गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (11:58 IST)

श्री संतोषीमाता माहात्म्य

santoshi mata katha
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीकुलदेवताय नमः ॥ श्रीकुलस्वामिन्यै नमः ॥
श्रीसद्‌गुरवे नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥
श्रीसद्‌गुरवे नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥
जयजयाजी गणनाथा । आद्यपूजित शिवसुता ।
तुझिया चरणी ठेवुनी माथा । वंदितो कार्यारंभी या ॥१॥
तू सकल विद्यांचा अधिपति । कलानिपुण ऐसी ख्याति ।
तव कृपेने शुभकार्ये ती । होती संपन्न निर्विघ्न ॥२॥
म्हणुनी प्रथम तुजसी प्रार्थना । देई मजसी आशीर्वचना ।
ही सात्विक ग्रंथरचना । स्फूर्ती देऊनी करवावी ॥३॥
आता नमितो वाग्भवानी । माता सरस्वती ब्रह्मनंदिनी ।
आदिशक्ती चित्स्वरूपिणी । प्रेरणा सकल विश्वाची ॥४॥
श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । आणि श्रीकृष्ण भगवंत ।
श्रेष्ठ कवीश्वरांसहित । वंदितो संतसज्जनांते ॥५॥
आपली कृपादृष्टी वळता । सकल कार्यीं सफलता ।
नच वर्णवे आपुली श्रेष्ठता । थोरवी अगम्य अगणित ॥६॥
आता जिच्या स्नेहाने जगता । आली विलक्षण प्रसन्नता ।
ती प्रेममूर्ती संतोषी माता । नम्रभावे वंदितो ॥७॥
हे माते जगत्‌जननी । तू साक्षात लक्ष्मीस्वरूपिणी ।
गणपतीची कन्या म्हणूनी । मान विशेष तुजलागी ॥८॥
तू सकल ऐश्वर्यदायिनी । भवदुःख दारिद्र्यहारिणी ।
अनंत ममतायुक्त भवानी भक्तिगम्य सर्वथा ॥९॥
भक्तवत्सल भक्ताभिमानी । महाचातुर्यकलास्वामिनी ।
उदंड कीर्ती चतुर्दश भुवानी । नच वर्णवे श्रेष्ठता ॥१०॥
तव कृपेने सद्‌भक्तांप्रत । थोर सौभाग्य होय प्राप्त ।
पुरवुनी तयांचे इष्ट मनोरथ । देसी दान तू सौख्याचे ॥११॥
आयुरारोग्य संतती संपत्ती । यश वैभव प्रतिष्ठा कीर्ती ।
सद्‌बुद्धी आणि श्रद्धा भक्ति । होते प्राप्त तव भक्ता ॥१२॥
त्वत्कृपेने सद्‌विद्या लाभती । महाभयंकर संकटे टळती ।
समस्त शत्रू निष्प्रभ होती । नुरते न्यून जीवनी ॥१३॥
त्वत्कृपे चारी पुरुषार्थ साधती । भाविक भवसागरी तरती ।
व्यथा चिंता दिगंतरी पळती । ऐसे माहात्म्य अनिर्वच ॥१४॥
म्हणूनी विधिहर आणि श्रीपती । समस्त निर्जर मुनिश्रेष्ठी ।
अत्यादरे भावयुक्त गाती । तव महिम्न निरंतर ॥१५॥
तू भोळ्या भाविकांसी । आणि संतसज्जनांसी ।
जागृत राहूनी अहर्निशी । सांभाळीसी सर्वत्र ॥१६॥
तुझिया चरणी जे नतमस्तक । त्या सर्वांचे दुःख विदारक ।
वारूनी देसी सर्वही सुख । जे अलभ्य देवादिकां ॥१७॥
समाधान शांती प्रसन्नता । हे तुझेच वरदान माता ।
तुझ्या प्रसादे सर्व पूर्तता । होती सुखरूपा भाविक ते ॥१८॥
तू निर्गुण निराकार । स्थूलीं सूक्ष्मीं राहसी निरंतर ।
विश्वव्यापक कार्य थोर । नाकळते जडमूढांते ॥१९॥
तरी जाणूनी भक्तमनोगत । प्रकटसी साकार रूपात ।
तव वात्सल्य त्रिजगतात । आहे ज्ञात सकलांसी ॥२०॥
तव साकार स्वरूपाते । काय वर्णन करू माते ।
तुझ्या दर्शने कोटी मदन ते । लीन होती चरणांसी ॥२१॥
मस्तकी दिव्य रत्‍नमुकुट । त्याची प्रभा वर्णनातीत ।
लक्ष भानूंचे तेज समस्त । जणू एकवटले त्या ठायी ॥२२॥
कुरळ कुंतल त्यामधुनी । हळूच डोकावती जननी ।
दिसताहे तो शोभूनी । भालप्रदेश विस्तीर्ण ॥२३॥
त्यावरी कुंकुमतिलक सुंदर । बालरविसम तो खरोखर ।
कर्णभूषणे दिव्य मनोहर । तुझिया श्रवणी डोलती ॥२४॥
पद्मदलासम विशाल नयन । भृकुटी मोहक कृष्णवर्ण ।
सरळ नासिका, स्मितानन । असे तेजस्वी प्रभायुक्त ॥२५॥
अधरद्वय आरक्तवर्ण । दंतपंक्ती मौक्तिकासमान ।
कपोल हनुवटी ग्रीवाही छान । अति सुकोमल सर्वार्थे ॥२६॥
कंठी दिव्य रत्‍नहार रुळती । पदके निजतेजें झळकती ।
सुगंधीत पुष्पमाला शोभती । वक्षस्थानी तव जगदंबे ॥२७॥
सिंहकटीवरी स्वर्ण मेखला । तिच्यावरी क्षुद्रघंटिका-मेळा ।
त्या रुणझुणती वेळोवेळा । करिती मुग्ध श्रवणांते ॥२८॥
अंगी कंचुकी दिव्य वसन । पादयुग्मी नाजूक पैंजण ।
चरणद्वय ते कमलवर्ण । आश्रयस्थान भक्तांचे ॥२९॥
चतुर्भुजा आभूषणमंडित । बाजुबंद शोभती तयांत ।
रत्‍नकंकणे मनगटांत । अंगुलींमाजी मुद्रिका ॥३०॥
पार्श्व वाम सव्य हाती । त्रिशुल खङ्ग आयुधे शोभती ।
अन्य हाती शोभून दिसती । पायसपात्र वरमुद्रा ॥३१॥
पद्मासनस्थ संतोषी माता । तिचे सौंदर्य सुखावते चित्ता ।
दर्शने भक्तांसी संतुष्टता । धन्यता उभय नेत्रांसी ॥३२॥
तेणे अष्टभाव दाटती । नयनी सद्‌भावे अश्रू तरळती ।
चत्वारि वाणी जय शब्द बोलती । उधळिती स्तुती सुमनांसी ॥३३॥
ऐसी माता जगत्‌जननी । तिच्या भक्तिने पूर्णत्व जीवनी ।
तिची प्रसन्नता लाभावी म्हणुनी । जन आचरिती व्रताते ॥३४॥
देवी उपासना मार्गात । व्रताचरणे अंतर्भूत ।
त्यामाजी सोळा शुक्रवार व्रत । असे सुलभ फलदायी ॥३५॥
विधिसुत नारदांनी । हे व्रत प्रकट केले या भुवनी ।
असंख्यात भाविकांनी । श्रद्धाभावे आचरिले ॥३६॥
त्याविषयीची एक कथा । तुम्हा सर्वांसी सांगतो आता ।
तेणे श्रवणांसी धन्यता । भावभक्तीही वाढेल ॥३७॥
हे भगवती संतोषीमाता । तूही ऐकावी तुझी कथा ।
भक्तमुखीचे स्तवन ऐकता । होसी प्रसन्न तत्काळ ॥३८॥
तुझे व्रतमाहात्म्य विशेष । ते सांगतो भाविकांस ।
देई स्फूर्ती आणि सुयश । हीच प्रार्थना चरणांसी ॥३९॥
एक वृद्धा एका नगरात । मुलाबाळांसह होती राहत ।
सात पुत्र-सुना तिजप्रत । होती नातवंडेही ॥४०॥
त्यांपैकी सहा पुत्र ज्येष्ठ । उद्यमशील द्रव्य कमवीत ।
सातवा पुत्र तो कनिष्ठ । करीत नसे काहीही ॥४१॥
तो बेकार होता म्हणून । कोणी नच देती त्याते मान ।
आळशी ऐतखाऊ बोलून । अवमानिती सर्वही ॥४२॥
म्हातारीही कमावत्या पुत्रांप्रत । खाऊ घालितसे उत्तम पदार्थ ।
उरले सुरले उष्टे समस्त । वाढीतसे सातव्या पुत्राते ॥४३॥
तो गरीब आणि भोळसट । विचार नच करी किंचित ।
जे अन्न पडेल ताटात । आनंदाने खात असे ॥४४॥
एके दिनी तो कनिष्ठ सुत । काय म्हणतसे पत्‍नीप्रत ।
मातेचे मजवर प्रेम अत्यंत । असे लाडका मी तिचा ॥४५॥
त्यावर भार्या ती फणकारुन । वदली तयाते तत्क्षण ।
सांगू नका आईचे भूषण । मी ओळखते तिजलागी ॥४६॥
ती वरवरचे प्रेम दाविते । परी अंतरी दातओठ खाते ।
तुम्ही बसून खाता आयते । ते नावडते कोणासी ॥४७॥
जेवता तुमचे बंधुराज ते । म्हातारी त्यांचे उष्टे खरकटे ।
गोळा करूनी तुम्हा वाढते । देते शिळे अन्नही ॥४८॥
हे तिचे प्रेम पाहून । मम हृदय येते भरून ।
तुमच्या मातेचे हे थोरपण । केले विदित तुम्हांसी ॥४९॥
तधी ऐकूनी तिचे वचन । तो तियेसी झिडकारूनी ।
वदला ऐसे दूषित बोलून । खीळ घालिसी प्रेमाते ॥५०
मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहीन । तेव्हाच तुझे खरे मानीन ।
त्या यापरी कलुषित वचन । बोलू नको यापुढती ॥५१॥
पुढती दीपावली आली म्हणूनी । वृद्धेसह सर्व सुनांनी मिळूनी ।
विविध पक्कान्ने केली सदनी । लाडू करंज्या कडबोळ्या ॥५२॥
तधी धाकट्याने विचार केला । माता उष्टे देते खायला ।
त्यातील सत्यता पाहू या वेळा । घेऊ परिक्षा अवचित ॥५३॥
मग डोके दुखते सांगून । एक पातळ धोतर पांघरून ।
पाकगृहामाजी जाऊन । पडून राहिला गुपचूप ॥५४॥
काही वेळाने बंधू समस्त । आले भोजनास्तव सदनात ।
मातेने तयांते चांगले पाट । सुंदर ताटे मांडली ॥५५॥
आणि सर्वांना मोठ्या प्रेमाने । खाऊ घातले आग्रहाने ।
लाडू आणि विविध पक्कान्ने । भरभरून वाढली ॥५६॥
भोजनोत्तर बंधू निघून गेले । तै मातेने काय केले ।
त्यांच्या पात्रांत जे काही उरले । तेच वाढले धाकट्याते ॥५७॥
तदनंतर त्याच्यापाशी जाऊन । वदली ऊठ तू घेई जेवून ।
तै सुत तो पांघरूण फेकून । उठून बैसला तत्काळ ॥५८॥
वदला माता नच तू वैरिणी । उष्टे खाऊ घालते निशिदिनी ।
तव खोटेपण या डोळ्यांनी । पाहिले मी प्रत्यक्ष ॥५९॥
मी कमावत नाही म्हणून । बंधू बोलती करिती अवमान ।
आता हे उष्टे अन्न देऊन । तूही लाजविले मजलागी ॥६०॥
तरी यापुढे या सदनात । नाही राहणे शक्य मजप्रत ।
मातृमनीचा दुजाभाव निश्चित । कैसा साहवेल पुत्राते ॥६१॥
मी गृहत्याग करून । जातो अन्य देशी निघून ।
कष्ट करीन पोट भरीन । वा राहीन उपवासी ॥६२॥
ते ऐकून त्या वृद्धेला । अतिशय संताप आला ।
वदली मिजास हवी कशाला । जा हो चालता येथून ॥६३॥
तेव्हा तो सुत कनिष्ठ । आला पत्‍नीपाशी त्वरित ।
वदला तव वचनांची मजप्रत । आली प्रचिती आज दिनी ॥६४॥
माता उष्टे देते म्हणून । तिचे माझे झाले भांडण ।
मी चाललो गृह सोडून । द्रव्य मिळविण्या अन्यत्र ॥६५॥
मी उत्तम कमाई करुन । येईन लवकर परतून ।
तोवरी तू येथेच राहून । करावी कालक्रमणा ती ॥६६॥
ते ऐकूनी त्याच्या पत्‍नीसी । वाईट वाटले त्या समयासी ।
अश्रू दाटले नयनांसी । काय बोलावे नच कळे ॥६७
तरीही स्वतःते सावरून । वदली सुयोग्य करता आपण ।
तो भगवंत करील रक्षण । आता निघावे आनंदे ॥६८॥
जाताना तुमची आठवण म्हणून । काही तरी जावे देऊन ।
त्यावरी मी करीन सहन । विरह तुमचा पतिराया ॥६९॥
तधी पत्‍नीचे मनोगत जाणून । तयाने अंगठी दिधली काढून ।
आणि तियेचा हात धरुन । वदला काय ते ऐकावे ॥७०॥
म्हणाला प्रिये या समयास । तू ही अंगठी घेतलीस ।
तशीच एखादी वस्तू खास । देई तुझी मजलागी ॥७१॥
त्यासमयी ती गोठ्यानिकट । गोवर्‍यांसी होती थापित ।
सहजगत्या बोलली तयाप्रत । काय देऊ मी तुम्हांसी ॥७२॥
मग गोमयलिप्त सव्य कर । उमटवूनी तयाच्या पाठीवर ।
वदली हीच खूण खरोखर । ठेवा तुम्ही ध्यानात ॥७३॥
तदनंतर भार्येचा निरोप घेऊन । तो निघाला ग्राम सोडून ।
शतकोसांचे अंतर चालून । गेला एका नगरीत ॥७४॥
तेथील मोठ्या बाजारपेठेत । धनाढ्य शेठजी होते राहत ।
तयाने त्यांची घेऊनी भेट । नाव गाव ते सांगितले ॥७५॥
आणि वदला जोडून हात । आपण नोकरी द्यावी मजप्रत ।
करीन इमानाने कष्ट । कृपा करावी मजवरती ॥७६॥
तधी तयाते अवलोकून । वदले शेठजी घेतो ठेवून ।
त्वा मम पेढीवरती राहून । कार्यभाग तो सांभाळी ॥७७॥
तेणे तयासी आनंद झाला । अखंड कार्यतत्पर राहिला ।
त्याची चाकरी पाहुनी त्या वेळा । शेठही संतुष्ट होत असे ॥७८॥
त्याच्यावरती लोभ जडला । म्हणूनी तयाते मुनीम केला ।
कालांतरे भागिदार केला । विश्वास ठेवूनी सर्वार्थ ॥७९॥
ऐसी त्याची प्रगती झाली । हाती लक्ष्मी खेळू लागली ।
पेढीलाही बरकत आली । होय लौकिक सर्वत्र ॥८०॥
त्याच मालकाने पुढती । सर्व सूत्रे त्याच्या हाती ।
देऊनी काशीयात्रेसाठी । केले गमन निश्चिंत ॥८१॥
धंद्याची जबाबदारी वाढली । तेणे व्यवहारी मति गुंतली ।
निजभार्येची नाही राहिली । यत्किंचितही आठवण ॥८२॥
ऐसी बारा वर्षे लोटली । त्याच्या पत्‍नीची दुर्दशा झाली ।
हाल‍अपेष्टा सोसत राहिली । श्वशुरगृही ती भार्या ॥८३॥
अहोरात्र काबाडकष्ट । पुरेसे अन्नही नसे मिळत ।
चिंध्या लेऊनी अंग झाकीत । जणू दासीच झाली ती ॥८४॥
घरकामांसह दळण सरपण । शेणगोवर्‍या येई थापून ।
करीत आधिव्याधी सहन । दिन कंठीत राहिली ॥८५॥
त्यावरी जावा, दीर सहा जण । बोलती तिजला घालून पाडून ।
सरता सरेनात ते दुर्दिन । नुरले स्वारस्य जीवनी ॥८६॥
कधी पतीची येता आठवण । पाही मुद्रिका डोळे भरून ।
स्वतःचे करुणी सांत्वन । अश्रू ढाळीतसे एकान्ती ॥८७॥
एके दिनी ती सासुरवाशीण । गेली रानात आणण्या सरपण ।
तेथे एक देवालय पाहून । विश्रांतीस्तव थांबली ॥८८॥
त्या संतोषी माताराउळी । होत्या काही स्त्रिया त्या वेळी ।
त्यांते व्रतरत पाहुनी ती वदली । कवण व्रत हे सांगावे ॥८९॥
काय याचे विधिविधान । काय फलश्रुति सांगा आपण ।
व्रतदेवतेचे महिम्न । तेही सांगा मजलागी ॥९०॥
तधी तियेची जिज्ञासा पाहून । स्त्रियांनी तिजसी केले कथन ।
सोळा शुक्रवारचे पावन । व्रत संतोषी मातेचे ॥९१॥
व्रत-नियम व पूजन अर्चन । आचरण व उद्यापन ।
संतोषी मातेचे श्रेष्ठ महिम्न । केले विदित सप्रेमे ॥९२॥
तेणे प्रसन्न ती जाहली । व्रतनिश्चय करीतसे त्या वेळी ।
मातेसी वंदूनी रानात गेली । काष्ठे गोळा करावया ॥९३॥
ती काष्ठे शहरात विकून । सव्वा आण्याचे गूळ-चणे घेऊन ।
वृद्धेची ती कनिष्ठ सून । आली देवीच्या राउळी ॥९४॥
तेथ संतोषी मातेला । अत्यादरे प्रणिपात केला ।
वदली माते मी अबला । असे अज्ञानी सांभाळी ॥९५॥
मी नच जाणत पूजाविधान । तव अर्चन व्रताचरण ।
तरी मजसी पदरी घेऊन । निवारी मम दुःखाते ॥९६॥
माझे पती दूरदेशी गेले । त्याला एक तप लोंटले ।
वाट पाहुनी शिणले डोळे । घडवी भेट पुनरपि ॥९७॥
मी तव चरणी शरणागत । तरी पुरवावे मनोरथ ।
करीन सद्भावे तुझे व्रत । करीते संकल्प भक्तीने ॥९८॥
त्या दिनी शुक्रवार होता । म्हणूनी आचरिले व्रता ।
ऐसे तीन आठवडे लोटता । झाली प्रसन्न भगवती ॥९९॥
तिने तियेच्या पतीसी त्या वेळी । निजभार्येची आठवन दिधली ।
तेणे तया उपरती झाली । धाडिले पत्र खुशालीचे ॥१००॥
पत्रासमवेत पैसेही आले । तेणे तिचे मन आनंदले ।
त्याचे दीरांना कौतुक कोठले । करिती हेटाळणी सदा ॥१०१॥
ते पैसे सासूने घेतले । वदली तुजसी फुकट पोसले ।
त्याचे मोल द्यावे भले । तोडून बोलली त्या समयी ॥१०२॥
मत्सरी जावाही टोचून बोलती । खाण्यापिण्याचे हाल करिती ।
ते असह्य झाले तिजप्रती । धावली मातेच्या चरणांत ॥१०३॥
नयनी अश्रू आणूनी तेथ । वदली किती पाहसी अंत ।
दया-माया तव हृदयात । आहे की नाही जननिये ॥१०४॥
पतिभेटीची आस मनात । त्यांची सेवा करावी वाटत ।
त्वा त्यांची घडवावी भेट । नको द्रव्य मजलागी ॥१०५॥
तेव्हा प्रसन्न संतोषी माता । वदली मुली ऊठ आता ।
मी पुरवीन तव मनोरथा । भेटेल पती तुजलागी ॥१०६॥
ते वरद-वचन ऐकून । झाले तियेचे समाधान ।
माता संतोषीते वंदुन । परतली निजसदनासी ॥१०७॥
त्याच रात्री तिच्या पतीसी । स्वप्नात जाऊनी माता संतोषी ।
वदली त्वा जाऊनी गृहासी । भेटावे आपुल्या पत्‍नीते ॥१०८॥
येथील सर्व व्यवहार । जावे आटोपूनी ग्रामी सत्वर ।
करी आनंदे संसार । निजभार्येसमवेत ॥१०९॥
ही असे मम आज्ञा जाण । तिचे अविलंब करी पालन ।
त्यातच तुझे सर्व कल्याण । असे सामावले जाणावे ॥११०॥
ती आज्ञा प्रमाण मानून । तयाने व्यवहार केले पूर्ण ।
विश्वासु मनुष्य पेढीवर नेमून । केली तयारी निघण्याची ॥१११॥
पत्‍नीस्तव कपडे स्वर्ण - आभूषणे । आदी खरेदी करूनी तयाने ।
गावाकडे वाहन नेणे । सांगितले गाडीवानाते ॥११२॥
तो शुक्रवार व्रतदिन म्हणून । वृद्धेची ती कनिष्ठ सून ।
घेण्या संतोषी मातेचे दर्शन । सहज पातली राउळी ॥११३॥
तेथ मातेचे सुहास्य वदन । दिसले अधिकचि प्रसन्न ।
ती वदली आज शुभशकून । होत आहेत मजलागी ॥११४॥
तेणे प्रसंन्न अंतःकरण । होय प्रफुल्लित तन-मन ।
तधी माता वदली हासून । उत्तम दिन हा भाग्याचा ॥११५॥
मुली तुझा पति निश्चित । आज भेटणार तुजप्रत ।
तो याच अरण्यात । विश्रांतिस्तव थांबलासे ॥११६॥
आता सांगते तैसे आचरावे । मोळीचे तीन भाग करावे ।
पैकी दोन भारे ठेवावे । एक मंदिरी एक नदितीरी ॥११७॥
उर्वरीत भारा मस्तकी घेऊन । त्वा पतिसी यावा विकून ।
तो स्वयंपाक भोजन करून । जाईन ग्रामी निजसदनी ॥११८॥
तुझे रूप बदलले खरोखर । म्हणून नाही तो ओळखणार ।
तैं त्वा येथील भारा डोईवर । घेऊन जावा सदनासी ॥११९॥
ती काष्ठे अंगणी टाकून । 'सासूबाई' ऐसी हाक देऊन ।
त्वा म्हणावे हे सरपण । आणले न्यावे गृहासी ॥१२०॥
आता करवंटीत मजला । द्या हो पाणी प्यावयाला ।
शुष्क भाकर-तुकडा घाला । भूक भागविण्या मजलागी ॥१२१॥
घरी एखादी चिंधी असल्यास । द्यावी मजला ल्यावयास ।
कोण पाहुणे या समयास । आले आपुल्या सदनासी ॥१२२॥
ती देवी-आज्ञा मानून । केले तियेने तैसेच वर्तन ।
एक मोळी प्रवाशाते विकून । आली परतून राउळी ॥१२३॥
तो प्रवासी तिचा पती । नच ओळखली भार्या ती ।
भोजन आणि थोडी विश्रांती । घेतली, गेला सदनासी ॥१२४॥
तदनंतर ती कनिष्ठ सून । मंदिरातील मोळी घेऊन ।
गेली सत्वरी गाठले सदन । मोळी टाकली अंगणी ॥१२५॥
आणि 'सासूबाई' ऐसी । हाक मारुनी वृद्धेसी ।
जैसी देवी बोलली तियेसी । केले तैसेच निवेदन ॥१२६॥
तधी तिची आर्त हाक ऐकून । सासू भयभीत मनोमन ।
पुत्र चौकशी करील म्हणून । आली त्वरेने तिजपाशी ॥१२७॥
आणि किंचित लडिवाळ सुरात । वदली मुली भरल्या घरात ।
अभद्र बोलू नये किंचित । तू तर राणी राजाची ॥१२८॥
आज तुझा दूरदेशस्थ । पति परतून आलासे येथ ।
त्वा तयाची घेऊन भेट । करी साजरा आनंद ॥१२९॥
चल सत्वरी सदनात । घेई खाऊन साखरभात ।
आज स्वहस्ते मी तुजप्रत । सजवीन गे कन्यके ॥१३०॥
इतक्यात दोघींचे संभाषण । ऐकून सुताने पाहिले डोकावून ।
तो तीच मोळी-विक्रेती पाहुन । झाला अचंबित मनोमन ॥१३१॥
तिच्या हाती आपण दिलेली । मुद्रिका पाहुनी त्या वेळी ।
घरच्यांची करणी कळून आली । नच सांगता त्या पुत्रा ॥१३२॥
आपुल्या पत्‍नीची दुर्दशा पाहून । व्यथित झाले तयाचे मन ।
जन्मदात्रीसी जाब विचारून । काय वदला ते ऐकावे ॥१३३॥
म्हणाला तुझ्यामुळेच माते । मी त्यागिले सदनाते ।
त्या क्रोधाचे बरे उट्टे । काढलेस अबलेवरती या ॥१३४॥
मी तुम्हांसी भेटावे म्हणून । आलो मोठी आशा धरून ।
येथे तुमची कृत्ये पाहून । काय बोलावे नच कळे ॥१३५॥
तुम्ही माझ्या भार्येसी नाडले । अपार कष्ट करवुनी घेतले ।
ते कोणीही सांगेल भले । हिची दुर्दशा पाहुनी ॥१३६॥
काष्ठवत काया झाली । बुबुळेही खोल गेली ।
इतकी तुम्ही घरची मंडळी । कशी निर्दय झालात ॥१३७॥
तेव्हा माता वदली तयासी । तुझ्या जाण्याने ही अशी ।
झाली बाबा वेडीपिशी । हिंडते अहर्निश ग्रामात ॥१३८॥
खात नाही पीत नाही । लुगडे नीट नेसत नाही ।
कामधंदा करीत नाही । बोलते काही भलभलते ॥१३९॥
त्वा हिच्याकडे करी दुर्लक्ष । वा दाखवी श्रेष्ठ वैद्यास ।
आम्ही उपाय करुनी खास । हात टेकले सर्वार्थे ॥१४०॥
तधी मातेसी गप्प करीत । काय वदला तो कनिष्ठ सुत ।
तुझ्या वचनावरी सांप्रत । कैसा विश्वास ठेवू मी ॥१४१॥
ही किती कष्ट उपसते । चक्षुर्वैसत्य पाहिले ते ।
आता काही कारण येथे । नुरले मजसी राहण्याचे ॥१४२॥
मग तयाने स्वतंत्र सदन । घेऊन सजविले तें संपूर्ण ।
राजा-राणीसम दोघे मिळून । करू लागले संसार ॥१४३॥
राजमहालासम त्यांचे सदन । पाहूनी जळफळती बंधुजन ।
त्याच्या पत्‍नीचा थाटमाट बघून । द्वेष करिती जावाही ॥१४४॥
एके दिनी ती पतिव्रता । वदली पतीसी ऐका नाथा ।
मी संतोषी मातेच्या व्रता । सद्भावाने आचरिले ॥१४५॥
तिची कृपा झाली म्हणून । दिसले आज हे सुदिन ।
त्या व्रताचे उद्यापन । करीन म्हणते विधिवत ॥१४६॥
त्याचा होकार मिळता त्या वेळी । उद्यापनाची तयारी केली ।
पाचारिली बाळगोपाळ मंडळी । पुतण्यांसमवेत सदनासी ॥१४७॥
त्या पुतण्यांसी त्यांच्या मातांनी । आधीच पढविले होते म्हणूनी ।
भोजनसमयी हट्ट करूनी । दही ताक ते मागितले ॥१४८॥
त्यांची विपरीत मागणी ऐकून । धास्तावले तियेचे मन ।
वदली बाळांनो आहे उद्यापन । आज माझिया व्रताचे ॥१४९॥
म्हणून कृपया आज दिनी । खाऊ नका आंबट कोणी ।
तेणे माता संतोषी भवानी । करील कल्याण तुमचेही ॥१५०॥
ते ऐकून पुतणेमंडळी । तेथे मुकाट्याने जेवली ।
जाताना पैसे मागू लागली । कारण नच ते सांगितले ॥१५१॥
तिनेही त्यांचे राखण्या मन । पैसे देऊनी केली बोळवण ।
त्याच्या चिंचा विकत घेऊन । खाल्ल्या तियेच्या पुतण्यांनी ॥१५२॥
त्याने व्रत-नियम भंगला । त्याचा देवीसी क्रोध आला ।
राजदूतांनी तिच्या पतीला । नेले धरूनी अन्य दिनी ॥१५३॥
तो आघात त्या अबलेला । नाही जराही सहन झाला ।
वदली सोडावा मम पतीला । हात जोडले दिरांते ॥१५४॥
तधी तयांनी कुत्सित वचन । बोलून तियेसी दिले घालवून ।
वदली तुझ्या पतीचे धन । आहे लुबाडून आणलेले ॥१५५॥
त्या दुष्टाची पाठराखण । कशास करू आम्ही सहा जण ।
जा हो चालती येथून । नको येऊ येथ पुन्हा ॥१५६॥
ते ऐकून ती रडत । आली देवीच्या मंदिरात ।
वदली माते मी तव भक्त । सांभाळी गे जननिये ॥१५७॥
नकळे काय अपराध घडला । म्हणूनी दुःखभोग ओढवला ।
तूच तारून न्यावे मजला । शरणागत मी तव चरणी ॥१५८॥
ते ऐकूनी संतोषी माता । वदली पुतण्यांते द्रव्य देता ।
नाही विचार केला पुरता । तेणे दुःख हे ओढवले ॥१५९॥
त्यांनी त्या पैशातून । चिंचा आवळे खाल्ले म्हणून ।
व्रत-नियमाचा भंग होऊन । त्रास नशिबी आला हा ॥१६०॥
ते ऐकून त्या नारीला । झणी पश्चात्ताप वाटला ।
क्षमा मागत वदली मातेला । नको झिडकारू मजलागी ॥१६१॥
तै मातेसी दया आली । वदली नको भिऊस बाळी ।
तव पतीची सुटका केली । जावे आता सदनासी ॥१६२॥
तेव्हा मातेसी आदरे वंदूनी । ती परतली आपुल्या सदनी ।
तोच पतिदेव आले परतुनी । तेणे जाहली आनंदित ॥१६३॥
अटकेचे ते पुसता कारण । तो वदला नसे विशेष जाण ।
कर नाही भरला म्हणून । आले होते राजदूत ॥१६४॥
तो कर आलो भरून । आता चिंतेचे नाही कारण ।
बरे वाटले ते ऐकून । हात जोडले मातेसी ॥१६५॥
मग अन्य शुक्रवार दिनी । यथाविधि उद्यापन करुनी ।
विप्रमंडळी तोषवून । केली व्रताची सांगता ॥१६६॥
झीले निर्विघ्न उद्यापन । तेणे संतोषी माता प्रसन्न ।
तिच्या प्रसादे देदिप्यमान । पुत्र झाला तिजलागी ॥१६७॥
आणि उत्तम भरभराट । यश मान प्रतिष्ठा जनात ।
तरी नम्र भाव मनात । करीतसे भक्ती मातेची ॥१६८॥
प्रत्येक शुक्रवार दिनी । निजपुत्राते समवेत घेऊनी ।
माता संतोषीते वंदूनी । पूजितसे सद्भावाने ॥१६९॥
एके दिवशी देवीच्या मनी । आले जावे कन्येच्या सदनी ।
दीरा-जावांते धडा शिकवूनी । सन्मार्गावरी आणावे ॥१७०॥
तधी निजस्वरूप पालटले । आक्राळ-विक्राळ रूप घेतले ।
वृद्ध सासूचे घर गाठले । पातली अंगणामाजी ती ॥१७१॥
ते रूप पाहूनी त्या वेळी । म्हातारीने किंकाळी फोडली ।
'धावा! वाचवा!' ओरडू लागली । आली भयंकर कृत्या ही ॥१७२॥
ऐकूनिया ती आरडाओरड । दीर धावले घेऊनी दंड ।
परी घशासी पडली कोरड । उग्र रूप ते पाहूनी ॥१७३॥
जे तिजसी दंडाया आले । तेच तेथून भिउनी पळाले ।
प्राण रक्षावया भले । लपले निजसदनासी ॥१७४॥
तो वृत्तान्त कनिष्ठ सुनेसी । कळता धावली त्या समयासी ।
कृत्या नव्हे ही माता संतोषी । आली तियेने ओळखले ॥१७५॥
आणि नयनी अश्रू आणून । केले तियेने मातेसी वंदन ।
सद्‌भावाने टाळ्या पिटून । बोलाविले सकलांसी ॥१७६॥
वदली भावोजी सासुबाई । या हो बाहेर पाहा नवलाई ।
ही माझी संतोषी आई । आली तुम्हाते भेटाया ॥१७७॥
घ्या हो तुम्ही तियेचे दर्शन । तेणे कृतार्थ होईल जीवन ।
ऐसा परम भाग्याचा क्षण । नच लाभेल पुनरपि ॥१७८॥
मग तियेने हात जोडून । केली मातेसी विनंती भावपूर्ण ।
वदली आता सौम्यरूप घेऊन । द्यावे दर्शन सकलांसी ॥१७९॥
तेव्हा तियेचे जाणूनी मानस । दिव्य रूप धरिले त्या समयास ।
त्या दर्शने तिच्या आप्तांस । परम धन्यता वाटली ॥१८०॥
मग दीर जावा सासूबाईंनी । लोटांगणे घातली मातेच्या चरणी ।
अनन्यभावे हात जोडूनी । केली क्षमायाचना ॥१८१॥
वदले माते आम्ही अज्ञानी । नच जाणली तुझी करणी ।
तरी अपराध पोटी घालूनी । करी कल्याण सर्वार्थे ॥१८२॥
आम्ही पापी मूर्ख अति । छळियले तव लेकीप्रति ।
व्रतभंगादी अनिष्ट गोष्टी । केल्या जाणीवपूर्वक ॥१८३॥
त्या समस्त दोषांचे । करी मार्जन जननिये साचे ।
तुझिया कृपे आम्हा सर्वांचे । होवो जीवन सुखरूप ॥१८४॥
ती प्रार्थना ऐकून । झाली संतोषी माता प्रसन्न ।
सर्वांना शुभाशीर्वाद देऊन । अंतर्धान पावली ॥१८५॥
भाविक हो! हे माहात्म्य पावन । केले सद्भावे येथ कथन ।
संतोषी मातेची कृपा म्हणून । झाली संपूर्ण रचना ही ॥१८६॥
शब्दफुले जी येथ गुंफली । त्याची माला मातेसी अर्पिली ।
'जितेन्द्रनाथ' निमित्त या वेळी । कर्ता करविता भगवंत ॥१८७॥
शके एकोणीसशे सत्तावीस । ज्येष्ठ शुद्धा प्रतिपदेस ।
सोमवारी मध्यान्ह समयास । झाले संपन्न लेखन हे ॥१८८॥
॥ इति जितेन्द्रनाथ रचित श्रीसंतोषीमाता माहात्म्य अर्थात सोळा शुक्रवार व्रतकथा संपूर्ण ॥
शुभं भवतु ।
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥