पाकिस्तानात हिंसाचार 36 जणांचा मृत्यू, 162 जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात दोन आदिवासी गटांमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत शस्त्रांचाही वापर करण्यात आला.
पाकिस्तानच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या तुकड्यावरून दोन आदिवासी गटांमध्ये हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला आहे. या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला असून 162 जण जखमी झाले आहेत. अप्पर कुर्रम जिल्ह्यातील बोशेरा गावात ही घटना घडली.
अधिका-यांनी सांगितले की, आदिवासी वडीलधारी मंडळी, लष्करी नेतृत्व, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बोशेरा, मलिकेल आणि दुंदर भागात शिया आणि सुन्नी जमातींमध्ये काही काळापूर्वी एक करार झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर काही भागात अजूनही गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Edited By- Priya Dixit