गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2024 (19:42 IST)

बोधिचित्त वृक्ष : सशस्त्र दरोडेखोरांनी रात्रीत झाड कापलं, या झाडाची किंमत कोट्यवधींच्या घरात का आहे?

thinking tree
कोट्यवधींची किंमत असलेलं एक वृक्ष उद्ध्वस्त झाल्यानं नेपाळमधील एका समूहाच्या भावना दुखवाल्या आहेत, त्यांना वेदना झाल्या आहेत. त्यांचं हे दु:खी होणं भीतीचंही कारण ठरलंय.
या भागातील बहुतांश लोकांसाठी बोधिचित्त (किंवा बोधि) या वृक्षापासून मिळणारं उत्पन्न संपूर्ण जीवन बदलून टाकणारं ठरलंय. त्यामुळे कठोर शारीरिक श्रमातून त्यांची सुटकाही झाली.
 
नेपाळच्या कावरेपालनचोक जिल्ह्यात आढळणाऱ्या बोधिचित्त वृक्षाचं बौद्ध धर्मात मोठं प्रतिकात्मक महत्त्वं आहे. पण त्याचबरोबर त्याची किंमतही सोन्यापेक्षा जास्त आहे.
 
त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कावरेमधील रोशी ग्रामीण नगर पालिका हद्दीतल्या एका वृक्षाची चोरी झाली, त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना आपण सर्वकाही गमावून बसू की काय? अशी भीती निर्माण झाली.
वृक्ष बनलं सोन्याची खाण
"त्यांना काही अडचण होती, तर त्यांनी माझ्याशी सामना करायचा होता. त्यांनी वृक्ष कापण्याची काय गरज होती?"
 
रडवेल्या आवाजात 42 वर्षीय दिल बहादूर तमांग सांगत होते. त्या बोधिचित्त वृक्षाबरोबर तेही लहानाचे मोठे झाले होते.
 
रोशी ग्रामीण नगरपालिका भागातील नागबेली नावाच्या ठिकाणी दिल बहादूर यांचा जन्म झाला होता. त्यांना जीवनात प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला.
 
तीन मुलं, भावंड आणि आई वडील अशा एकत्र कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी दिल बहादूर यांना अत्यंत मेहनतीची कामं करावी लागली. त्यांनी कतारमध्ये जाऊन बांधकामाच्या ठिकाणी मजुरीही केली.
पण जवळपास 15 वर्षांपूर्वी अचानक बोधिचित्त वृक्षांचं मूल्य खूप जास्त वाढल्यामुळे दिल बहादूर यांच नशीब पालटलं. त्यापूर्वी हे वृक्ष तशाप्रकारे (आर्थिक) मौल्यवान नव्हते.
 
बोधिचित्तं वृक्षाच्या बियांपासून बौद्ध प्रार्थनांसाठी माळा तयार केल्या जातात. नेपाळमधील या भागामध्ये असलेले बोधिचित्तं वृक्ष हे या बियांचा दर्जा आणि किंमत याचा विचार करता सर्वात उत्तम मानले जातात.
 
अभ्यासकांच्या मते, पूर्वी ही वृक्षं शक्यतो फारशी विकली जात नव्हती. पण चीनच्या व्यापाऱ्यांचा यातील रस वाढल्यामुळं बोधिचित्ताच्या बियांच्या दरांमध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळाली आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून आता चीनचे व्यापारी शेतात येऊन खरेदीसाठीचे प्रस्ताव देतात, असं स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
 
दिल बहादूर यांचं शिक्षण फारसं झालेलं नाही. पण तरीही लहान भाऊ शेर बहादूर तमांग आणि कुटुंबाच्या मदतीनं बोधिचित्त वृक्षातून लाखो रुपयांची कमाई करण्यात त्यांना यश मिळत आहे.
 
गेल्या पाच वर्षांपासून एकाच बोधिचित्त वृक्षाच्या बियांची विक्री करत असल्याचं शेर बहादूर सांगतात. त्यातून दरवर्षी नेपाळी चलनात नव्वद लाख रुपये ($67,000) मिळत असल्याचं ते म्हणाले.
बोधिचित्ताच्या बियांपासून बनलेली बौद्ध माळ
“आमच्या कुटुंबामध्ये 20-22 लोक आहेत. या वृक्षातून होणाऱ्या उत्पन्नावरच संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालतो. जर ते झाड कापलं नसतं तर त्यातून अनेक वर्ष लाखो रुपयांची कमाई आम्हाला करता आली असती," असं शेर बहादूर तमांग म्हणाले.
 
तमांग कुटुंबाकडून बियांची खरेदी करणारे व्यापारी समिप त्रिपाठी यांनी, त्यांच्याकडून पुढील पाच ते सात वर्ष बिया खरेदी करण्यास होकार दिला होता, असं सांगितलं.
 
त्या एका झाडाच्या बियांची खरेदीसाठी ते दरवर्षी नव्वद लाख रुपये मोजत होते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून चीनच्या व्यापाऱ्यांना 3 कोटी रुपयांमध्ये ($224,000) ते या बियांची विक्री करत होते.
 
तमांग कुटुंबाचं हे झाड कावरे जिल्ह्यातील सर्वात मौल्यवान वृक्षांपैकी एक होतं, असं व्यापारी म्हणाले.
 
पण 11 एप्रिलला घडलेल्या घटनेनं तमांग कुटुंबीयांच्या जीवनातील आर्थिक संघर्षावर मात करण्याच्या आशांवर पाणी फेरलं आहे.
 
त्या रात्री 10-15 जणांच्या सशस्त्र गटानं त्यांच्या घरावर हल्ला केला, गोळीबार आणि बॉम्बही फेकले, असं दिल बहादूर म्हणाले.
 
त्यांच्या बोधिचित्त वृक्षाला असलेल्या धोक्याची तमांग कुटुंबीयांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आधीच सीसीटीव्ही आणि तारेचं कुंपन झाडाभोवती घातलेलं होतं. त्यामुळं एका लोखंडी गेटमधूनच या वृक्षापर्यंत पोहोचणं शक्य होतं.
शेर बहादूर यांनी बीबीसीला दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हाती बंदुका असलेले लोक दिसत आहेत.
 
दिल बहादूर यांनी त्या रात्री घडलेली घटना सांगितली. गोळीबारापासून वाचण्यासठी आम्ही घरात लपलो होतो. त्यावेळी या सशस्त्र लोकांनी लोखंडी गेट तोडलं आणि त्यानंतर जे काही केलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे.
 
“जवळपास तासाभरानंतर त्यांनी कुलूप तोडलं आणि तो वृक्षच कापून टाकला. त्यांनी तसं का केलं हे आम्हाला अजूनही समजलेलं नाही," असं ते म्हणाले.
 
झाड नेऊन दुसरीकडं लावणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे तमांग कुटुंबालाही त्याचा लाभ होऊ द्यायचा नाही, म्हणून त्यांनी हा प्रकार केला.
 
काही गावकऱ्यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, हा प्रकार व्यावयासिक स्पर्धेतून घडलेला असण्याची शक्यता आहे, तर काहींनी म्हटलं की, त्यांना बिया खरेदी करायच्या असतील, पण नकार मिळाल्याने त्यांनी झाड कापण्याचा प्रकार केला असू शकतो.
 
या संपूर्ण प्रकारानंतर कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
 
वृक्षाशी संबंधित गुन्हे
बोधिचित्त वृक्ष हे टेमल आणि रोशी ग्रामीण नगर पालिकेच्या भागात आढळतात. अधिकाऱ्यांच्या मते, याठिकाणी वृक्षांच्या विक्रीबाबत अनेकप्रकारचे वाद असल्याचंही समोर आलं आहे.
 
"या ग्रामीण नगरपालिकेसमोर येणाऱ्या एकूण वादांपैकी जवळपास एक तृतीयांश वाद हे बोधिचित्तशी संबंधित असतात," अशी माहिती रोशी नगर पालिकेचे उपाध्यक्ष मिम बहादूर वायबा यांनी सांगितलं.
 
तमांग यांच्याबरोबर घडलेल्या या घटनेनं परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
 
तमांग यांच्या कुटुंबापासून अगदी हाकेच्या अंतरावर राहणारे नारायण हुमागाई यांचं कुटुंब अजूनही धक्क्यात आहे.
 
"दिल बहादूर तमांग यांनीच माझ्या घरात हे वृक्ष लावलं होतं. जे काही घडलं त्यानं आम्ही खूप घाबरलेलो आहोत," असं त्यांनी म्हटलं.
 
या घटनेनंतर नारायण यांनी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, वृक्षाच्या भोवती लोखंडी कुंपणही घातलं आहे.
 
"शेजाऱ्यांचे झाड कापून टाकलेले पाहिल्यानंतर आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत. लोकांमध्ये ईर्ष्या निर्माण होत असल्यानं, आमच्याबरोबरही असं काही होईल ही भीती आम्हाला वाटत आहे," असं ते म्हणाले.
 
स्थानिक प्रशासनानंही या मौल्यवान झाडांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा गस्त सुरू केला आहे.
 
ठरावीक गावांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा पोलिस गस्त घालत आहे, अशी माहिती टेमल नगरपालिकेचे उपाध्यक्ष दलमान ठोकर यांनी दिली.
 
व्यापाऱ्यांनी बिया सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी यापूर्वी हेलिकॉप्टरही मागवले होते, असंही गावकऱ्यांनी सांगितलं.
 
कावरे जिल्ह्यातील पोलीस प्रवक्ते आणि उपअधीक्षक राजकुमार श्रेष्ठ यांनी गरजेनुसार पोलिस संरक्षण पुरवणार असल्याचं म्हटलं. विशेषतः उत्पादन निघण्याच्या वेळी सुरक्षा पुरवली जाईल, असं ते म्हणाले.
 
पण तसं असलं तरी शस्त्र घेऊन लुटण्यासाठी येणाऱ्यांना या तयारीनं फार काही फरक पडणार नसल्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात ठाण मांडून आहे.
 
(अतिरिक्त रिपोर्टिंग श्रीजना श्रेष्ठ)

Published By- Priya Dixit