Holi 2023 भक्त प्रल्हादाची गोष्ट
हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून देवाला प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. ब्रह्मांनी तथास्तु म्हटत त्याला वर दिले आणि यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही.
त्यामुळे राजाला अहंकार झाला. त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला. अशात त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई. प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे. वडिलांना त्यांचे जप करणे सहन होत नव्हते. त्याला अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील त्याचा जप सुरुच असायचा. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाचा राग अनावर होत असे. अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली.
एके दिवशी राजाने सेवकांना आज्ञा केली की नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला डोंगराच्या उंच कड्यावरून खोल दरीत ढकलून द्या. सेवकांनी तसे केले मात्र प्रल्हाद थोड्याच वेळात राजवाड्याकडे येताना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा चिडला आणि हा जिवंत कसा असे विचारले. तेव्हा प्रल्हादाने सांगितले की डोंगराच्या कड्यावरुन खाली पडल्यावर मी एका झाडावर अलगद पडलो मग तेथून उतरुन एका बैलगाडी बसून पुन्हा आलो. हे ऐकून राजाला निराशा झाली.
काही दिवसांनी राजाच्या खास लोकांसाठी जेवण तयार होत असताना राजा तिथे पोहचले तर प्रल्हाद देखील तेथे होते आणि त्याच्या मुखातून सतत नारायण नारायण असा नामजप चालला होता. राजाला पुन्हा राग आला. त्याने सेवकांना आज्ञा केली की मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. राजाची आज्ञा ऐकून सेवक देखील घाबरले पण आज्ञाचे पालन करणे आवश्यक होते अशात त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. आता हा कसा वाचेल हे बघायला राजा स्वत: उपस्थित राहिला. तेव्हा कढईतून चारही बाजूंनी उकळत असलेलं तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू पळू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. हे आश्चर्य घडताना राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले आणि त्यावर प्रल्हाद शांतपणे उभा होता.
अखेर हिरण्यकश्यपूने मुलाचा वध करण्यासाठी आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करु शकत नाही. म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते. हिरण्यकश्यपूने होलिकेला भकत प्रल्हादाला मांडीवर घे? न आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता.
प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करु शकली नाही. तेव्हा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव कुठे आहे तुझा देव. तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला. कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता. प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले.