बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By
Last Updated : गुरूवार, 8 मे 2014 (15:03 IST)

दुसरी लोकसभा निवडणूक : अनेक दिग्गजांवर पराभवाची नामुश्की

लोकसभेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक 1957 मध्ये झाली. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत असे चार दिग्गज निवडून आले, जे पुढे भारतीय राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचले. अलाहाबादमधून काँग्रेसच्या तिकिटावर लालबहादूर शास्त्री निवडून आले. सुरतमधून मुरारजी देसाई काँग्रेसकडूनच लोकसभेवर पोहोचले. बलरामपूर मतदारसंघातून जनसंघाची उमेदवारी घेऊन अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा लोकसभेवर गेले. नंतर हे तिघेही देशाचे पंतप्रधान झाले. याच निवडणुकीत मद्रासमधील तंजापूर लोकसभा मतदारसंघातून सी. आर. व्यंकटरमण निवडून आले आणि नंतर ते देशाचे राष्ट्रपती झाले.

1956 मध्ये भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 19 जानेवारी ते 1 मार्च दरम्यान ही निवडणूक पार पडली. काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व निर्विवाद होते. विरोधी पक्ष वेगवेगळ्या गटात विभागला गेला होता. 1952 च्या निवडणुकीनंतर आचार्य जे. बी. कृपलानी यांची किसान मजदूर प्रजा पार्टी आणि जयप्रकाश लोहिया यांची सोशालिस्ट पार्टी यांचे विलीनीकरण होऊन प्रजा सोशालिस्ट पार्टी हा नवा पक्ष बनला होता. नंतर 1955 पर्यंत त्यांचे विभाजन झाले. डॉ. लोहिया आणि त्यांच्या समर्थकांनी आपला स्वत:चा सोशालिस्ट पार्टी हा नवा पक्ष बनवला होता. जनसंघाचा प्रभाव विशिष्ट भागातच होता.

1957 मध्ये लोकसभेच्या एकूण 494 जागा होत्या. काँग्रेसने 490 जागांवर उमेदवार उभे केले आणि 371 ठिकाणी त्यांना विजय मिळाला. काँग्रेसनंतर भारतीय कमुनिस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष होता. सीपीआयने 110 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 27 जागांवर त्यांना यश मिळाले. त्यांना 9 टक्के मते मिळाली आणि 16 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रजा सोशालिस्ट पार्टीच खातत 19 जागा आल्या. त्यांनी 189 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. 55 उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. या पक्षाला 10.4 टक्के मते मिळाली. याच निवडणुकीत जनसंघाने 130 उमेदवार उभे केले होते, परंतु फक्त 4 जण निवडून आले. मिळालेल्या मतांची टक्केवारी केवळ 3 होती. 57 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

119 मतदारसंघातून प्रादेशिक पक्षांचे उमेदवार उभे होते. यापैकी 31 जागांवर ते निवडून आले. 40 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल. प्रादेशिक पक्षांना या निवडणुकीत 7.6 टक्के मते मिळाली होती. एकूण 1519 उमेदवार रिंगणात होते. 481 अपक्ष उमेदवार होते. त्यापैकी 42 जिंकले आणि 324 जणांना अनामत रक्कम गमवावी लागली होती. अपक्षांना 19 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत एकूण 45 महिलांनी नशीब अजमावले होते. त्यापैकी 22 महिला लोकसभेवर पोहोचल्या आणि 8 महिलांची अनामत रक्कम जप्त झाली.

या निवडणुकीत दोन प्रकारचे मतदारसंघ होते. 312 उमेदवार एक जागा असलेल्या मतदारसंघातून आणि 182 उमेदवार दोन जागा असलेल्या मतदारसंघातून लोकसभेवर पोहोचले होते. पहिल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या 2 कोटीने वाढली होती. निवडणुकीवर सरकारी तिजोरीतून 5.9 कोटी रुपये खर्च झाले. निवडणुकीच्या प्रचारात अत्यंत साधेपणा होता.

पदायात्रेबरोबरच उमेदवारांनी टांगा, रिक्षा, सायकल या साधनांचा वापर करून प्रचार केला. मोठे नेते मात्र कारमधून प्रचाराला जात असे. एका मतदारसंघात फक्त एक गाडी वापरण्याला परवानगी होती.

ग्वाल्हेर राजघराणतील विजयाराजे सिंधिया गुना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आल्या. प्रजा सोशालिस्ट पार्टीचे दिग्गज आचार्य जे. बी. कृपलानी या निवडणुकीत बिहारमधील सीतामढी मतदारसंघातून निवडून आले. त्याचप्रमाणे दिग्गज कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे हेदेखील विजयी झाले. त्यांनी मुंबई मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

भारतीय राजकारणात पक्षांतराची परंपरा तशी जुनीच आहे. 1952 मध्ये किसान मजदूर प्रजा पार्टीकडून निवडणूक जिंकणार्‍या सुचेता कृपलानी पुढच्या म्हणजे 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. फुलपूरमधून जवाहरलाल नेहरू यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसमधील अनेक बडय़ा नेत्यांनीदेखील या लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला होता. नेहरूंचे जावई फिरोज गांधी रायबरेलीतून निवडून आले होते. आंध्र प्रदेशातील चित्तूर मतदारसंघातून एम. अनंतशयनम अय्ंगार विजयी झाले होते. तर गुडगावमधून मौलाना अब्दुल कलाम आझाद निवडून आले. आंध्र प्रदेशातील तेनाली मतदारसंघातून एन. जी. रंगा विजयी झाले होते.

उत्तर मुंबईतून व्ही. के. कृष्णमेनन, गुजरातमधील साबरकाठामधून गुलजारीलाल नंदा, पंजाबातील जालंधरमधून स्वर्णसिंह, पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून अतुल्य घोस, उत्तर प्रदेशातील बस्तीमधून के. डी. मालवी, बांदा मतदारसंघातून राजा दिनेशसिंह आणि मध्यप्रदेशातील बालवदाबाजार (आताचे छत्तीसगड) विद्याचरण शुक्ल निवडणूक जिंकले होते. विख्यात कम्युनिस्ट नेते ए. के. गोपालन केरळमधील कासारगौडा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. बिहारमधील बाढ मतदारसंघातून तारकेश्वरी सिन्हा, पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून रेणू चक्रवर्ती आणि अंबालामधून सुभद्रा जोशी दुसर्‍यांदा निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाल्या होत्या. सीतापूरमधून उमा नेहरू यादेखील निवडणूक जिंकल्या होत्या. प्रसिध्द समाजवादी नेते बापूनाथ पै महाराष्ट्रातील राजापूरमधून आणि हेम बरुआ गुव्हाटीमधून प्रजा सोशालिस्ट तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदीय जीवनाची सुरुवात याच सार्वत्रिक निवडणुकीपासून सुरू झाली होती. त्यांनी उत्तर प्रदेशातील तीन मतदारसंघातून एकाचवेळी निवडणूक लढविली होती. बलरामपूर मतदारसंघातून ते निवडून आले. परंतु लखनौ आणि मथुरा या दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मथुरेत तरी त्यांना अनामत रक्कमदेखील गमवावी लागली होती. लखनौमधून काँग्रेसचे पुलीन बिहारी बॅनर्जी यांनी त्यांचा  पराभव केला होता. तर मथुरेतून अपक्ष उमेदवार राजामहिंद्र प्रताप यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

1957 च्या दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांना काँग्रेसने पराभूत केले, तर व्ही. बी. गिरी एका अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाले होते. उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभा मतदारसंघातून डॉ. लोहिया यांना काँग्रेसचे त्रिभुवन नारायणसिंह यांनी पराभूत केले होते. काँग्रेसच्या तिकिटावर आंध्र प्रदेशातील पार्वतीपूरम मतदारसंघातून व्ही. व्ही. गिरी फक्त 565 मतांनी निवडणूक हरले होते. चंद्रशेखर यांनीदेखील 1957 मध्ये पीएसपीच तिकिटावर पहिली निवडणूक लढविली होती. त्या काळी बलिया आणि गाजीपूरमधील काही भागाचा मिळून रसडा हा मतदारसंघ तयार झाला होता. चंद्रशेखर यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविली होती आणि ते तिसर्‍या स्थानावर राहिले होते. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कमीत कमी पाच मोठे प्रादेशिक पक्ष पहिल्यांदाच अस्तित्वात आले. तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम, ओरिसातील गणतंत्र परिषद, बिहारमधील झारखंड पार्टी, संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात परिषद असे ते पाच प्रादेशिक पक्ष होते.

- प्रशांत जोशी