरदेहा येवोनि ॥ १४ ॥
सबल सुकृतांच्या राशी । सत्संग नम्रता जयासी ।
तोचि जाणे स्वानंदासी । ज्ञानाज्ञान गिळोनी ॥ १५ ॥
अथवा श्रद्धेचा ओलावा । धरोनि करितां गुरुसेवा ।
स्वानंदसोहळा भोगावा । नित्य सत्य निर्विकार ॥ १६ ॥
ऐसी सेवा साधोनि । सद्‌गुरु गेले नैमिषवनीं ।
एकांतवास साधोनि । पुनरपि गृहीं निघाले ॥ १७ ॥
मार्गीं बहुधा बोधिलें । अनुग्रहें सुखी केलें ।
रामभक्तीसी लाविले । अज्ञ विकल्पी भाविक ॥ १८ ॥
अनेक कामना पुरवोनि । जन लाविती रामभजनीं ।
जेवी औषध न सेवी म्हणोनि । बाळा साखरखडा दाखविती ॥ १९ ॥
ऐसा करित जगदुद्धार । पावले गोंदावलें नगर ।
गृहीं जावोनि 'रघुवीर' । पुकारीतसे गोसावी ॥ २० ॥
माय येवोनि जंव पाहे । तंव गोसावी उभा आहे ।
अंगीं तेज न समाये । प्रेमजिव्हाळा उफाळे ॥ २१ ॥
मागें गणू येवोनि गेला । तोही गोसावीच झाला ।
वर्तमान ठाउकें असेल याला । म्हणोनि करी प्रश्नातें ॥ २२ ॥
'अहो साधु महाज्ञानी । तुम्ही फिरतां रानींवनीं ।
कोठे दिसला कीं नयनीं । पुत्र आमुचा सांगावा ॥ २३ ॥
सदा रामनाम घेत । तुम्हांसारिखा वेष धरित ।
सद्‌गुरुकारणें फिरत । देशीं विदेशीं ॥ २४ ॥
सद्गुणी चातुर्याची खाण । वय सान वैराग्य पूर्ण ।
मध्यमसा गौरवर्ण । अंगठेव सुदृढ ॥ २५ ॥
आम्हां दुःखीं टाकोनि । गेला गृह सोडोनि ।
कोठें देखिला कीं नयनीं । कृपा करूनि सांगावे' ॥ २६ ॥
सद्‌गुरु बोलती मातेप्रति । 'माउली चिंता नसावी चित्तीं ।
उदयीक भेटेल निश्चितीं । तुमचा सुत तुम्हांसी' ॥ २७ ॥
ऐसें वदोन सत्वर । पावले हनुमंतमंदिर ।
दुरोनि पाहती चमत्कार । बाळपणाचा ॥ २८ ॥
नानापरी क्रिडा केली । सोबत्यांची मांदी मेळविली ।
आजीं सर्व पारखीं झालीं । जवळी असोनि ॥ २९ ॥
एक रात्र केली वसति । ओळखी कोणा न देती ।
दुजे दिनीं पाचारिती । चिंतूबुवासी ॥ ३० ॥
उपाध्याय चिंतूबुवा । संबोधिती घेऊन नांवा ।
बालपणाच्या गोष्टीं तेव्हां । खुणेलागीं सांगितल्या ॥ ३१ ॥
खूण पटतां हर्ष झाला । धांवला रावजीगृहाला ।
'गीताई तुमचा सुत आला । मंदिरामाजीं' ॥ ३२ ॥
शब्द पडतांचि श्रवणीं । गीता निघे झडकरोनि ।
गणपति तैं धांवोनि । चरण धरी जननीचे ॥ ३३ ॥
उभयतां संतोष झाला । गणपति सर्वां भेटला ।
हरपला ठेवा गवसला । गोंदावलीसी ॥ ३४ ॥
बालपणचे मित्र सारे । करिती नाना प्रश्नोत्तरें ।
निवविती सकलांचीं अंतरें । प्रवासकथा सांगोनी ॥ ३५ ॥
कथिती अध्यात्मज्ञान । रामभक्ति सगुणभजन ।
सर्वांचे वेधिती मन । आपणाकडे ॥ ३६ ॥
शरण येती तयांसी । निववूनि रामभक्तीसी ।
लाविती तत्क्षणेंसी । युक्तिप्रयुक्ति ॥ ३७ ॥
प्रापंचिकां युक्तिवाद । मुमुक्षुंसी भक्तिबोध ।
नास्तिकांसी प्रेमसंवाद । करोनि भजनीं लाविती ॥ ३८ ॥
मुखोमुखीं पसरली मात । गोंदावलीसी आले संत ।
साक्षात्कारें समाधान देत । प्राणिमात्रासीं ॥ ३९ ॥
शर्करा पाहूनि मुंग्या धांवती । तैसें झालें गोंदावलीप्रति ।
बहुत ग्रामींचे जन येती । साधुदर्शनाकारणें ॥ ४० ॥
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । करिती प्रेमसंवाद ।
समाधान पावोनि धरिती पद । सद्गुरूंचें ते काळीं ॥ ४१ ॥
कोणी म्हणती सिद्धपुरुष । कोणी मानिती देवांश ।
पावले देव प्रत्यक्ष । गोंदावलेंग्रामासी ॥ ४२ ॥
सकलां दर्शनें आनंदवी । ऐसा पावला गोसावी ।
सर्वांगी विभूति लावी । कौपीन परिधान करीतसे ॥ ४३ ॥
जटा दाढी शोभा देती । पायीं खडावा गर्जती ।
गणेशटोपी कफनी घालिती । हातीं स्मरणी शोभतसे ॥ ४४ ॥
मुद्रा रामनामांकित । कुबडी करीं वागवित ।
सदा आनंदें भजन करित । संगें भक्तजन घेवोनि ॥ ४५ ॥
गृहीं वास न करिती । विठ्ठलमंदिरासमीप वसति ।
कट्टा करोनि बैसती । समुदायासमवेत ॥ ४६ ॥
कीर्ति पसरली चहूंदेशी । मत्सर वाटे स्वकीयांसी ।
न साहवे परोत्कर्षासी । हा स्वभावधर्म ॥ ४७ ॥
स्तोम माजविलें फार । सर्व यासी पुसती विचार ।
आमचा अपमान होतो फार । अधिकारी यासी वंदिती ॥ ४८ ॥
तरी आतां ऐसें करावें । यासी मुंडण करवावें ।
गृहस्थाश्रमीं लावावें । म्हणजे महती जाईल ॥ ४९ ॥
करोनि ऐसा विचार । म्हणती हा उतरावा केशभार ।
सद्‌गुरु वदती अनिवार । खर्च असे तयासी ॥ ५० ॥
होम हवन ब्राह्मणभोजन । सांगता असे गहन ।
येरू वदती तयांलागून । सर्व करूं यथासांग ॥ ५१ ॥
त्यांचे मनींचा भाव जाणती । परि गुरुआज्ञा झाली होती ।
प्रपंच करोनि रामभक्ति । वाढवावी सतत ॥ ५२ ॥
स्वार्थ तीर्थ साध्य होतें । म्हणोनि करविलें मुंडणातें ।
अन्नदान हवनातें । यथासांग करविलें ॥ ५३ ॥
रावजी गीता आनंदले । म्हणती बाळ शुद्धीस आले ।
आतां प्रपंच करील वहिलें । चिंता सर्व उडालीं ॥ ५४ ॥
कांता सरस्वती खातवळी । चिंता वाहोन कृश झाली ।
तिजला सत्वर आणिली । कृपासागरें गुरुरायें ॥ ५५ ॥
प्रपंच चालिला अव्यंग । सदा भजती श्रीरंग ।
दर्शना येतसे जग । पूर्वींहूनि अधिकचि ॥ ५६ ॥
प्रपंच करोनि परमार्थ । कैसा साधावा स्वार्थ ।
दाविती राहोनि विरक्त । समस्तांसी ॥ ५७ ॥
प्रातःकालीं देवतार्चन । अखंड करिती नामस्मरण ।
अध्यात्मचर्चा विवरण । श्रोतृसमुदाय निवविती ॥ ५८ ॥
नाना शंका उपशंका । प्रत्ययें फेडिती देखा ।
ग्रंथार्थ बोधिती लोकां । विशद करोनि ॥ ५९ ॥
दासबोध नाथभागवत । भगवद्गीता अध्यात्मग्रंथ ।
अभंगादि गाथा समस्त । तुलसीकृत रामायण ॥ ६० ॥
ग्रंथाग्रंथांची एकवाक्यता । विवरोनि दाविती समस्तां ।
श्रवण करितां श्रोता वक्ता । तादात्म्यता पावती ॥ ६१ ॥
चालतां अध्यात्मनिरूपण । उपासना बोधिती सगुण ।
भक्ति प्रेम उचंबळोन । येतसे श्रोतयांसी ॥ ६२ ॥
ब्रह्मज्ञानाच्या गोष्टीं सांगती । आणि सगुणातें न भजती ।
तेणें इहपर नाडती । ऐसे वक्ते बहुतेक ॥ ६३ ॥
शब्दज्ञानें भरीं भरिती । आणि उपासना सोडिती ।
तैसी नव्हे गुरुमूर्ति । बोधिती सगुणभजन ॥ ६४ ॥
स्वयें आचरोनि दाविलें । आणि जनां शिकविलें ।
तेणें समाधान पावले । कितीएक ॥ ६५ ॥
सायंकाळीं प्रेमळ भजन । करुणारस रूपध्यान ।
नानापरीनें स्तवन । रामरायाचें होतसे ॥ ६६ ॥
बहुत संतांची वचनें । अभंगपदादि कवनें ।
जेणें साधका उपदेश बाणे । भजन अति रसाळ ॥ ६७ ॥
अष्टकें श्लोक आरती । ऐसें भजन नित्य करिती ।
स्वयें करोनि करविती । जनांकरवीं ॥ ६८ ॥
चालविती ऐसी उपासना । प्रपंचकार्यें करिती नाना ।
गोसावी झाला शहाणा । म्हणती सर्व ॥ ६९ ॥
माय बोले गणपतीप्रति । 'एक इच्छा असे निगुती ।
वडिलार्जित वतनवृत्ती । अंगीकारावी तुवां ॥ ७० ॥
पाळी असे आपुली आली । ती पाहिजे तुवां केली ।
मान्य करीं आमुची बोली । पुत्रधर्म म्हणोनि' ॥ ७१ ॥
श्रीगुरु वदती 'माय । रामसेवे अर्पिला देह ।
गरज नसे नोकरी गेह । आम्हां गोसावियासी ॥ ७२ ॥
परि मातृआज्ञा म्हणोनि । होईन मी कुलकर्णी ।
कांही काल क्रमोनि । पुनरपि जाईन वनातें' ॥ ७३ ॥
पुरविण्या वडिलांची हौस । हातीं घेतले वतनास ।
नीतिन्यायमर्यादेस । सीमा नाही ॥ ७४ ॥
भूतीं भाविती भगवंत । न करिती अन्याय घात ।
पंचतत्त्वविवरण जेथ । हिशोबाची काय कथा ॥ ७५ ॥
कळिकाळा ज्याची सत्ता । तया गांवची कायसी वार्ता ।
आश्चर्य वाटे समस्तां । कोठें शिकला ज्ञान हें ॥ ७६ ॥
रयत म्हणती भलें झालें । सुज्ञ कुलकर्णी लाभले ।
अधिकारी संतोषले । कामकाज देखुनी ॥ ७७ ॥
मायबापां संतोष झाला । तीन मास काळ गेला ।
सद्गुरूंनी बदली दिला । पुरे म्हणती व्याप हा ॥ ७८ ॥
रामसेवा करावी । व्यक्ति भक्तीसी लावावी ।
याहोन अन्य पदवी । नको आम्हां ॥ ७९ ॥
जाणें असे नैमिषारण्यीं । मग सद्‌गुरुभेटीलागोनि ।
तुम्ही रामनाम वदनीं । घेत असावें सर्वकाळ ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय सहावा
समास दुसरा
 
ब्रह्मचैतन्य गुरुवर । म्हणती करूं देशांतर ।
भार्या सद्गुणी चतुर । समागमे येऊं म्हणे ॥ १ ॥
अखंड करी नामस्मरण । पतिवचनीं विश्वास पूर्ण ।
सदा ध्याई पतिचरण । पतिव्रता गुरुभार्या ॥ २ ॥
धन्य पतिव्रता माउली । जी ऐसे पद पावली ।
बरी सत्त्वगुणें शोभली । चंद्रकांति जैशी ॥ ३ ॥
सद्‌गुरु तेज दिनकर । सरस्वती प्रभा सुंदर ।
दर्शनें श्रमपरिहार । संसारिकांचा होतसे ॥ ४ ॥
पाळिले मायबापबोला । प्रपंच सर्व नेटका केला ।
मग त्वरित निघाले देशाला । जगदुद्धार करावया ॥ ५ ॥
शकें सत्राशें शहाण्णवीं । बाहेर निघाले गोसावी ।
सवें भार्या शुद्धभावी । गुरुदर्शना घेतली ॥ ६ ॥
दोन प्रहर रजनीसी । निघाले भार्येसरसीं ।
शरण रिघाले तुकाईसी । उभयतां चरणीं लोळती ॥ ७ ॥
पाहोनि शुद्धभाव परम । संतोषला तुकाराम ।
जोडी शोभे सीताराम । दुजीं मर्त्यलोकीं ॥ ८ ॥
तुकाराम वदती ’सती । काय इच्छा तुजप्रति ।
माग माग शीघ्रगति । पूर्ण होय निश्चयें’ ॥ ९ ॥
सती वदे ’पुत्ररत्न । व्हावें पतिसमान ।
हेंचि द्यावें वरदान । महाराजा समर्था ॥ १० ॥
देहवृक्ष सफलित । होतां होईन पुनीत ।
वांझपणें वृथा जात । लोकनिंदाकारण’ ॥ ११ ॥
ऐकोनि ऐसें वचन । गुरुशिष्य करिती हास्यवदन ।
मायेनें मोहिलें म्हणोन । पुत्ररत्न इच्छिलें ॥ १२ ॥
तुकाराम ’तथास्तु’ म्हणती । उभयतांसी निरोप देती ।
मग पावले नाशिकप्रांतीं । पंचवटीसमीप ॥ १३ ॥
सद्‌गुरु वदती भार्येसी । ’काय आठवली विवसी ।
मागितलें पुत्रवरासी । मोक्षदात्यासन्निध ॥ १४ ॥
कामधेनू गृहीं आली । क्षीर सेवून सोडिली ।
ऐसी तुवां करणी केली । मायामोहित होवोनि ॥ १५ ॥
अवचटें परिस गवसला । तो भिंतीमाजीं चिणिला ।
तेणें सुवर्णलाभा मुकला । अभागी जैसा ॥ १६ ॥
अथवा कल्पतरूतळी बैसोनी । अभागी कल्पना करी मनीं ।
भूत झडपील मजलागोनि । या निर्जन अरण्यांत ॥ १७ ॥
राजा बहु संतुष्ट झाला । म्हणें इच्छिलें देईन तुजला ।
अभागी वदे देईं मजला । जीर्ण वस्त्र एखादें ॥ १८ ॥
अत्तरें माखलीं पादत्राणीं । हिरा बैसविला अंगणीं ।
घरीं धान्य नसे गोणी । ऐसें आजि तुवां केलें ॥ १९ ॥
कण फेंकून भूस भरिलें । अथवा चंदन काष्ठें पाणी तापविलें ।
तैसें आजि तुवां केले । पुत्रस्नेहा भुलोनि ॥ २० ॥
जो मोक्षश्रियेचा दाता । जन्ममरणातें चुकविता ।
चिदानंदासी भोगविता । कृपासागर सद्‌गुरु ॥ २१ ॥
तो झालिया प्रसन्न । इच्छिसी पुत्रसंतान ।
न वांछिसि भक्ति अनन्य । रामसेवा घडावी ॥ २२ ॥
चौर्यांशी लक्ष योनी फिरतां । किती पुत्रांची झालीस माता ।
जन्ममरणीं सोडविता । एकही कोठें दिसेना ॥ २३ ॥
नरदेह दो दिवसांची वसति । कोण कोणाचा संगाती ।
कन्या पुत्र आणि पति । देहसंबंधी सकळही ॥ २४ ॥
तो देह नाशिवंत । तत्संबंधीही अशाश्वत ।
ज्याचें त्यानें करावें हित । सद्‌गुरुकृपें ॥ २५ ॥
पुन्नाम नरकापासोनि । म्हणती पुत्र तारील झणीं ।
परि नरकीं जावेंचि कोणी । वासनाक्षय झालिया ॥ २६ ॥
वासना निमालिया पाठीं । स्वर्गनरकाची आटाआटी ।
पापपुण्य उठाउठी । लया जाय मिथ्यत्वें ॥ २७ ॥
उद्धरील बेचाळीस कुळांते । ऐसें बोलती जाणते ।
उद्धरणें तें स्वर्गापरतें । आन नाही ॥ २८ ॥
स्वर्ग क्षीणतेतें पावे । त्यासि हित कैसे म्हणावे ।
तोडिले संसृतीचे गोवे । तरीच हित सधिलें । २९ ॥
जन्मा आलियाचें सार्थक । कांही करावा विवेक ।
जेणें फिटेल हें दुःख । संसृतिजन्य ॥ ३० ॥
असो गुरुकृपें होईल सुत । परि अल्पायुषी अशाश्वत ।
तेणें तुज काय प्राप्त । होईल सांग निश्चयें ॥ ३१ ॥
प्रकृतीपासोन सुख । इच्छिती ते परम मूर्ख ।
दुःखमूळ हा निःशंक । मायाजनित पसारा’ ॥ ३२ ॥
माय सरस्वती खोंचली । म्हणे मज भुली पडली ।
आतां जेणें सार्थकता भली । ती सोय सांगावी ॥ ३३ ॥
सुख एक रामचरणीं । सुखदाता तोचि धनी ।
इतर ते निर्वाणीं । दूर होती पारिखे ॥ ३४ ॥
तुम्ही साधु महाज्ञानी । मज ठाव द्यावा चरणीं ।
लीन दीन उत्सुक म्हणोनि । उपेक्षा करूं नये ॥ ३५ ॥
जेणें मायामोह सुटेल । अनन्यभक्ति पाविजेल ।
मन रामीं रत होईल । ऐसें करावें ॥ ३६ ॥
आपण या देहाचे धनी । देह सार्थकीं लावावा झणीं ।
वरी करितें विनवणी । कृपाळुवा दीनानाथा ॥ ३७ ॥
परिसोनि कांतेचे वचन । संतोषले दयाघन ।
योगदीक्षा तिजलागोन । दिधली तेव्हां गुरुरायें ॥ ३८ ॥
वटदुग्धें जटा वळिल्या । कांचनबांगड्या काढिल्या ।
तुळसीमाळा करीं बांधिल्या । कंठी सूत्र तुळशीचें ॥ ३९ ॥
श्वेत वस्त्र परिधान । भू शय्या व्योम प्रावरण ।
अखंड करविती नामस्मरण । योगमुद्रा सांगितल्या ॥ ४० ॥
प्राणायाम करविती । समाधिही लाविती ।
उपदेशवचनें बोधिती । नित्यकाळीं ॥ ४१ ॥
नदीतटाक गुहावास । वाटे रामाचा वनवास ।
सीमा नसे आनंदास । तया स्थानीं ॥ ४२ ॥
वाटे ऋषीचा आश्रम । उपासना चालिली दुर्गम ।
नित्य ध्याती आत्माराम । सद्‌गुरु आणि माउली ॥ ४३ ॥
कमलसुमन शोधीत भुंगे । धांवती जैसे मनोवेगें ।
मुमुक्षुजन तैसा रिघे । बोधामृत सेवाया ॥ ४४ ॥
अयाचित भिक्षा घेती । कित्येक उपोषणें घडती ।
तेंही समाधान मानिती । नामामृत सेवूनि ॥ ४५ ॥
ऐसा काळ गेला कांही । माउली झाली विदेही ।
न गुंते मायामोहीं । ऐसें जाणिलें गुरुदेवें ॥ ४६ ॥
रामनामी तल्लीन झाली । निःसंदेह वृत्ति बनली ।
सद्‌गुरु निघाले ते काळी । सोडूनिया कांतेसी ॥ ४७ ॥
नाना तीर्थें नाना देश । वनोपवन भाषाविशेष ।
उत्तर दक्षिण भागास । फिरत फिरत चालिले ॥ ४८ ॥
इकडे सरस्वतीमाउली । म्हणें स्वारी कोठें गेली ।
गृही जाण्याची आज्ञा झाली । असे पूर्वीं मजलागी ॥ ४९ ॥
नाशिकग्रामीं गुरुभक्त । कृष्णभट त्रिंबकसुत ।
तेथें जावोनि वदत । ’मज गृहीं पोंचवावें’ ॥ ५० ॥
गुरुपत्नी गृहा आली । तिसी देखतांचे नमस्कार घाली ।
वदे ’आमुची झोंपडी पावन केली । हें महद्भाग्य ॥ ५१ ॥
दोन दिवस हेंचि माहेर । करावा दीक्षेचा उपसंहार ।
मग जाऊं सत्वर । आपले ग्रामीं’ ॥ ५२ ॥
न्हाऊं माखूं घातले । चोळी कंकण लुगडे दिलें ।
सुग्रास जेवूं घातलें । अत्यानंद मानिला ॥ ५३ ॥
दोन दिवस ठेवोनि । निघाले संगे घेवोनि ।
नातेंपुतेंमाजी भगिनी । होती तेथें पोंचविलें ॥ ५४ ॥
इकडे सकल चिंता करित । होते तयां कळली मात ।
ते आनंदें भेटों येत । विचार पुसती मार्गींचा ॥ ५५ ॥
कैसें साधन कैसें भजन । कैसें करविले अनुष्ठान ।
योगदीक्षा किती गहन । सांगतसे सकळांते ॥ ५६ ॥
भेटले तुकाराम सद्‌गुरु । मागितला म्यां पुत्रवरु ।
तेणें कैसा झाला विचारु । आल्हादकारी ॥ ५७ ॥
कैसें घडे अन्नग्रहण । कैं होई उपोषण ।
परि न डळमळे समाधान । सदा आनंदीआनंद ॥ ५८ ॥
माय कुरवाळोन बोले । कष्टलीस नाजुक बाळे ।
दैवीं असे जे लिहिलें । उपाय नसे तयासी ॥ ५९ ॥
कन्या वदे गे आई । कष्टावांचोनि सुख नाही ।
तुम्हीं ऐसा जोडिला जांवई । धन्य भाग्य तुमचें ॥ ६० ॥
तेणें मज समाधान दिलें । पूर्वसुकृत फळा आले ।
धन्य वंदावीं पाउलें । थोरथोरां दुर्लभ’ ॥ ६१ ॥
ऐसे बहुत बोलोन । करी सकळांचें समाधान ।
सदा ध्यायी पतिचरण । रामनाम घेतसे ॥ ६२ ॥
गीता-रावजींस कळली मात । सून सांगे वृत्तांत ।
त्वरित येतील निश्चित । चिंता कांही न करावी ॥ ६३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय सहावा
समास तिसरा
 
इकडे सद्‌गुरुनिधान । पुनरपि घेती गुरुदर्शन ।
मग करिती तीर्थाटन । नाना देशी ॥ १ ॥
अयोध्या मथुरा हरिद्वार । हिमाचलीं बदरीकेदार ।
जाती काशी विश्वेश्वर । क्षेत्रें पुनीत करावया ॥ २ ॥
उत्तरतीर्थें सर्व करोनि । कांही वास इंदोर भुवनीं ।
शरणागतांसी तारोनी । संप्रदाय वाढविती ॥ ३ ॥
इंदोर येथें शिष्य फार । सद्गुरूंचे झाले किंकर ।
त्यांतील जे सत्त्वागार । नामें सांगूं तयांची ॥ ४ ॥
भैय्यासाहेब मोडक म्हणोनि । अखंड होते नामस्मरणी ।
सद्‌गुरु राहती त्यांचे सदनीं । शुद्धभाव पाहोनियां ॥ ५ ॥
जिजीबाई नामेंकरोनि । विप्रस्त्री सुज्ञ सद्गुणी ।
लगाली श्रीसमर्थ चरणी । देह सार्थक करावया ॥ ६ ॥
जिजीबाईस तुकारामदर्शन । तैसें भैयांसही जाण ।
करविलें स्वयें नेऊन । परमभाविक जाणूनिया ॥ ७ ॥
रावसाहेब पळशीकर । दिवाण सद्गुणी चतुर ।
आणिकही असती शिष्य फार । इंदोरग्रामी ॥ ८ ॥
इंदोर हर्दा गोंदावली । सद्गुरूंची स्थाने भली ।
बहुत दिवस वस्ती केली । परमक्षेत्रें पुण्यभूमी ॥ ९ ॥
इंदुरी विशेष प्रसिद्ध । आनंदसागर ब्रह्मानंद ।
गुरुकृपें झाले सिद्ध । सर्वाधिकारी ॥ १० ॥
तयां उपदेश त्या ग्रामी । म्हणोनि विशेष पुण्यभूमी ।
वरचेवरी सद्‌गुरुस्वामी । वास करिती त्या ठायीं ॥ ११ ॥
कांही काळ करोनि वास । सद्‌गुरु निघाले दक्षिणेस ।
मार्गीं देती बहुतांस । उपदेश परमपावन ॥ १२ ॥
बहुत लोक दर्शना येती । बहुतांच्या कामना पुरविती ।
नाना चमत्कार घडती । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ १३ ॥
कोणी दोघे कालिकाउपासक । होते परममांत्रिक ।
जारणमारण-उच्चाटणादिक । विद्येमाजीं अति कुशल ॥ १४ ॥
त्यांनी श्रीगुरु देखिले । नाना चमत्कार करिती भले ।
म्हणती आपणांहून आगळें । सामर्थ्य दिसतें यांजपाशी ॥ १५ ॥
तरी एवढी विद्या शिकावी । म्हणजे वाढेल पदवी ।
काय युक्ति योजावी । विद्याधन मिळवावया ॥ १६ ॥
आसुरें विद्येमाजी प्रवीण । लेखिती आपणांसारिखे जन ।
बहुत प्रकारें विनवोन । म्हणती मंत्र संगावा ॥ १७ ॥
सद्‌गुरु वदती तयांसी । भक्ताभिमानी वैकुंठवासी ।
तोचि घडविता कार्यासी । आम्ही असों निमित्तमात्र ॥ १८ ॥
नाहीं पंचाक्षरी मंत्र । वेताळ नवचंडी-यंत्र ।
सर्व हालवित सूत्र । प्रभु एक रामराय ॥ १९ ॥
आम्ही तयांचे किंकर । सदा गातो रघुवीर ।
न जाणो मंत्र शाबर । सत्य सत्य जाणावें ॥ २० ॥
तें न मानवे तयांसी । म्हणती हो चोरितसे आम्हांपाशीं ।
बंधन करूं नागपाशीं । म्हणजे वळती येईल ॥ २१ ॥
ऐसे चिंतिती अंतरी । फिरती सद्‌गुरुबरोबरी ।
गांठोनि एका डोंगरी । नागपाश टाकिला ॥ २२ ॥
तत्काळ नाग निर्माण झाले । सर्वांगासी बंधन केलें ।
सद्‌गुरु हांसते तये वेळे । कैसी तृष्णा विद्येची ॥ २३ ॥
उभयतां वदती तयांसी । आम्हां मंत्र सांगावा निश्चयेसी ।
तरीच सोडूं या पाशीं । ना तरी घात घडेल ॥ २४ ॥
गुरु म्हणती आम्ही रामभक्त । आमचा न होय घात ।
तुमचा मंत्र जाईल व्यर्थ । सर्प मृत झालिया ॥ २५ ॥
तामसीविद्येपासोनि । तुम्ही करितसां नरकाची जोडणी ।
यमयातनेची जाचणी । भोगितां सर्व आठवेल ॥ २६ ॥
दो दिवसांचे सुखासाठी । पापें सांठवितां कोटी ।
अजुनी अनुताप घ्या पोटीं । म्हणजे सुख पावाल ॥ २७ ॥
सुख व्हावे शाश्वत । ऐसें करा कांही हित ।
ना तरी बुडाल समस्त । नरककुंडामाझारीं ॥ २८ ॥
साधका सिद्धी नाडती । तुम्हांसी चेटकें बुडविती ।
न जाणतां आपुली गति । दुजियासी काय देतां ॥ २९ ॥
बोध करिती बहुतांपरी । न मानिती ते आसुरी ।
म्हणती करितो फसवेगिती । पाश सोडायाकारणें ॥ ३० ॥
तीन दिवस वाट पाहिली । मग 'रघुवीर समर्थ' गर्जना केली ।
डोंगराखाली उडी घेतली । नाग झाले छिन्नभिन्न ॥ ३१ ॥
देखोनि ऐसा चमत्कार । उभयतां वाटला विस्मय थोर ।
सामर्थ्य असतांही धुरंधर । तीन रात्री साहिल्या ॥ ३२ ॥
जाईल आमुचें मंत्रबल । म्हणोनि सोशित हाल ।
तोडिले दुर्भेद्य व्याल । मानवी बल नव्हे हें ॥ ३३ ॥
आधीं बहुत बोध झाला । वरी साक्षात्कार घडला ।
उभयतां अनुताप उपजला । धांवोनि चरण धरियेले ॥ ३४ ॥
अनंत अपराधी मंदमती । बहुत भोगिल्या आपत्ती ।
कृपासागर गुरुमूर्ति । क्षमा दीनांसी करावी ॥ ३५ ॥
म्हणोनि लागती चरणी । कृपा भाकित करुणावाणी ।
सोडवा या भवांतुनी । परमपावन गुरुराया ॥ ३६ ॥
सद्‌गुरु दयाघन वर्षले । मुमुक्षुचातकां शांतविले ।
अनुग्रह देवोन लाविले । रामभक्तीसी ॥ ३७ ॥
दोघे सेवा करिती गहन । एका निरोप देती जाण ।
सच्चिदानंद नामेंकरून । फिरती गुरुसन्निध ॥ ३८ ॥
अतिकठिण सेवा करी । नामें झिजवी वैखरी ।
तुर्याअवस्थेतें वरी । सच्चिदानंद ॥ ३९ ॥
येथेंचि सिद्धि नाडिती । साधका फशीं पाडिती ।
याची अपूर्व कथा धरावी चित्ती । श्रोते साधन सुज्ञ हो ॥ ४० ॥
सद्‌गुरु रामेश्वरा चालिले । आगगाडीस्थानासमीप आले ।
अवकाश जाणोनि बैसले । धर्मशाळेमाझारी ॥ ४१ ॥
कांही काळ लोटल्यावरी । गाडी आली अड्ड्यावरी ।
श्रीगुरु पोंचती तंववरी । गाडी चालूं जाहली ॥ ४२ ॥
सच्चिदानंद हें अवलोकून । म्हणे श्रीगुरुवांचोन ।
कोठें धांवतेस 'कूं' करोन । स्थिर रहा ॥ ४३ ॥
त्याचे तपसिद्धीचेनि बळे । गाडी पुढें न चाले ।
उपाय करोनि थकले । गाडी चालक ॥ ४४ ॥
सद्‌गुरु मनीं जाणती । बळेंचि विलंब लाविती ।
पाहोन शिष्याची कृति । बोलते झाले ॥ ४५ ॥
'साधोनिया साधनासी । सिद्धिउपभोग इच्छिसी ।
ही काय आठवली तुजसी । तमोबुद्धि पूर्वींची ॥ ४६ ॥
आम्हां गोसावियांप्रति । जाण्याची काय गडबळ होती ।
उदयीक जाऊं पुढती । तुवां हें काय केलें ॥ ४७ ॥
कलि वाढला दुर्धर । काम्यकर्मीं सकल वर ।
भलताच होईल जोजार । साधनीं व्यत्यय येईल ॥ ४८ ॥
आम्हां सत्वर जाणे असे । तरी काय विलंब असे ।
नेत्र मिटावे स्वल्पसे । मग पहा चमत्कृति' ॥ ४९ ॥
क्षण एक नेत्र मिटले । शिष्यासह गुप्त झाले ।
उघडोन बा पाहीं । डोळे । रामेश्वरा नमन करी ॥ ५० ॥
सिद्धिची तों ऐसीं स्थिति । परि साधकां ने अधोगती ।
अद्याप न जाय आसक्ति । मुख न दावी द्वादशाब्दें' ॥ ५१ ॥
बोलोनि ऐसें तयासी । गुप्त झाले सत्वरेंसी ।
प्रकटले इंदुरीं ज्ञानराशी । सद्‌गुरुनाथ एकले ॥ ५२ ॥
कांही काल इंदुरीं राहिले । इकडे रावजी निवर्तले ।
श्रीगुरूंनी मुंडन केले । लोक आश्चर्य करिताती ॥ ५३ ॥
सांगते झाले लोकांसी । आज वडील वैकुंठवासी ।
तिकडे गोंदावलीची स्थिति कैसी । झाली पहा ॥ ५४ ॥
गीताईस दुःख झाले । सत्त्वगुणी रावजी गेले ।
अण्णा बाळ उघडे पडले । कनिष्ठ बंधु सद्गुरूंचे ॥ ५५ ॥
ज्येष्ठ सुतावांचोनि कांही । उत्तरक्रिया होणें नाही ।
ऐसा अभिप्राय सर्वही । विप्रीं काढिला मंथुनी ॥ ५६ ॥
सद्गुरूंचा शोध करिती । आल्यागेल्या विचार पुसती ।
कांही कळेना निश्चितीं । चिंता करिती अनिवार ॥ ५७ ॥
तंव अकस्मात् दशमदिनीं । तेथें आली गुरुजननी ।
मुंडन केले पाहोनि । आश्चर्य करिती लोक सर्व ॥ ५८ ॥
यथासांग क्रिया केली । सवेंचि स्वारी निघोनि गेली ।
सकळां हळहळ वाटली । धांवा करिती गुरूंचा ॥ ५९ ॥
पुनः प्रकटती इंदुरांत । सद्‌गुरु गोसावी वेष सोडीत ।
राजयोग धरिती परिधान करित । कौपीन कफनी फरगूल ॥ ६० ॥
गणेश टोपी शिरीं घालिती । पायीं खडावा वागविती ।
कुबडी स्मरणी झोळी घेती । कार्याकारण ॥ ६१ ॥
उंची वस्त्रें जरतारी । द्वादश शरीरीं ।
केशर अक्षंत शोभे शिरीं । वैष्णवी त्रिपुंड्र ॥ ६२ ॥
एकांतवास सोडिला । शिष्यसमुदाय असंख्य झाला ।
घेती घेवविती नामाला । श्रीरामप्रभूच्या ॥ ६३ ॥
बहुत जन दर्शना येती । अनुग्रह घेतां सुखी होती ।
नित्य उठती भोजनपंक्ति । समाराधना गुरुगृहीं ॥ ६४ ॥
दर्शनमात्रें आनंदवी । नानासंकटी सोडवीं ।
भाविक नास्तिक कामिक लावी । रामभजनीं सकळांसी ॥ ६५ ॥
शास्त्री वैदिक वेदांती । कर्मठ शाक्त सिद्धांती ।
सकलांचे समाधान करिती । श्रेष्ठत्व दाविती नामाचें ॥ ६६ ॥
नाम सकळाचें सार । नाम सकला आधार ।
कलियुगी भवपार । एक नामचि पाववी ॥ ६७ ॥
ऐसा करूनि उपदेश । प्रचीत दाविती जनांस ।
हरिहाट केला कालिकतास । संतसमुदाय मेळवुनि ॥ ६८ ॥
सकलां रामरुप पाहती । नरनारी सेवा करिती ।
मायबापाहूनि प्रीति । सद्‌गुरुवरी सकलांची ॥ ६९ ॥
सद्‌गुरु आमुचा आप्तसखा । सद्‌गुरु आमुचा पाठिराखा ।
सद्‌गुरु चैतन्यचि देखा । सूत्रें हालवी सकलांची ॥ ७० ॥
सद्‌गुरु सन्निध असतां कळिकाळा हाणूं लाथा ।
ऐसें सकलांचे चित्ता । वाटतसे भावबळें ॥ ७१ ॥
वैभव नृपाहून थोर । 'महाराज' ऐसें वदती नर ।
गोंदावलें गांवकामगार । गोंदवलेकर कोणी म्हणे ॥ ७२ ॥
सामर्थ्य पाहतां अद्भुत । यास्तव म्हणती समर्थ ।
भक्ति-ज्ञान-वैराग्ययुक्त । सत्पुरुष कोणी म्हणे ॥ ७३ ॥
सद्वस्तु सच्छिष्या दाविती । तेणें सद्‌गुरु कोणी म्हणती ।
गणूबुवा गोंदावलीप्रति । बोलती बालमित्र ॥ ७४ ॥
गुरुदत्त ब्रह्मचैतन्य । नाम असे परम मान्य ।
चैतन्यब्रह्मीं अनन्य । एकरूप जाहले ॥ ७५ ॥
गोंदवलेकर महाराज ऐसें । नाम प्रसिद्ध विशेषें ।
सकल सिद्धांमाजी विलसे । सद्‌गुरु शिरोमणीं ॥ ७६ ॥
चहूं देशी ख्याती झाली । महान् साधु गुरुमाऊली ।
नाना संकटीं पावलीं । बहुतांसी ॥ ७७ ॥
शिष्यशाखा बहु झाली । अनेक साधनी लाविली ।
उपदेश वचनीं निवविलीं । अंतरें कित्येकांचीं ॥ ७८ ॥
कोणी वाद करावया येती । कोणी छिद्रेंचि शोधिती ।
कोणी परिक्षां करूं धांवती । सत्य कीं मिथ्या ॥ ७९ ॥
ज्ञान पाहोनि धरिती मौन । वृत्ति पाहोन होती लीन ।
तेज पाहून म्हणती शरण । नास्तिक आणि विकल्पी ॥ ८० ॥
नित्य भजन अन्नदान । नित्य अध्यात्मविवरण ।
नित्य उत्साह आनंदघन । सद्‌गुरुसन्निध ॥ ८१ ॥
सकलां मुखीं रामनाम । हातीं स्मरणीं संख्या नेम ।
सकलांचें सारिखें प्रेम । श्रीचरणीं ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय सहावा
समास चवथा
 
इंदूरी महत्त्व वाढले । गोंदावल्यासी वर्तमान कळले ।
दादोबा आणि गोपाळ निघाले । स्नेहसंबंधी श्रींचे ॥ १ ॥
समजुतीने आणावयाकारणे । दोघांसी केलें पाठवणें ।
इंदूरी दोघे पाहुणे । आले शोध करित ॥ २ ॥
चरणीं लोटांगण घालिती । गोंदावलीची वार्ता सांगती ।
बहुत दिवस आपणाप्रति । जावोनियां जाहले ॥ ३ ॥
काकू शोक करिते फार । उघडे पडलें घरदार ।
तुम्हांसी आणावया सत्वर । आम्हां उभयतांसी दहाडिलें ॥ ४ ॥
सकलही चिंता करिती । तुम्ही चला शीघ्रगती ।
नानापरीनें सांगती । ज्ञानियासी उभयतां ॥ ५ ॥
बरें म्हणोनि कुरवाळिले । जाऊं म्हणोनि राहविलें ।
स्थिति पाहून चकित झाले । राजयोग साजिरा ॥ ६ ॥
उषःकाली भूपाळ्या म्हणती । मंजुळस्वरें कांकड आरती ।
प्रभात होतां पूजा करिती । चरणतीर्थ प्राशन ॥ ७ ॥
भाळीं शोभे केशरी टिळा । कंठीं घालिती पुष्पमाळा ।
मस्तकीं वाहती तुळसीदळा । भक्त अनेक ॥ ८ ॥
नानापरींचे नैवेद्य । देवोनि धरिती श्रीगुरुपद ।
सर्वांस वांटिती प्रसाद । सद्‌गुरु स्वहस्तें ॥ ९ ॥
नित्य समाराधना होती । बहुपरींची पक्वान्नें करिती ।
किती खाती जेवती । गणती नाही ॥ १० ॥
रोगग्रस्त पिशाचग्रस्त । आपत्तीनें जाहले व्यस्त ।
विनवणी करिती समस्त । उद्धरी आम्हां दयाळा ॥ ११ ॥
कोणी दारिद्र्यें त्रस्त झाले । कोणी व्यंगत्व पावले ।
निपुत्रिकही तेथें आले । पुत्रवांछा धरोनि ॥ १२ ॥
आशा मूळ प्रकृती । कामना अनंत उठती ।
कोणी करावी गणती । आर्त तितुके धांवले ॥ १३ ॥
तैसेचि बद्ध मुमुक्षु । साधक आणि जिज्ञासु ।
धांवती सेवाया रसु । गुरुवाक्यबोध ॥ १४ ॥
ऐसिया गर्दीत गवसले । कार्या आलेले विसरले ।
बहुतां दिवशीं स्मरण झालें । उभयतांसी गोंदवलीचें ॥ १५ ॥
पुनः प्रार्थना करिती । सत्वर चला हो म्हणती ।
महाराज अनुमोदन देती । कठिण वाटे सकळांसी ॥ १६ ॥
बेत ठरविला जाण्याचा । निरोप घेती सकळांचा ।
नयनीं पूर अश्रूंचा । लोटतसे भक्तांचिया ॥ १७ ॥
पुनरपि येऊं परतोन । ऐसें देती आश्वासन ।
निघते झाले तेथून । गोंदावलीसी पातले ॥ १८ ॥
आनंद झाला सर्वांसी । भेटले लहान थोरांसी ।
महाराज आले ग्रामासी । गांवोगांवी वार्ता गेली ॥ १९ ॥
भक्तमंडळी धांवली । यात्रा भरली गोंदावली ।
नामनौबत दुमदुमली । भक्तिप्रेम स्फुरतसे ॥ २० ॥
खातवळी पाठविला दूत । भार्या आणविली त्वरित ।
संसारी राहोनि वर्तत । अलिप्तपणें विदेही ॥ २१ ॥
घरची व्यवस्था लागली । माता बोधें शांतविली ।
अण्णांनी देहयात्रा संपविली । सद्‌गुरुसन्निध ॥ २२ ॥
मुक्ताबाई बहीण सती । खातवळी दिली होती ।
तीही गेली स्वर्गाप्रति । अल्पवयामाझारी ॥ २३ ॥
सरस्वती माय गरोदर राहिली । ओट्या भोजनें चालली ।
सद्‌गुरु म्हणती काय भुली । पडली या लोकांसी ॥ २४ ॥
नऊ मास पूर्ण झाले । पुत्ररत्न जन्मास आले ।
परि बारसें नाही करूं दिले । अल्पायुषी जाणोनि ॥ २५ ॥
एक संवत्सराआंत । पुत्र झाला असे मृत ।
तदुपरि मायहि जात । पुत्रासी भेटाया ॥ २६ ॥
असो स्नुषा निवर्तली । गीता माउली दुःखी झाली ।
सद्गुरूंनी माया त्यजिली । वृत्तिशून्य होवोनि ॥ २७ ॥
ऐसा काही काळ निघोन गेला । गीताबाईनें आग्रह धरिला ।
दुजा विवाह पाहिजे केला । पुरवी आस येवढी ॥ २८ ॥
हो ना करिता रुकार । देते झाले गुरुवर ।
स्वयें शोधून सुंदर । आणीन मी नोवरी ॥ २९ ॥
आश्वासुनी मातेसी । गेले आटपाडी महालासी ।
वधु शोधिली सुंदरसी । दोनीं नेत्रीं आंधळी ॥ ३० ॥
बहुत कन्या दाविती । परि सर्वही नाकारिती ।
सखारामपंतांची करिती । सुलक्षणी कन्या पसंत ॥ ३१ ॥
देशपांडे उपनाम ब्राह्मण । चिंता करी रात्रंदिन ।
कन्या असे नेत्रहीन । वर कैंचा मिळेल ॥ ३२ ॥
तंव महाराज अवचित । आळशावरी गंगा लोटत ।
तैसे पावले तेथ । पूर्वपुण्य वधूचें ॥ ३३ ॥
पाहोनि हस्तरेषा । जोडा जमला म्हणती खासा ।
परि मी गोसावी ऐसा । विचार करूनि पाहावें ॥ ३४ ॥
शिळें खावोनि उदर भरणें । त्यासी वाढिली पक्वान्नें ।
तैसें जाणोनि पितयानें । तिथिनिश्चय ठरविला ॥ ३५ ॥
आटपाडीस झाले लग्न । भार्येसह गोंदावलीस जाण ।
येवोनि वंदिले चरण । माउलीचे उभयतां ॥ ३६ ॥
मायगृहीं यमुना म्हणती । सासरीं जाहली सरस्वती ।
आईसाहेब सकळ वदती । शिष्यवर्ग ॥ ३७ ॥
पुनरपि गृहस्थाश्रम । धरिला जो दे आराम ।
तीन्ही आश्रमां परम । साह्यकारी ॥ ३८ ॥
ऐसे गेले कांही दिवस । उपासना वाढली विशेष ।
गृहीं बांधावें मंदिरास । योजिलें मनीं ॥ ३९ ॥
तडवळें येथील कुळकर्णीं । त्यांनी राममूर्ति कोदंडपाणी ।
लक्ष्मणा सीता ऐशा तिन्ही । आणविल्या होत्या ॥ ४० ॥
राममंदिर बांधावयाला । पैसा बहुत जमविला ।
परि सर्वही खर्चिला । वाडा बांधविला सुरेख ॥ ४१ ॥
तेणें ईश्वरी क्षोभ होय । गृह दग्ध होवोनि जाय ।
परि मूर्तीसी न घडे अपाय । अघटित करणी देवाची ॥ ४२ ॥
ठेविल्या होत्या गृहांत । तयासी कळली मात ।
गोंदावलेकर भगवद्भक्त । गृहीं मंदिर योजिताती ॥ ४३ ॥
तयाने आणोन दिधल्या । म्हणे या सार्थकीं लागल्या ।
गुरुगृही कैशा शोभल्या । मूर्ति नव्हे प्रत्यक्ष रूप ॥ ४४ ॥
भक्ताधीन पुरुषोत्तम । भक्तहृदयी आत्माराम ।
भक्तगृहीं शोभतो परम । दर्शनें श्रमपरिहार ॥ ४५ ॥
कुंभार सरवीर कामगार । परम कुशल चतुर ।
तयाकरवीं श्रींचे मंदिर । शके अठराशें तेरांत बांधिले ॥ ४६ ॥
म्हसवडकर बापूसाहेब माने । श्रीमंत असोन सत्त्वगुणें ।
युक्त होते तयांनी । केली मेघडंबरी ॥ ४७ ॥
तैसेंचि बांधिले सिंहासन । कुसरी आणि शोभायमान ।
वरी बैसविले ठाण । रामसीता लक्ष्मणा ॥ ४८ ॥
स्थापनोत्साह अपूर्व झाला । वैदिकसमुदाय जमविला ।
रामचरणां भेटी आला । महानद्यांसह सागर ॥ ४९ ॥
अन्नपूर्णा जाहली उदार । केला गांवभंडार ।
भक्ताधीन परमेश्वर । मग काय उणें ॥ ५० ॥
प्रत्यक्ष ठाकला श्रीराम । जेथें अनंत पावले विश्राम ।
पावती, पावतील, परम- । भाग्यें घडे दर्शन ॥ ५१ ॥
जेथे वसे नाम सतत । वाटे सजीव बोलत ।
समोर उभा हनुमंत । हस्तद्वय जोडोनी ॥ ५२ ॥
देव भक्त आणि नाम । अपूर्व त्रिवेणीसंगम ।
पीडित पावती आराम । ध्यान दर्शन केलिया ॥ ५३ ॥
ध्यान सतेज गंभीर । हास्यमुद्रा, चापशर ।
शोभतसे हस्तकीं , साक्षात्कार । नित्य घडती ॥ ५४ ॥
एकदां ऐसा प्रकार घडला । महाराज करितां भजनाला ।
करीं रामप्रसाद आला । गुलाबकुसुमें ॥ ५५ ॥
पुढें महाराज काशीस निघाले । तेव्हां रामनयनीं अश्रु आले ।
सत्वर येऊं म्हणतां राहिले । जन समस्त पाहती ॥ ५६ ॥
साक्षात् उभे अयोध्यावासी । निश्चयें वाटे सर्वांसी ।
ऐसेपरी मंदिरासी । स्थापना केली गृहामाजीं ॥ ५७ ॥
एके दिवशी गीता माउली । गणपतीसी बोलूं लागली ।
एक इच्छा असे राहिली । महायात्रेची ॥ ५८ ॥
स्नान घडावें भागीरथीचें । दर्शन श्रीविश्वेश्वराचें ।
सार्थक होईल देहाचें । ऐसें करी सत्वर ॥ ५९ ॥
पुरविण्या मातेची आस । निघाले काशीयात्रेस ।
भार्या धाडिली माहेरास । पुढें जाऊं म्हणोनिया ॥ ६० ॥
सदनावरी तुळसीपत्र ठेविलें । विप्रांकरवीं लुटविलें ।
लोभमूळ संसारजाळें । तोडिले मायेचें ॥ ६१ ॥
दहा वेळां काशी केली । म्हणता पायवाट पडली ।
संगें मंडळी निघाली । शेंपन्नास ॥ ६२ ॥
काशीस गेले आजवरी । परि एकले पादचरी ।
तैसे नव्हे या अवसरीं । विश्वकुटुंबी जाहले ॥ ६३ ॥
प्रयागीं गंगाभेट केली । वेणीमाधवाचरणीं घातली ।
तीर्थश्राद्धें सकल केलीं । अक्षयवट दाविला ॥ ६४ ॥
दाविला त्रिवेणीसंगम , दुर्ग त्रिकोणी दुर्गम ।
करविला दानधर्म । माउलीहस्तें ॥ ६५ ॥
त्रिरात्र करोनि वसति । निघाले श्री काशीप्रति ।
जेथें नांदे उमापति । भूकैलास प्रत्यक्ष ॥ ६६ ॥
लिंगमय दिसे काशी । दर्शनें जी अघ नाशी ।
ती दाविली मातेसी । गंगा आणि मनकर्णिका ॥ ६७ ॥
धुंडिराज दंडपाणी । अष्टभैरव दावोनी ।
मग विश्वेश्वर भवानी । करविलें दर्शन । ॥ ६८ ॥
दानधर्म बहुत केला । करिती तीर्थश्राद्धाला ।
विप्रसमुदाय तोषविला । षड्रस अन्नें अर्पोनि ॥ ६९ ॥
पंचक्रोशी अरुणा अशी । दाविली श्रीव्यासकाशी ।
मनीषा पुरवोनि ऐशी । गयाक्षेत्रीं निघाले ॥ ७० ॥
विष्णुपदीं अर्पिला पिंड । जो चुकवी यमदंड ।
धर्म करूनि उदंड । पंड्यांची हांव शमविली ॥ ७१ ॥
बेचाळीस कुळें उद्धरिली । अन्य अनंत तारिलीं ।
परि लौकिक करणी केली । गुरुमाउलीनें ॥ ७२ ॥
मार्गीं बहु जन अनुग्रह घेती । दर्शनें समाधान पावती ।
बोलका देव प्रत्यक्ष म्हणती । पावला आम्हां ॥ ७३ ॥
धर्मकेंद्र काशीपुर । तेथें नामाचा केला गजर ।
शास्त्री पंडित विद्वान थोर । रामभजनीं लाविले ॥ ७४ ॥
जेथें कर्मठ ब्राह्मण । भक्तिपंथा करिती छळण ।
तयांसी प्राकृत नामस्मरण । करावया लाविले ॥ ७५ ॥
काशीनिवासी विद्वान थोर । बाबूभट नामें द्विजवर ।
सद्गुरूंचे झाले किंकर । वास करिती श्रींजवळी ॥ ७६ ॥
कलियुगीं नामचि सार । दावोनि तारिले अपार ।
धन्य कुळ धन्य संसार । जे गुरुवचनी विश्वसले ॥ ७७ ॥
असो करोनि त्रिस्थळी । अयोध्ये आले भक्तबळी ।
मातृआज्ञा प्रतिपाळी । ऐसा विरळा ॥ ७८ ॥
अयोध्यें गीता माउली । अकस्मात् विकृति पावली ।
देहयात्रा संपविली । पुण्यक्षेत्रीं ॥ ७९ ॥
दशदानें सुवर्णदानें । सवत्स दुभती गोप्रदानें ।
विहित तितुकीं दिधलीं दानें । सच्छील द्विजांसी ॥ ८० ॥
नामोत्साह करविला । अन्न वांटले गरिबांला ।
अंतकाळ सांग केला । माउलीचा ॥ ८१ ॥
समुदाय पाठविला ग्रामाप्रति । नैमिष्यारण्यीं स्वयें जाती ।
पुनरपि एकदां अयोध्येप्रति । स्वारी आली यात्रेसी ॥ ८२ ॥
दहिवडीकर जानकीबाई । विनोदें वदती तिजसी पाही ।
सोबतीस तुम्ही राहतां काई । माउलीचे आमुच्या ॥ ८३ ॥
पुण्यक्षेत्र शरयूतीर । वरी सन्निध सद्‌गुरुवर ।
जाणोन देत प्रत्युत्तर । हो जी, हो जी, म्हणोनि ॥ ८४ ॥
निमित्तमात्र आला ज्वर । ठेविलें तिनें कलेवर ।
मुक्तिदाता सद्‌गुरुवर । सुसंधि साधिली ॥ ८५ ॥
तिजसीही तिलांजली । सद्गुरूंनी स्वये दिली ।
अनंत सुकृतें फळा आलीं । धन्य जाहली उभयलोकीं ॥ ८६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय सहावा
समास पाचवा
 
नमन करूं सीतापती । कोदंडधारी श्याममूर्ती ।
कमलनयन दिव्यकांती । महामेरू सत्त्वाचा ॥ १ ॥
विश्वामित्रा साह्य केलें । असुर सर्व संहारिले ।
चरणस्पर्शें पावन केलें । अहिल्यासतीसी ॥ २ ॥
साष्टांगेंसी प्रणिपात । करूं सद्भावनायुक्त ।
गुरुलीला अगम्य बहुत । दासामुखीं वदवावी ॥ ३ ॥
सद्‌गुरु गेले नैमिषवनीं । राहिले एकांत साधूनि ।
उद्धरावया अज्ञानी । पुन्हां इंदुरीं पावले ॥ ४ ॥
सकळांसी श्रुत झाले । गुरुमहाराज येथें आले ।
आनंदोर्मीनें धांवले । गुरुदर्शनाकारणें ॥ ५ । ।
पंचक्रोशी दशक्रोशी । लोक येती दर्शनासी ।
आनंदीआनंद सर्वांसी । होता झाला ॥ ६ ॥
तेथोन आले हर्द्याप्रति । जेथें सुज्ञ विप्र वसती ।
तेथेंही उपासना वाढविती । अनुग्रहप्रसाद देवोनि ॥ ७ ॥
काशीनाथ भैय्या सावकार । तयांकरवीं बांधविलें मंदिर ।
पट्टाभिषिक्त राम सुंदर । स्थापना केली श्रीगुरूंनी ॥ ८ ॥
पूजा नैवेद्य दीप जाण । आल्या अतिथा अन्नदान ।
व्हावया शेती करोन । दिधली असे समर्थें ॥ ९ ॥
महादेवभट्ट इंदोरकर । पुजारी नेमिला सत्त्वस्थ फार ।
बहुत दिवस गुरुवर । सकुटुंब तेथें राहती ॥ १० ॥
उपरि गोंदवलीस आले । अपरिमित भक्त झाले ।
रामनाम जप चाले । चहूंकडे सारिखा ॥ ११ ॥
एक कोट तीन कोट । कोणी करिती तेरा कोट ।
पापाची बुडविली मोट । पापकर्मीं कलियुगीं ॥ १२ ॥
कोणी बद्धाचे साधक झाले । कोणी सिद्धपदवी पावले ।
कोणी वैराग्यातें धरिले । शीळेमाजीं सद्गुरूंचे १३ ॥
चित्तशुद्धि पावले झणीं । झाले दीक्षेचे अधिकारी कोणी ।
कोणी सद्‌गुरुरूप होवोनि । सर्वाधिकारी जाहले ॥ १४ ॥
कोणा चिंतामणि गवसोन । आळसे दारिद्र्य भोगिती जाण ।
ऐसे अभागी किती जन । होवोनि गेले ॥ १५ ॥
नित्य उत्साह गुरुगृहीं । आनंदासी सीमा नाही ।
धनिक गरीब सर्वही । नांदती एके ठायीं ॥ १६ ॥
विद्वान आणि अज्ञानी । पुरुष आणि मायबहिणी ।
नांदती सद्‌गुरुसदनीं । मत्सररहित नीतीनें ॥ १७ ॥
सुधारणा पुराण मतवादी । सात्विक राजस तमोबुद्धि ।
आळशी दक्ष वाग्भेदी । एके छत्रीं वावरती ॥ १८ ॥
व्याघ्रा आणि अजापुत्रा । दरवेशी बांधी एकसूत्रा ।
तेवीं सद्‌गुरुतपस्तेजछत्रा- । खालीं निर्वैर नांदती ॥ १९ ॥
सकळांचें ध्येय एक । सकळां साधनही एक ।
गुरुकृपा मजवरी अधिक । वाटतसे प्रत्येका ॥ २० ॥
बाल तरुण आणि वृद्ध । सकलां सारिखा संवाद ।
रोगासारिखें औषध । वैद्य जैसें देतसे ॥ २१ ॥
शक्ति पाहोन सेवा सांगती । कामिकांच्या कामना पुरविती ।
आशासूत्रासी वळविती । भक्तिमार्गें हळूं हळूं ॥ २२ ॥
जाणोनि सकळांचे अंतर । तेचि देती प्रत्युत्तर ।
खूण पटतां साक्षात्कार । समाधान होतसे ॥ २३ ॥
कोट्यावधि शिष्य झाले । सकलांतरी गुरु खेळे ।
साधनी अडले भुलले । त्यांसी लाविती मार्गासी ॥ २४ ॥
कोणा प्रत्यक्ष सांगत । कोणा होय दृष्टांत ।
दुजें रूप धरोनि हेत । पुरविती कोणाचा ॥ २५ ॥
ज्यानें संकटीं करुणा भाकिली । तेथें सत्वर धांव घाली ।
ऐसी सद्‌गुरुमाउली । संकटकालीं पावतसे ॥ २६ ॥
उदय होतां गभस्ती । साधन बिंबें प्रकाशती ।
तैसी ही गुरुमूर्ती । सर्वां घटीं वास करी ॥ २७ ॥
सद्‌गुरुकृपाप्रकाशें । साधन होई उल्हासें ।
न पडती संसृतीचे फांसे । तयावरी ॥ २८ ॥
शुद्ध भाव जयापाशी । तया अनुभवाच्या राशी ।
देशीं असो वा विदेशीं । सदा सन्निध महाराज ॥ २९ ॥
शिष्य जरी झोंपी जाये । तरी सद्‌गुरु उभा आहे ।
जाणोनि अपाय उपाय । साह्य करी सर्वदा ।। ३० ॥
जैसी होय चित्तशुद्धी । तैसी क्रिया साधनविधी ।
लावोनिया भवनदी । तारोनि नेती गुरुराव ॥ ३१ ॥
कोणा घाली कौपीन । कोणा कफनी टोपी पूर्ण ।
कोणा धरविती मौन । कांही कालपर्यंत ॥ ३२ ॥
कोणा सांगती गुरुसेवा । कोणा म्हणती देव पुजावा ।
कोणा एकांत सेवावा । ऐसी आज्ञा होतसे ॥ ३३ ॥
ब्रह्मचर्य कोणा सांगती । कित्येकांची लग्नें करिती ।
कोणाच्या जटा वाढविती । कोणाचें करविती मुंडण ॥ ३४ ॥
कोणा करविती सन्निध वास । कित्येकांसी दूर देश ।
गृहीं बैसोन जपास । कित्येकांस करविती ॥ ३५ ॥
कोणा देउनिया दीक्षा । मागविती नित्य भिक्षा ।
’ॐ भवति’ या पक्षा । रक्षण करविती ॥ ३६ ॥
कोणा करवी देवालय । बांधविती सद्‌गुरुराय ।
’आल्या अतिथा द्या आश्रय’ । ऐसी आज्ञा होतसे ॥ ३७ ॥
सिद्ध झाले शिष्य थोर । तयां देती अधिकार ।
करावा आतां जगदुद्धार । भक्तिपंथ वाढवावा ॥ ३८ ॥
जाणोन अंतरस्थिति । वर्तमान-भूत-भविष्यगति ।
कठिण सुलभ आज्ञा करिती । भक्तांलागीं दयासिंधु ॥ ३९ ॥
पाहतां सद्‌गुरुदरबार । वाटे हें कैलास शिखर ।
भूतगण दिसती फार । चित्रविचित्र ॥ ४० ॥
वरि सांगितले वेष । आणिक प्रकार बहुवस ।
माळा मुद्रा मणी विशेष । असती तयांमाझारी ॥ ४१ ॥
यावरी हें सुधारणायुग । अनंत वेषें नटलें जग ।
वर्णन करितां दिसेल व्यंग । महाराष्ट्रबोलीं ॥ ४२ ॥
चिंधी बांधिती गळ्यांत । हाडकें हातीं कंठांत ।
निर्जीव चर्म वागवीत । मस्तकावरी कित्येक ॥ ४३ ॥
निष्कारण आंधळे किती । नेत्रां उपनेत्र लाविती ।
रोगग्रस्तासारिखे किती । झांकिती हातपाय ॥ ४४ ॥
जैसा देश तैसा वेष । धरितां लाहिजे सुखास ।
ना तरी हा हव्यास । काचोळा करील त्वचेचा ॥ ४५ ॥
ऐसे दिसती बहु प्रकार । सांगतां होय ग्रंथविस्तार ।
नाना देशींचे नर । रीतिरिवाज वेगळे ॥ ४६ ॥
एकाचें एका कळेना । ऐसे भाषाप्रकार नाना ।
हिंदुस्थानी कानडी जाणा । तेलुगु-गीर्वाणादिक ॥ ४७ ॥
कोणी पिशाचें झाले ग्रस्त । कोणा रोगें केलें ग्रस्त ।
कोणी भ्रमाने बरळत । भूतगण समर्थांचे ॥ ४८ ॥
सकल चरण सेवा करिती । पाहतां चित्रविचित्र दिसती ।
वाटे दुजे भूतपति । महाराज आमुचे ॥ ४९ ॥
वैदिक शास्त्री विद्वान । गरीब आणि धनवान ।
संगतिसुखालागोन । सकुटुंब राहती ॥ ५० ॥
ऐसा कुटुंबियांचा संसार । चालविती गुरुवर ।
विश्वकुटुंबी म्हणती नर । याचसाठीं ॥ ५१ ॥
आणिकही श्रेष्ठ भक्त । ऐसे होते बहुत ।
नित्य येती जाती तयांस । सीमा नाही ॥ ५२ ॥
भाऊसाहेब केतकर । बापूसाहेब पाटखळकर ।
जतकर फारिष्टर । शाळिग्राम व गुरुजी ॥ ५३ ॥
दादोबा अंताजीपंत । व्यंकण्णभट गोडसे वदत ।
रामशास्त्री व पिटके वंदित । वाईक्षेत्रनिवासी ॥ ५४ ॥
गोविंद नामें आळतेकर । पोतनीस जाहगीर ।
सखारामपंत देशपांडे श्वशुर । रामपूजे लाविले ॥ ५५ ॥
मुक्ताबाई परम भक्त । श्रीचरणी देह ठेवित ।
मथूबाई विख्यात । सेवा करी गुरूची ॥ ५६ ॥
अम्मानामें मद्रासी । देहकष्ट बहु सोसी ।
द्वादश वर्षें मौनासी । धरिती झाली गुरुआज्ञें ॥ ५७ ॥
जर लोकर रेशीम । सुबक करी विणकाम ।
शोभवी सद्‌गुरु श्रीराम । भक्तिभावें करोनि ॥ ५८ ॥
चंद्राबाई परमभक्त । मंदिरीं वाची भागवत ।
ताई सुस्वर गाणीं गात । बेळगांवची रहिवाशी ॥ ५९ ॥
आणिकही भक्त बहु असती । नित्य गुरुसेवा करिती ।
भाग्य आलें उदयाप्रति । तेही भोगिती आनंद ॥ ६० ॥
बुवा शास्त्री रामदासी । साहेब पंत संन्यासी ।
राव भट्ट ब्रह्मचार्यांसी । सीमा नाही ॥ ६१ ॥
मामलेदार न्यायाधीश । सरवीर आणि फडणवीस ।
वैद्य जाती विशेष । तात्या नामें संबोधिती ॥ ६२ ॥
अठरापगड याती जमती । सकलां एकरूप पाहती ।
सांभाळोनि धर्मनीति । नाम घेवविती मुखानें ॥ ६३ ॥
सेवाप्रकार बहु असती । अल्प बोलूं संकेतीं ।
जेणें श्रवण पावन होती । भाविकांचे ॥ ६४ ॥
अखंड मुखीं रामनाम । हा एक मुख्य नेम ।
द्यान पूजा अध्यात्म । अवतारलीला वर्णावी ॥ ६५ ॥
याहीवरी सद्‌गुरुसेवा । सेविती सुखाचा ओलावा ।
तोही प्रकार परिसावा । श्रोतेजनीं ॥ ६६ ॥
कोणी खडावा धरिती । कोणी छत्र वागविती ।
पीक पात्र धरोनि हातीं । कोणी उभे सर्वदा ॥ ६७ ॥
कफनी फरगुल कौपीन । पात्रें पडशी भरोन ।
उभे नित्य सन्निधान । सद्गगुरुपाशीं ॥ ६८ ॥
ऐसें करावया कारण । शेती पाहावया फिरतां जाण ।
तैसेचि जाती ग्रामालागून । क्वचित्काळीं बहु दूर ॥ ६९ ॥
कोणी पाय चेपती । कोणी अंग रगडती ।
ऊष्णकाळीं पंखा वारिती । कितीएक ॥ ७० ॥
कोणी आणिती पाणी । सडासंमार्जन कोणी ।
देह अर्पिती सद्‌गुरुचरणीं । अनन्य भक्त नरनारी ॥ ७१ ॥
सेवा सुलभ वा कठिण । घेवोन करिती समाधान ।
येरवीं विदेहालागून । चाड नसे किमपिही ॥ ७२ ॥
कोणा मनीं विकल्प येतां । तात्काळ दाविती विदेहता ।
भक्तालागीं झाली माता । गरजवंत ॥ ७३ ॥
कोणी गाडी ओढती । कोणी उचलोन नेती ।
कोणी संगें धावती । घोड्यावरी बैसतां ॥ ७४ ॥
फौजदार भिकाजी श्रीपत । बताशा घोडा अर्पित ।
वाण सुंदर परि मस्त । कोणासही नावरे ॥ ७५ ॥
परि वरी बैसतां माऊली । निमुट चाले सरळ चालीं ।
क्वचित् स्वारी नाहीं झाली । तरी घाली धिंगाणा ॥ ७६ ॥
गुरुसेवेची आवड भारी । मूक म्हणोनि दंगा करी ।
महाराज बसतां वरी । वार्यासारिखा धांवतसे ॥ ७७ ॥
शाहूराव चिवटे यांसी । घोडा दिधला पाळावयासी ।
तेथें तीन दिवस उपवासी । नेत्रीं येती अश्रुधारा ॥ ७८ ॥
परत दिधला आणोन । अश्व नव्हे सामान्य ।
हा भक्त दिसे अनन्य । वाहन एक श्रीगुरूंचे ॥ ७९ ॥
गंगी नामें गाय लंगडी । सद्‌गुरुरूपीं झाली वेडी ।
कुरवाळितां राहे उगडी । तोंवरी मागें हिंडतसे ॥ ८० ॥
वासना भूतें झडपिती । तींही सेवा करिती ।
संगतीनें उपरम पावती । तामसी बुद्धि सोडोनि ॥ ८१ ॥
आम्हां पिशाच्चयोनींतून । सोडवा, सेवा करूं गहन ।
तुमचें घडलें दर्शन । मुक्त करा दयाळुवा ॥ ८२ ॥
दुष्टबुद्धि पिशाच्चगण । त्यांचेंही पालटे मन ।
कैसें आमुचें अज्ञान । प्रपंचमोह सुटेना ॥ ८३ ॥
मानव भूतें मूक प्राणी । सेवा करिती अखंड चरणीं ।
सद्‌गुरु समस्तांलागोनि । रामरूप पाहती ॥ ८४ ॥
अनंत येती आणि जाती । सकळांवरी सारखी प्रीति ।
आलिया जेवूं घालिती । निघतां बांधिती शिदोरी ॥ ८५ ॥
दर्शना येती सुवासिनी । खणानारळें ओटी भरोनी ।
लेकुरां अंगीटोपी करोनी । आनंदे बोळविती ॥ ८६ ॥
नाना सांसारिक संकटें । निवारिती युक्तिवाटें ।
घरच्याहून प्रिय मोठे । वाटती लहानथोरां ॥ ८७ ॥
नाना हितगुजें सांगती । कन्या जशी माउलीप्रति ।
तैसी सकलां गुरुमूर्ति । संकटकालीं तारितसे ॥ ८८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः पंचमः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय सहावा
समास सहावा
 
नमोप्रचंडकोदंडविहारी । जनकदुहिताचित्तहारी ।
दशमुखदर्पविदारी । अयोध्याधीशा ॥ १ ॥
भार्गवरामा लाजविले । क्षत्रियतेज ऊर्जित केले ।
दशरथात्मजा चरणयुगुले । कृपा करोनि दाखवी ॥ २ ॥
श्रीसद्गुरूंचा संसार । नित्य चाले जगदुद्धार ।
वर्णितां शिणले अपार । म्यां पामरें काय बोलावें ॥ ३ ॥
परि मनें धरिली हांव । कौतुक पुरवी गुरुराव ।
आवडीचा नसे ठाव । त्रिभुवनीं दुजा ॥ ४॥
नित्य नवी आवडी उठो । मन ये चरणी लिगटो ।
वासनासंसार फाटो । ही विनंती माझी ॥ ५ ॥
बहुतांचे संसार शिरीं । घ्यावयाची हौस भारी ।
तेवीं माझा म्हणतो तोहि करीं । धरोनि घालवी मोहातें ॥ ६ ॥
असो गुरुगृहींची स्थिति । दृढ धरा एकचित्तीं ।
जेथें नांदे रमापति । सकलां घटीं दृग्गोचर । ॥ ७ ॥
आईसाहेब सत्त्वशील । प्रसूत झाल्या तीन वेळ ।
दोन कन्या एक बाळ । यथाकाल क्रमानें ॥ ८ ॥
परि तीं नाहीं जगली । बाळपणीं स्वर्गीं गेलीं ।
शांतिनामें होती राहिली । तीन वर्षेंपर्यंत ॥ ९ ॥
सिद्धांचिया पोटी । यावया पुण्यकोटी ।
आत्मा प्रत्यक्षपणें उठी । अधिकार नव्हे सामान्य ॥ १० ॥
जे मोक्षाचे अधिकारी । परि राहिली कांही कुसरी ।
तेचि जन्मती या घरीं । प्रारब्धशेष भोगाया ॥ ११ ॥
मातुःश्रींसी लोभ फार । भक्त येती अनिवार ।
वस्त्रेंभूषणें धन अलंकार । अर्पिती गुरुमायेसी ॥ १२ ॥
त्या आदरें संरक्षिती । कधीं कोणाही न देती ।
लोभ विघातक परमार्थीं । जाणिलें गुरुदेवें ॥ १३ ॥
तेव्हां ऐसा प्रकार घडला । आईसाहेबां ज्वर भरला ।
वाढतां वाढतां वाढला । सर्व झाले भयभीत ॥ १४ ॥
सद्‌गुरु वदती ते समयीं । ’आतां तुझा नेम नाहीं ।
सर्वस्व अर्पीं द्विजपायीं । भक्तिभावें करोनिया’ ॥ १५ ॥
संकल्पें उदक सोडविलें । झांकले तें बाहेर काढले ।
द्विजस्त्रियांसी अर्पिले । स्वहस्तें श्रीगुरूंनीं ॥ १६ ॥
उंची वस्त्रें भरजरी । अलंकार रत्नें गोजिरी ।
विप्रां भासे शनि उदरीं । आजिं आला आम्हांसी ॥ १७ ॥
अंगावरील वस्त्राविण । सर्वही लुटविता जाण ।
प्रकृतीस आला गुण । अघटित करणी सद्गुरूंची ॥ १८ ॥
याउपरि कन्या एक । श्रीगुरु घेती दत्तक ।
वर पाहोन सुरेख । दान करिती सालंकृत ॥ १९ ॥
तिचें विठाबाई नांव । मार्डीकर वासुदेवराव ।
चतुर सुगुणी सवैभव । जामात केला तयासी ॥ २० ॥
लग्नसोहळा चालूं असतां । अद्भुत घडली वार्ता ।
श्रवण करितां सद्‌गुरुसत्ता । कळों येईल ॥ २१ ॥
गांवोगांवींचे पाहुणे । आले घेवोनि वाहनें ।
त्यांतील एक घोडें तरणें । बांधिले होतें मांडवीं ॥ २२ ॥
तों काय झाली मात । अश्व अकस्मात झाला मृत ।
विप्र जमोनि विचार करीत । आतां कैसें करावें ॥ २३ ॥
अंत्यज आणिला मांडवांत । शुभकार्या अशुभ होत ।
आम्हीं नेतांही अनुचित । दिसेल कीं निश्चयें ॥ २४ ॥
बहुत चिंतेमाजीं पडले । महाराजांसी श्रुत केलें ।
काय उचित ये वेळें । सांगा तुम्ही सर्वज्ञ ॥ २५ ॥
महाराज म्हणती द्विजांसी । पाहूं चला अश्वासी ।
निजले असेल समयासी । तुम्हां वाटे मृत झालें ॥ २६ ॥
अश्वासमीप जावोनि । कृपादृष्टीं पाहती झणीं ।
वरदहस्तें कुरवाळोनि । म्हणती चैतन्य संचरले ॥ २७ ॥
तंव काय नवल झालें । घोडें झडकरी उठलें ।
चारा खावों लागलें । देखत देखतां ॥ २८ ॥
आश्चर्य वाटलें सकळांसी । अघटित घटना केली कैसी ।
साक्षात् ईश्वर निश्चयेंसी । लोकोद्धारा अवतरले ॥ २९ ॥
नयनीं आनंदाश्रु आले । सर्वांगी रोम थरारले ।
क्षणक्षणा नमवूं लागले । चरणांवरी मस्तक ॥ ३० ॥
असो विवाह सांग झाला । सकलां आनंद वाटला ।
संतति संपत्तिनें भरला । संसार विठाईचा ॥ ३१ ॥
यापरी आणिक किती । गरिबांचे विवाह करिती ।
जांवयांस नाहीं मिती । त्यांत मुख्य सप्तक ॥ ३२ ॥
सुखवस्तु श्रीमान । सात साहेब मुख्य जाण ।
संगतीसखा लागोन । नित्यवास गुरुगृहीं ॥ ३३ ॥
बहुत सिद्ध होवोनि गेले । त्यांत चौदा मुख्य गणिले ।
साधनीं अनंत लागले । सीमा नाहीं ॥ ३४ ॥
कोणी बद्धचि राहिले । कोणी मुमुक्षु झाले ।
कनिष्ठ उत्तम भले । शिष्य झाले अपार ॥ ३५ ॥
मायबाप सासू श्वशूर । कांता पति कन्या कुमर ।
इष्टमित्रांहून गुरुवर । प्रिय वाटती सकळांसी ॥ ३६ ॥
हितगुज गोष्टी सांगती । युक्ति प्रयुक्ति बोध घेती ।
जेणें होय दुःखमुक्ती । विनविती ते गुरुराया ॥ ३७ ॥
कोणा साधन नामस्मरण । कोणाकरवीं अनुष्ठान ।
करवोन दुःखें हरण । करिती ते सकळांचीं ॥ ३८ ॥
शिष्यसमुदाय रामभक्त । त्यां देवाहून प्रिय संत ।
परि श्री वदती हें उचित । नोहे बापा ॥ ३९ ॥
आधीं देवा नमावें । मग गुरूंसी वंदावें ।
परि ते कोणी आयकावें । बोलका देव आमुचा ॥ ४० ॥
जनीं जनार्दन ओळखिला । तो स्वयेंचि देव झाला ।
प्रत्यक्ष सांडोन प्रतिमेला । पुसे कोण ॥ ४१ ॥
अनंत अन्याय क्षमा करिती । परि अहंकार नावडे गुरुमूर्ती ।
साक्षात्कारें छेदन करिती । क्षण एक न लागतां ॥ ४२ ॥
जाणोन परांचे अंतर । नेमकें देती प्रत्युत्तर ।
ऐसा घडतां साक्षात्कार । समाधान पावती ॥ ४३ ॥
कोणी कांही करिती प्रश्न । तात्काळ बोलती जें वचन ।
तेंचि सत्य होय जाण । कालत्रयीं पालटेना ॥ ४४ ॥
आशा धरोनि पुनरावृत्ति । पुन्हां मांडितां प्रश्नोक्ति ।
मनाजोगें बोलोन शांतविती । परि पहिलें तें ढळेना ॥ ४५ ॥
दक्ष तो लक्ष देई । इतरां न कळे कांही ।
आशेनें आंधळें लवलाहीं । करोनि सोडिलें ॥ ४६ ॥
प्रकृति तितुक्या विकृति । अनेक जातींचे जन येती ।
चहाडखोर व्यसनी अतिथी । कर्मठ आणि तामसी ॥ ४७ ॥
अंतरी ओळखुनी अवगुण । तयांसी करिती सावधान ।
न दुखवितां अंतःकरण । बोध करिती ॥ ४८ ॥
जरी कोणाची वस्तु गेली । महाराजां श्रुत झाली ।
सर्वज्ञ म्हणोनि ओळखिली । दुर्बुद्धि कोणाची ॥ ४९ ॥
एकांतीं जावोनि भेट घेती । वस्तु काढोनि आणिती ।
म्हणती सांपडली आम्हांप्रति । मार्गावरी ॥ ५० ॥
दुर्बुद्धी मनीं खोंचले । म्हणती येथें कांही न चले ।
सद्‌गुरुबोधें त्यागिले । दुर्गुण कित्येकीं ॥ ५१ ॥
श्रीगुरुतपस्तेजाखालीं । दुर्गुणांची होळी झाली ।
नरनारी एकत्र नांदलीं । चोर आणि धनिक ॥ ५२ ॥
कित्येकांसी साधनबळें । दुर्गुण त्यजाया लाविले ।
स्वर्गाहून अधिक शोभलें । सद्‌गुरुधाम ॥ ५३ ॥
स्वर्गीं कामक्रोधांच्या राशी । ईषणा मत्सर भूतांसी ।
क्षय होय सुकृतासी । नित्यकाळीं ॥ ५४ ॥
तैसें नव्हे गुरुधाम । सकाम होती निष्काम ।
जोडती सुकृतें अनुपम । देवादिकां दुर्लभ ॥ ५५ ॥
कित्येक ते आपत्काळीं । धांवती सद्‌गुरुपदकमळीं ।
विनविती जीं तापली । दारिद्र्यदुःखें ॥ ५६ ॥
तयांसी साह्य करिती । व्रतबंधां नाहीं मिति ।
विवाह करूनिया देती । गरिबागुरिबांचे ॥ ५७ ॥
नामस्मरण अन्नदान । यांची गणती करील कोण ।
दुष्काळीं करिती अन्नदान । कित्येकांलागून साह्य केलें ॥ ५८ ॥
जेथें नांदे लक्ष्मिपति । तेथें सहजचि लक्ष्मीची वसति ।
दानधर्मासी नाहीं मिति । सद्‌गुरुघरीं ॥ ५९ ॥
चिंतुबुवा कुलगुरूंसी । आणविलें गोंदावलीसी ।
क्षेत्र देऊनि तयांसी । राहविलें तेथेंचि ॥ ६० ॥
घरची शेती वाढविली । विहीर जमीन सोज्ज्वळ केली ।
रामसंस्थानाकडे दिली । नूतनही मोलें घेऊनी ॥ ६१ ॥
रुद्रस्वाहाकार केला । तैसेंचि गायत्री पुरश्चरणाला ।
द्रव्य देवोनि तृप्त केला । अनेक वेळां विप्रगण ॥ ६२ ॥
दुष्काळीं आटपाडीसी । दारिद्र्यें पीडित विप्रांसी ।
बैसविलें नामजपासी । अन्नवस्त्र देउनी ॥ ६३ ॥
अठरा कारखाने चालती । प्रतिवर्षें नूतन इमारती ।
करोनि बहु शोभविती । गोंदावलीसी ॥ ६४ ॥
पहिले मंदिर लहान होतें । यास्तव दुजें बांधिलें तेथें ।
दिवसेंदिवस दाटी होते । ऐसें मनीं आणोनी ॥ ६५ ॥
धर्मशाळा बांधिली मोठी । दत्तमंदिर ज्ञानवापीतटी ।
भजनशाळा बांधली गोमटी । तैसेंचि मंदिर शनीचें ॥ ६६ ॥
भक्तजन उतरायासी । जागा होईना पुरेसी ।
जाणोनि नूतन गृहांसी । बांधविती ॥ ६७ ॥
गोठणीं केली गोशाळा । ओढ्यासी घाट बांधिला ।
दुरुस्त झाली पाकशाळा । पार आणि वृंदावनें ॥ ६८ ॥
भाऊसाहेब केतकर । सद्भक्त चतुर कामगार ।
तयांकरवीं गुरुवर । देखरेख ठेविती ॥ ६९ ॥
उभय मंदिरापाशीं । शिवालयें बांधिलीं खाशीं ।
ऐक्य दाखविलें हरिहरांसी । येणें प्रकारें ॥ ७० ॥
श्रीगुरूंची सेवा करोनि । देह झिजविला जयांनी ।
त्यांची नांवे श्रोतेजनीं । अल्पस्वल्प परिसावीं ॥ ७१ ॥
महाभागवत कुर्तकोटीकर । छत्र धरिती गुरूंवर ।
पादुका वागविती निरंतर । समागमें राहोनी ॥ ७२ ॥
भागवतां निरोप झाला तेव्हां । तदनंतर गोविंदबुवा ।
तैसीच करिती भावें सेवा । मानवां जी दुर्लभ ॥ ७३ ॥
पंतोजी कोल्हापुरकर । गोरक्षणीं दक्ष फार ।
वस्त्रें धुताती सुंदर । वामनराव ज्ञानेश्वरी ॥ ७४ ॥
दाढे जे अंताजीपंत । दामोदर दुजे भक्त ।
श्रीधरभट्ट स्वदेह झिजवित । खजिनदार गुरुघरचे ॥ ७५ ॥
द्रोण पत्रावळी लक्ष्मण । पुरवी एकनिष्ठें करून ।
भवानराव निळकंठबुवा जाण । इंधनासी पुरविती ॥ ७६ ॥
हरभट चिंचणीकर जोशी । प्रेमें भजन करिती हर्षीं ।
मर्ढेकरशास्त्री पुराणासी । नित्य वाचिती मंदिरीं ॥ ७७ ॥
भाऊसाहेब वनाधिकारी । वाईकर रामशास्त्री ।
हेही वाचिती मंदिरीं । धर्मग्रंथ ॥ ७८ ॥
विश्वनाथ अश्व पाळी । मुक्ताबाई पाकशाळीं ।
आणिकही भक्त मंडळी । देह झिजविती गुरुगृहीं ॥ ७९ ॥
ज्यांची भाग्यें उदया येती । तेचि गुरुगृहीं राबती ।
अभागी आम्ही मंदमति । चरणधूळ वंदूं तयांची ॥ ८० ॥
कोणी रांगोळ्या घालिती । गुरुचरण प्रक्षाळिती ।
उष्टावळी कोणी काढिती । दळण दळती गुरुभगिनी ॥ ८१ ॥
दामूबुवा कुरवलीकर । सेवें झिजविलें शरीर ।
सिद्धपणें महीवर । विचरती आतां ॥ ८२ ॥
गुरुगृहीं काढून केर । नाशिला सर्व संसार ।
ऐसे असती अनेक नर । वंदूं तयां साष्टांगे ॥ ८३ ॥
ही गोंदावलीची स्थिति । इतरत्रही बहु असती ।
ग्रंथ वाढेल या भितीं । स्वल्प संकेत दाखविला ॥ ८४ ॥
असो ऐसा संसार । कुटुंबी जन अपार ।
अखंड चाले कारभार । उसंत नाहीं ॥ ८५ ॥
इतुकीही करूनि व्याप्ति । तेथें सदैव नांदे शांती ।
वृत्तिशून्य योगेश्वर असती । अनुभवा येई प्रत्यक्ष ॥ ८६ ॥
ज्ञानी स्वप्नींचे वैभव । खोटें पाहे सावयव ।
असत्य जाणूनि लाघव । सत्यपणें पाहे जैसा ॥ ८७ ॥
नित्य जलामाजीं वसती । परि जलबिंदूही न धरिती ।
कमलपणें जैशा रीती । तैसे वागती गुरुराव ॥ ८८ ॥
अथवा आकाश जगव्यापक । माजीं कार्यें होतीं अनेक ।
चहूंभूतांचे कौतुक । किती म्हणोनि सांगावें ॥ ८९ ॥
सों सों वारा वाही । धुरळा उठवीं ठायीं ठायीं ।
वाटे आकाश भेदोनि जाई । दिव्यलोकीं ॥ ९० ॥
धूमाचे चालिले लोट । विजांचा उठे कडकडाट ।
मेघ फिरती घनदाट । ठायीं ठायीं अंबरीं ॥ ९१ ॥
परि तें कांही मळेना । भिजेना हलेना उडेना ।
व्यापकता शांति सोडेना । जैसें तैसें ॥ ९२ ॥
अखंड व्यपार होती जाती । वरिवरी विकारले दिसती ।
परि डळमळेना शांति । अलिप्त स्वरूपानुसंधानें ॥ ९३ ॥
जनकराजा कलियुगींचा । वाटे सद्‌गुरु आमुचा ।
करोनि व्यापक प्रपंचा । विदेहता नित्य भोगी ॥ ९४ ॥
असो जनसमुदाय वाढला । वेळोवेळीं बोध केला ।
जिहीं भावें हृदयीं धरिला । भोगिती ते जीवन्मुक्ति ॥ ९५ ॥
त्यांतील कांहींसा भाग । त्यांचेचि शब्दें बोलूं मग ।
श्रवणें निवेल तगमग । मनन क्रिया केलिया ॥ ९६ ॥
पुढील अध्यायीं निरूपण । सद्‌गुरुवचनें होईल पूर्ण ।
चित्तीं धरितां अनुसंधान । समाधान पावेल ॥ ९७ ॥
प्रपंच आणि परमार्थ । तरोनि साधेल स्वार्थ ।
सद्‌गुरुवचन सिद्धांत । येईल हाता ॥ ९८ ॥
सप्तमाध्याय महौषधि । सेवितां शमे भवव्याधि ।
स्थिर करोनियां बुद्धि । श्रवण मनन करावें ॥ ९९ ॥
कामधेनू गृहीं आली । पूजनें अर्चनें तोषविली ।
सहज होईल पान्हावली । मनोप्सित पुरवील ॥ १०० ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ १०१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुगुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः षष्ठः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥