मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:47 IST)

लाल मशिदीतील शस्त्रांचा मुंबई हल्ल्यात वापर?

कराचीतील लाल मशिदीत काही महिन्यांपूर्वीच मुशर्रफ यांच्या सरकारने कारवाई करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला होता. यातील काही शस्त्रे चोरीला गेल्याचे नंतर उघडकीस आले होते. हीच शस्त्रे मुंबईवरील हल्ल्यात वापरली गेली असावीत, असे एक मत पुढे येत आहे.

लाल मशिदीत कट्टरपंथीय दहशतवादी लपल्याचे लक्षात आल्यानंतर मुशर्रफ यांनी धडक कारवाई करून या मशिदीत सैन्य घुसवले होते. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांना ठार मारत तेथे दडपून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. पण आबपारा या पोलिस ठाण्यात ठेवलेल्या या शस्त्रसाठ्यातून काही शस्त्रे व दारूगोळा चोरीला गेल्याचे काही दिवसांपूर्वीच निष्पन्न झाले होते. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मते याच शस्त्रसाठ्याच्या आधारे मुंबईत दहशतवादी कारवाई करण्यात आली असावी.

हा शस्त्रसाठा पोलिसांनी वेळीच पुन्हा एकदा हस्तगत करायला हवा. अन्यथा, त्याचा वापर आणखी कुठल्या तरी दहशतवादी कारवाईसाठी होण्याची भीती आहे. पोलिसांनी आता लवकरात लवकर तो मिळवला पाहिजे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल तलत मसूद यांनी डेली टाईम्सशी बोलताना सांगितले.

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची गरज निवृत्त जनरल अब्दूल कय्यूम यांनी व्यक्त केली. ही शस्त्रे लाल मशिदीत कशी पोहोचली आणि जप्त केल्यानंतर पोलिस ठाण्यातून कशी चोरीला गेली याचा तपास व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा सारा प्रकार लज्जास्पद असून पोलिसांच्या सहकार्यानेच ही शस्त्रे अतिरेक्यांच्या ताब्यात गेली असली पाहिजेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

माजी पोलिस महासंचालक अफझल शिगरी यांनीही, पोलिसांना हाताशी धरूनच अतिरेक्यांनी ही शस्त्रे पळवली असतील, असे सांगत कय्यूम यांच्या मताशी सहमती दर्शवली.