एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे.
चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे.
पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंगटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी रॅडला भारतात पाचारण केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.
त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथील निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. वेळ होती 22 जून 1897 सालच्या मध्यरात्रीची. रॅड मरण पावला.
याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व 18 एप्रिल 1898 रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला 8 मे 1899 व बाळकृष्णाला 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले. भगतसिंह़ राजगुरू व सुखदेवप्रमाणेच चाफेकर बंधूही शहीद झाले.
चाफेकर बंधूचे बलिदान एकोणविसाव्या शतकाच्या शेवटची सर्वात उल्लेखनीय घटना होय. स्वातंत्रलढ्यात बलिदानाची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे. पारतंत्र्य व परिकीयांचे भारतीय परंपरा व संस्कृतीवरील आक्रमण त्यांना कदापि मान्य नव्हते.