मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|

कित्येक पाक तरूण कसाबच्या मार्गावर

NDND
मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेला आरोपी अजमल कसाब आपला नागरिक नाही, असे पाकिस्तान कितीही सांगत असलं तरी हे सांगताना आपल्या पायाखाली काय जळतंय याचीच कल्पना या देशाला नाही असाच अर्थ त्यातून निघतो. पाकिस्तानातील संपन्न प्रांत असलेल्या पंजाबातून अनेक तरूण आज अजमलच्या मार्गावर चालत आहेत. पाकिस्तानचे भवितव्य दहशतवादाकडे वळालेल्या याच तरूणांच्या हाती आहे.

'द डॉन'ने दिलेल्या वृत्तात पाकिस्तानातील अंतर्गत व्यवस्थेवर प्रकाश पडतो. कसाबचे नाव आल्यानंतर अनेक पत्रकारांनी त्याच्या फरीदकोट या गावी धाव घेतली. मतदारयादीतील त्याचे नाव शोधून काढले. त्याच्या कुटुंबियांशी बोलले. त्याच्याशी संबंधित लोकांकडून त्याच्याविषयी जाणून घेतले. पण आपण अडचणीत येतोय हे पाहताचा पाकिस्तानने मतदार यादीतील त्याचे नावच गायब करून टाकले. अध्यक्ष असीफ अली झरदारींनी तर 'यू टर्न' घेऊन कसाब पाकिस्तानी नाहीच, असे सांगूनही टाकले.

पण असे म्हटल्याने सत्य झाकता येते काय? कसाबच्या निमित्ताने पाकिस्तानात काय घडतेय याचे अदमास लावणे कठीण नाही. कसाब पाकिस्तानी नाही, असे म्हटल्याने प्रश्न कदाचित तात्पुरता सुटला असेल. पण पाकिस्तानी तरूण कुठे चाललाय याचे भयावह चित्र दिसून येते आहे.

''कसाबचा प्रश्न आपण एकवेळ विसरून जाऊ. पण पाकिस्तानातील विशेषतः संपन्न पंजाबातील तरूणांच्या बाबतीत काय घडतेय याचा विचार करायला हवा की नको? हे तरूण देशातल्याच नव्हे तर अगदी आपल्या भागातल्या आत्मघातकी हल्ल्यातही सहभागी होत आहेत. ही चिंतेची बाब नाही का? असा प्रश्न 'डॉन'च्या वृ्तात करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादेतील मॅरीयट या पंचतारांकित हॉटेलबाहेर झालेला आत्मघातकी स्फोट लष्कर ए जंगवी या संघटनेने केला असावा असा संशय आहे. वाह कांट येथे आत्मघातकी स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात खुशाब येथून पकडलेला किंवा मॅरीयट हॉटेलमधील स्फोटानंतर इस्लामाबादमधील पोलिस लाईन भागात रहिम यार खान येथे घडवून आणलेल्या स्फोटाला जबाबदार असलेलाही एक तरूणच होता.

या घटना पाकिस्तानातील तरूण कोणत्या दिशेने जात आहेत, हे दर्शविणार्‍या आहेत. गरीबीमुळे लोक दहशतवादाकडे वळतात हे एक 'लोकप्रिय' विधान असले तरी आता या गरीबीला भ्रष्ट प्रशासनाची जोडही मिळाली आहे. या दोन्ही कारणांमुळे वैफल्यग्रस्त झालेले लोक आपला संताप एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात धरून बाहेर काढू लागले आहेत.

या दहशतवादी संघटना आता चांगल्याच प्रभावी ठरू लागल्या आहेत. अनेक लोक त्याकडे वळू लागले आहेत. अमेरिकेतील 911 च्या घटनेपूर्वीच पाकिस्तानात ७२ दहशतवादी गट होते. ते त्यानंतर एकत्र आले आणि छोट्या गटात वाटून मोठ्या ताकदीने आणि प्रभावाने काम करत आहेत.

त्यामुळे पंजाब व त्याच्याशी लगत प्रांतात अनेक कारवाया सुरू आहेत. वायव्य सरहद्द, बलुचिस्तान आणि सिंध या प्रांतापेक्षा शेतीसह सगळ्याच बाबतीत संपन्न भाग असूनही पंजाबात दहशतवादाचे हे बीज पेरले गेले आहे, याकडे या वृत्तपत्राने लक्ष वेधले आहे.