गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By विकास शिरपूरकर|

1600 लोक...सहा तास... एक चुंबन

न्यूयॉर्कच्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिंदी चित्रपटाला साजेशी एक घटना घडली... घटना तशी साधीच पण तिने विमानतळाच्‍या सुरक्षा यंत्रणेची झोप तर उडवलीच पण सहा तास 1600 लोकांना विमानतळावर अडकवून ठेवले याकाळात एकही विमान उडू किंवा लँडींग होऊ दिले नाही. हे विशेष... आणि हे सगळं घडलं कशामुळे केवळ एका चुंबनामुळे...लक्षात नाही ना आलं... सुरक्षा यंत्रणांनाही ही बाब लक्षात यायला सहा-सात तास लागले... तिथे आपली काय कथा.

त्‍याचं झालं असं... रुत्गर्स विद्यापीठात शिकणारा 28 वर्षीय चीनी तरुण हैसांग जियांग विमानतळाची सुरक्षा भेदून आत घुसला. जियांगची प्रियसी या विमानतळावरून तिच्‍या घरी जाण्‍यासाठी निघाली होती. जियांग तिला विमानतळावर निरोप देण्‍यासाठी आला होता. ती त्याला बाहेर सोडून विमानतळावर आत गेली. मात्र विरहाने व्‍याकुळ झालेल्‍या जियांगने न राहवून सुरक्षा यंत्रणा भेदून तिचे चुंबन घेण्‍यासाठी आत प्रवेश केला. झालं, विमानतळावर अज्ञात व्‍यक्ती सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसल्‍याचे सुरक्षा यंत्रणांना कळलं. त्‍यांनी लगेच संपूर्ण विमानतळ सील केलं. यावेळी विमानतळावर सुमारे 1600 लोक होते. सर्वांना विमानतळावरच स्‍थानबध्‍द करून एकेकाची चौकशी आणि तपासणी सुरू झाली. विमानतळावर उभ्‍या असलेल्‍या सर्व विमानांची आणि त्‍यांच्‍या प्रवाशांची तपासणी घेण्‍यात आली. संपूर्ण विमानतळ पिंजून काढण्‍यात आलं आणि या सर्व प्रकाराला सुमारे सहा तास लागले.

अमेरिकाः नेवार्क विमानतळावरील सुरक्षेला खिंडार

याकाळात एकही विमान टेक ऑफ किंवा लँड होऊ दिलं गेलं नाही. त्‍यामुळे व्‍यवस्‍था विस्‍कळीत झाली ती वेगळी. जगभरातील वृत्तवाहिन्‍या आणि प्रसार माध्‍यमांनीही या गोष्‍टीची गंभीर दखल घेत वृत्तांकन सुरू केले. मात्र खरी बाब नंतर समोर आली. आता पोलिसांनी या घटनेनंतर जियांगला अटक केली असून त्‍याची कसून चौकशी केली जात आहे. कदाचित नियम मोडल्‍याबद्दल त्याला काही दिवसांची शिक्षाही होऊ शकते. त्‍यामुळे बिच्‍चा-या जियांगला आणखी काही दिवसांचा विरह सोसावा लागेल.