शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (11:03 IST)

डोनाल्ड ट्रंप पुन्हा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, पण या 6 आव्हानांचा करावा लागणार सामना

donald trump
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपण तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
 
अमेरिकन राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणूक हारणाऱ्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा निवडणूक लढवणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे.
 
काही माध्यमांमधे आलेल्या बातम्यांनुसार ट्रंप यांच्या काही माजी सहकाऱ्यांनी सांगितलं आहे की, यावेळी त्यांची निवडणूक कँपेन 2020 सारखी नसेल, तर 2016 सारखी असेल.
 
या निवडणुकीत ट्रंप स्वतःला ‘बाहेरून आलेली व्यक्ती’ म्हणून सादर करत अमेरिकन राजकारणात मोठे बदल करण्याची गोष्ट करतील.
 
2016 साली डोनाल्ड ट्रंप यांनी सर्वांत आधी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना नामोहरम केलं.
 
त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभूत केलं.
 
ट्रंप यांच्या विजयाची अनेकांनी अपेक्षा केली नव्हती. पण या यशामुळे डोनाल्ड ट्रंप यांच्या राजकीय ताकदीचा प्रत्यय आला.
 
अमेरिकेतल्या सनातनी मंडळींसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. त्यांच्या चक्रावून टाकणाऱ्या, प्रक्षोभक वक्तव्यांच्या हेडलाइन्स बनतात. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना बातम्यांमध्ये, चर्चेत राहणं अवघड जातं.
 
ट्रंप यांच्या समर्थकांची संख्याही लक्षणीय आहे आणि ते सहसा मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या अमेरिकन नागरिकांनाही मतदान केंद्रापर्यंत आणू शकतात.
 
ट्रंप यांच्या मागील कार्यकाळात त्यांच्या अनेक समर्थकांची रिपब्लिकन पक्षात महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागलेली होती.
 
या गोष्टी ट्रंप यांच्या दृष्टिने जमेच्या असल्या तरीही 2024 ची निवडणूक जिंकणं हे ट्रंप यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकतं. या निवडणुकीत ट्रंप यांच्यासमोर कोणती 6 प्रमुख आव्हानं असतील?
 
1. आधीच्या कार्यकाळातील वादग्रस्त गोष्टी
आठ वर्षांआधी अमेरिकन राजकारणात त्यांचा अनुभव शून्य होता. ते कोणत्याही पदावर नव्हते. अशा परिस्थितीत मतदार आपल्या आशा-आकांक्षा त्यांच्या उमेदवारीसोबत जोडून पाहू शकत होते.
 
ट्रंप हेसुद्धा आपल्या पक्षाला निवडणूक जिंकून देण्याच्या दृष्टिने मोठी आश्वासनं देऊ शकत होते. टीकाकारांकडे त्यांच्या राजकीय अपयशाबद्दल सांगण्यासारखंही काहीच नव्हतं.
 
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. ट्रंप यांनी त्यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत टॅक्स कमी करण्यापासून क्रिमिनल जस्टिसच्या क्षेत्रात सुधारणा करण्यापर्यंत अनेक सुधारणा केल्या होत्या.
 
पण त्याचबरोबर त्यांना काही अपयशांनाही सामोरं जावं लागलं. डेमोक्रॅटिक पक्षाने हेल्थकेअर क्षेत्रात केलेल्या सुधारणा रोखण्यात अपयशी ठरले होते, ही गोष्ट रिपब्लिकन पक्षाशी संबंधित लोक सहजासहजी विसरणार नाहीत.
 
ट्रंप यांनी पायाभूत सोयीसुविधांबद्दल जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण करण्यातही ट्रंप यांना आलेलं अपयश रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांच्या लक्षात राहील.
 
कोरोना काळात त्यांच्या प्रशासनानं जी भूमिका घेतली होती, त्यावरही टीका होऊ शकते. डेमोक्रॅटिक पक्षानेही वारंवार कोरोना काळातील ट्रंप यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
 
मात्र काही उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या मते ट्रंप यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लादलेल्या निर्बंधांचं जास्तच समर्थन केलं होतं.
 
2. अमेरिकन संसदेवरील हल्ला
या निवडणुकीत ट्रंप यांना आपल्या मागच्या कार्यकाळातल्या धोरणांचं समर्थन करावं लागेल.
 
पण त्याहीपेक्षा त्यांना अमेरिकन संसदेवर 6 जानेवारी 2020 रोजी झालेल्या हल्ल्यामागील आपल्या भूमिकेसोबतच हल्लेखोरांना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसदर्भात आपल्या प्रशासनाचाही बचाव करावा लागेल.
 
6 जानेवारीला ट्रंप समर्थक ज्यापद्धतीने त्यांच्या नावाचा बॅनर घेऊन कॅपिटॉल हिलच्या इमारतीत घुसले होते आणि तिथल्या गोंधळाचे जे फोटो समोर आले होते, ते विसरता येणं शक्य नाही.
 
त्यातूनही सहा जानेवारीची घटना आणि त्यानंतर ट्रंप यांनी केलेली वक्तव्यं, त्याआधीचा घटनाक्रम अमेरिकन मतदार विसरले नाहीयेत हे अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या निकालातूनही समोर आलं.
 
2020 मधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हारल्याचं मान्य न करणाऱ्या ट्रंप यांच्या वक्तव्याचं रिपब्लिकन पक्षाच्या ज्या उमेदवारांनी समर्थन केलं होतं, ते मध्यावधी निवडणुकांमध्ये पराभूत झाले.
 
3. ट्रंप यांच्या समोरची कायदेशीर आव्हानं
डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर आगामी निवडणुकीत जी आव्हानं आहेत त्यांपैकी एक म्हणजे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले खटले.
 
 
 
एकीकडे ट्रंप आपल्याविरुद्धच्या या गुन्हेगारी आणि नागरी तपास प्रकरणांना राजकीय सूडापोटी केलेली कारवाई म्हणू शकतात. पण या खटल्यांमुळे ट्रंप यांच्यासमोर निर्माण झालेलं आव्हान मोठं आहे.
 
 
 
जॉर्जियामधील निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी ट्रंप यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे न्यूयॉर्कमधल्या त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला फसवणुकीच्या खटल्यांना सामोरं जावं लागत आहे.
 
 
 
एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातही ट्रंप यांच्यावर मानहानीचा दावा सुरू आहे.
 
त्यांच्याविरुद्ध कॅपिटॉल हिलवरील हल्ला आणि राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही गोपनीय कागदपत्रं स्वतःजवळ ठेवल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
 
 
 
यांपैकी कोणत्याही प्रकरणात निकाल त्यांच्या बाजूने गेला, तर त्यांना आर्थिक दंडासोबतच तुरुंगवासही होऊ शकतो. या परिस्थितीत त्यांचं राष्ट्राध्यक्षपदाचं निवडणूक लढविण्याचं स्वप्न धोक्यात येऊ शकतं.
 
4. प्रतिस्पर्ध्याचं तगडं आव्हान
आठ वर्षांआधी ट्रंप यांनी रिपब्लिक पक्षाच्या उमेदवारीसाठी फ्लोरिडाचे तत्कालीन गर्व्हनर जेब बुश यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होतीय.
 
जेब बुश उमेदवार होण्यासाठी लोकप्रिय होते. मात्र कागदोपत्रीच.
 
जेब बुश यांच्यासाठी प्रतिष्ठा, नाव आणि पैसा पुरेसं ठरलं नाही. मात्र, इमिग्रेशनपासून शिक्षणाच्या धोरणापर्यंत त्यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती.
 
एकेकाळी रिपब्लिकन पक्षात बुश यांचा जितका दबदबा होता तितका राहिला नाही.
 
मात्र ट्रंप यांना जर 2024 मध्ये पक्षाचा उमेदवार व्हायचं असेल तर त्यांना एकदा तरी फ्लोरिडाच्या गर्व्हरनरचा सामना करावाच लागेल.
 
जेब बुश यांच्या तुलनेत रॉन डिसेंटिस यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते.
 
मात्र, अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणात डिसेंटिस काय जादू करतील हे अजून कळलेलं नाही, मात्र त्यांची राजकीय वाटचाल वेगाने होत आहे.
 
डिसेंटिस निवडणुकीत उभ्या राहतील की नाही हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. रिपब्लिकन पक्षात त्यांना कोण आवाहन देईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
5. लोकप्रियतेत घट
ट्रंप यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याच्या आदल्या संध्याकाळी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने काही मतदानाचे निकाल जाहीर केले आहेत.
 
त्यामध्ये आयोवा आणि न्यू हँपशायरम भागात ट्रंप त्यांच्या पक्षाच्या रॉन डिसेंटिस यांच्याविरुद्ध पिछाडीवर आहेत.
 
या राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या नामांकनावर आधी मतदान होतं.
 
अमेरिकेत मध्यावधी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी ज्या राज्यातून समर्थन मिळणं गरजेचं आहे तिथेही ते फारसे लोकप्रिय ठरलेले नाही.
 
6. वाढतं वय
डोनाल्ड ट्रंप पुढची निवडणूक जिंकले, तर तेव्हा त्यांचं वय 78 वर्षं असेल. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शपथ घेतली तेव्हा तेही 78 वर्षांचे होते.
 
अशा परिस्थितीत ट्रंप दुसरे सर्वांत वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष होतील. वाढत्या वयाचा प्रत्येक व्यक्तीवर वेगळा परिणाम होतो.
 
त्यांचा सामना आता तरुण नेत्यांशी आहे. त्यामुळे ट्रंप त्यांच्या पक्षासाठी किती प्रचार करतील याबाबतही शंका आहे.
 
ट्रंप शारीरिकदृष्ट्या सशक्त दिसतात. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या काही सीमा असतातच.