मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|

पाकमधील शाळांमधून जिहादची शिकवण

बंदी घालण्यात आलेल्या जमात उद दवा या संघटनेतर्फे चालविल्या जाणार्‍या काही शाळांत 'जिहाद'ची शिकवण दिली जाते, अशी उपरती आता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला झाली आहे.

मुंबई हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा आणि पर्यायाने तिची राजकीय शाखा असलेल्या जमात उद दवाचा हात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर या संघटनेतर्फे चालविण्यात येणार्‍या संस्थावर गुप्तचर विभागाने नजर ठेवली होती. त्यात ही बाब आढळून आली आहे. जवळपास दहा शाळांमध्ये दहशतवादी शिकवण दिली जात असल्याचे गुप्तचर संस्थेने सरकारला कळवले आहे.

या शाळांत विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना जिहादविषयक व्याख्याने दिली जातात, असे आढळून आल्याचे गुप्तचर सूत्रांकडून सांगण्यात आले. जमाततर्फे पंजाब प्रांतात २६ शाळा चालविल्या जातात. पण सरकारी निरिक्षक फक्त त्यातील दहाच शाळांमध्ये गेले होते. त्यात ही बाब आढळली होती.

या शाळांवर आता नियमितपणे लक्ष ठेवण्यात येणार असून सध्या तरी तेथील शिक्षक बदलण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जमातचा प्रवक्ता अब्दूल्ला मुन्तझीर याने आपल्या संस्थेच्या शाळांतून जिहादची शिकवण दिली जात असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. कोणतीही अशैक्षणिक धोरणे आमच्या संस्थेतर्फे राबवली जात नाहीत, असे त्याने स्पष्ट केले आहे. जमातच्या शाळा सरकारकडे नोंदणीकृत असून त्यात सरकारीच अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यात कायदाच्या अंतर्गत राहूनच कामकाज केले जाते, असेही त्याने नमूद केले.