शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (14:45 IST)

झोपताना रोज रात्री म्हणावा हा छोटासा मंत्र

सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो ॥
 
न निश्‍चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो ।
स्वतत्त्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो ॥
 
अर्थ-
मला निरंतर सत्संग लाभो, सज्जनाचे भाषण माझ्या कानावर येवो. मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो. साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिले असतां हट्टाने त्यानें तेथें अडून राहो. इतके करूनही साधुचरणांचा वियोग झालाच तर खूप रडावे, तरी पण तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेत नेहमी रंगून जावे.
 
माझे मनातील निश्चय कधीही डळमळीत न होवो, दुष्टांनीं केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. तुमच्या भजनात चित्त निश्चळ राहो, साधूंन सांगितलेल्या मार्गाकडे अन्तःकरण लागो. हृदयाला आत्मज्ञान लाभो, खोटा अभिमान साफ नाहीसा होवो. भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा मलीन न होवो आणि खर्‍या आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म होवो.